आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: कधी थांबणार ही घुसमट..?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाहता पाहता दिवाळी आली. मनातील निराशेची जळमट बाजुला सारुन प्रत्येकजण या दिव्यांच्या सणांची जय्यत तयारी करण्यात गुंतला आहे. संपूर्ण देश दिव्याच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. मात्र देशाच्या ‍सीमेवर होणारे हल्ले, नैसर्गिक आपत्ती (चक्रीवादळ, महाप्रलय), बुद्धगया मंदिरासह देशात होणारे बॉम्बस्फोट आणि त्यावरून धर्माच्या आधारावर राजकरण करणारे राजकारणी याचा मात्र आता वीट आला आहे. अवघ्या जगाचा पोशिंदा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली अडकला आहे. त्यामुळेच कदाचित त्याचावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. हे प्रकार थांबणे तर दूरच, परंतु अलिकडे वाढतानाच दिसत आहे.

देशाच्या रक्षणासाठी आपला जवान सीमेवर छाती ताणून अहोरात्र उभा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असतानाही देशातील 'गरीब' हा 'गरीब' म्हणूनच रा‍हिला आहे. मात्र श्रीमंत अधिक श्रीमंत होताना दिसत आहे. त्यामुळे मन घुसमटत आहे. असे असताना दिवाळी साजरी करायची तर कशी? असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला आहे...

बुरख्यात सज्जनांचा
भुरटा दलाल होऊन..,
निर्लज्ज होऊन सांग कसा...?
मी दीप एक पेटवू...!

बॉम्बस्फोटातल्या च‍िता
अजुनही धगधगत आहे...
नादान बिचार्‍या 'पणत्या'
तरीही जळतच आहे...!

मंदिर अन् मशिदी मधला
खुदा एकच आहे...
बाहेर मात्र माणुसकीचा
सौदा झाला आहे...!

वाट पाहत होतो फराळाची
तोही 'निराळा'च आहे,
अवघ्या जगाचा पोशिंदा
फासावरती लटकत आहे..!

वाहुन गेले पुरात घरटे
मी एकटाच राहिलो,
अभ्यंग स्नानासाठी
अश्रु मात्र ढाळत राहिलो...

रक्षक भारतभूमीचा
सीमेवरती गेला,
कुणास मी ओवाळू सांग
आज भाऊबिजेला..?

आज दिवाळी असताना
मनात मात्र होळी पेटली आहे,
बंगल्यात रोषणाई अन्
हातात माझ्या झोळी आहे..!

- अनुश्री