आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदू सोमणचं ‘महानिर्वाण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्मशान हलले हलले, दूर निघोनी गेले’, असा सुरुवातीचा संथ आणि धीरगंभीर आवाज आणि नंतर ‘एक जीव हा तळमळत पडे, स्वारस्य निघुनी गेले गेले’ असा टिपेला पोहोचणारा साधारणतः ४० वर्षांपूर्वीचा आवाज आजही माझ्या कानात अगदी जशाच्या तसा घुमतो, आठवतो. मनात अनेक प्रसंग एकाच वेळेस गर्दी करतात, डोक्यातील ट्रॅफिक जॅम होते. चंदू सोमण आज आपल्यात नाही हे लक्षात आलं की, मन उदासीन अवस्थेत फ्लॅशबॅकमध्ये जातं.  
मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असल्यामुळे मला ‘महानिर्वाण’ महात्मा गांधी सभागृहाच्या गॅलरीत बसून बघावं लागलं होतं. डोक्यावर टक्कल, डोळ्यांवर काळा चष्मा, अंगावर घातलेल्या काळ्या कोटाच्या खिशात हात घालून ‘मोत्तो कोडी काव्वाडी हाडा, चंदनाचे लाकूड आणा’ असं गाणं म्हणत, पायाच्या ठरावीक पद्धतीने हालचाल करत, बारीक नाचणाऱ्या चंदू सोमणची अदाकारी मला लाजवाब वाटली. शेवटच्या प्रवेशात ‘आवा चालली पंढरपुरा वेशीपासुनी आली घरा’ या चंदू सोमणने सादर केलेल्या पदाने तर क्लायमॅक्सच गाठला.
 
नाटकाचा शेवट अंगावर येतो, तसं मन सुन्नं झालं. नकळत मन नाटकाच्या प्रयोगाबद्दल विश्लेषण करू लागलं. ‘महानिर्वाण’चा लेखक मोठा की आपल्या सक्षम अभिनय सामर्थ्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात उतरणारा चंदू सोमण मोठा? महानिर्वाणची संहिता भारी हे खरं आहे; पण चंदू सोमणने घडवलेला भाऊराव? अफलातून सादरीकरण. यापेक्षा चांगला अभिनय तो काय असू शकतो! असं मलाच नाही तर नाटक ज्यांना समजतं त्या अनेकांना वाटून गेलं. 

कॉलेजच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने पाच वर्षांनंतर  जेव्हा चंदू सोमणने पुन्हा एकदा महानिर्वाण सादर केलं त्या टोळीत मी होतो. चंदू सोमणसोबत पाच वर्षांत चार-दोन नाटकांत काम केल्यामुळे आमची केमिस्ट्री मस्त जमली होती. तालमीत मजा यायची. ‘अंग अगदी अांबून गेलंय, कधी एकदा राख होऊन जाईन असं वाटतंय’ हे वाक्य घेताना चंदू हमखास त्याच्या खास स्टाइलमध्ये हसायचा. मेल्यानंतर भाऊरावचं अंग खरोखर अांबून गेल्याचं चेहऱ्यावर दाखवण्याचं चंदूचं कसब मानलं पाहिजे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही महानिर्वाणात दिलीप भाले होता. चंदू सोमणच्या खालोखाल दुसरी महत्त्वाची भूमिका दिलीप भालेची होती.
 
 रंगभूमीवरचा सहज वावर. यात  दिलीप भाले आणि चंदू सोमणचा हातखंडा.  तालीम झाल्यानंतर नितीन सेवलीकर, सुहास सेवेकर आणि अर्थातच दिलीप भाले वगैरेंसोबत ‘चौथ्या’ अंकाची मैफलदेखील मस्त रंगायची.  गाण्याचं अंग, शास्त्रीय संगीताची जाण, शब्दफेकीतील सहजता अशा चंदू सोमणच्या जमेच्या बाजू, म्हणूनच चंदू सोमणचा ‘महानिर्वाण’मधला रोल हा लाइफटाइम रोल म्हणून  ओळखला जातो. चंदू सोमणच्या अनुपस्थितीत सेवल्याने आणि विद्याधरने  म्हटलेलं मला स्पष्ट आठवतंय, ‘मास्तर जर  व्यावसायिक रंगभूमीवर घुसला असता तर एक नट म्हणून खूप यशस्वी राहिला असता,’ जे चंदू सोमणला फक्त पॅथॉलॉजिस्ट म्हणून ओळखतात त्यांना त्याच्या अभिनय कौशल्यावर सांगूनदेखील विश्वास बसणार नाही. दोन गोष्टी चंदू सोमणच्या बाबतीत  घडायला पाहिजे होत्या, असं मला वाटतं. एक तर या माणसाने व्यावसायिक रंगभूमीवर घुसायला पाहिजे होतं आणि दुसरं म्हणजे लाइफमधून इतक्या लवकर एक्झिट घ्यायला नको होती. आपल्याला वाटून काय उपयोग? शेवटी जे विधिलिखित आहे ते घडणारच. चंदू सोमण एक चांगला  कलाकार तर होताच; तो एक ‘बेश्ट’ माणूस होता. 

- डॉ. किशोर अतनूरकर, नांदेड
बातम्या आणखी आहेत...