आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इफ्फी... रोपटं आता वाढतंय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोव्याची राजधानी पणजीमध्ये ४७ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) अर्थात इफ्फीचा सोहळा यंदा अत्यंत झगमगाटात आणि उदंड प्रतिसादात पार पडला. भारतीय रसिकांसाठी खरं तर दर्जेदार महोत्सवाचा आनंद मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणून इफ्फीकडे पाहिल्या जाते. त्यातच मनोहारी समुद्रकिनारा अन् बहारदार वातावरणाने नटलेल्या गोव्यामध्ये याचे आयोजन म्हणजे एक वेगळीच पर्वणी.

यंदा २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत चंदेरी दुनियेतील तारेतारका, अद्ययावत तंत्रज्ञानाचे विलक्षण सादरीकरण व दर्जेदार कथानकांच्या मेजवानीसह इफ्फीचा सोहळा पार पडला. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), कला अकादमी, आयनॉक्स चित्रपटगृह, मॅकनीज सभागृह व श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमसोबतच मिरामारचा समुद्रकिनाराही यंदाच्या इफ्फीचा साक्षीदार ठरला. आंतरराष्ट्रीय चित्रपट, भारतीय पॅनोरमा व विशेष प्रकारांमध्ये यंदा २९६ चित्रपटांची निवड झाली होती. इफ्फीच्या आजवरच्या सहा दशकांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग झाल्या. प्रतिमेच्या गुणावगुणांवर अाधारित ‘आफ्टरइमेज’ असो की जपानच्या पारतंत्र्यात असताना दक्षिण कोरियाचे १९२० मधील वास्तव दाखवणारा ‘द एज आॅफ शॅडो’. यांपैकी एकाने महोत्सवाची सुरूवात तर दुसऱ्याने शेवट. गुणवत्ता निवडीबाबत परिक्षकांना यासाठी पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील. नेमके याच ठिकाणी इफ्फीच्या दर्जाचे कौतुक होते.

मागील सहा दशकांमधील शेवटची चार वर्षे सोडली तर इफ्फीचे आयोजन हा परंपरागत चालरितींचा भाग बनला होता. यात वैविध्य दिसायला लागले ते मागील चार वर्षांत. अर्थातच यामागे महोत्सव ठिकाणाचे वलय, नवतंत्रज्ञान, चांगल्या नियोजनासोबतच समीक्षक, दिग्दर्शक, कलाकार अन रसिकांचा महोत्सवाप्रती बदललेला दृष्टीकोण या गोष्टीही तितक्याच महत्वपूर्ण आहेत. कोणतेही चित्रपट महोत्सव यशस्वी ठरण्यामागे हेच घटक परिणामकारक ठरत असतात. त्यातही हा महोत्सव आंतरराष्ट्रीय बनवायचा असेल तर देशी रसिकांसमोर विदेशी चित्रपट दाखवले जाणे, इतकीच बाब पुरेसी नसते. देशीविदेशी समीक्षक आणि रसिक एकत्र येऊन दोन्हीकडील चित्रपटांचे अवलोकन करणे महत्वाचे ठरते. यंदाच्या इफ्फीमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवली. मग, निशांतराय बोंबार्डे या नवोदित मराठी दिग्दर्शकाचा ‘दारवठा’ या लघूपटाला किंवा गौतम घोष या सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाच्या ‘शांखोशील’ या चित्रपटाला थेट विदेशी समीक्षक, कलाकार आणि चित्रपटप्रेमींनी दिलेली दाद असो की, ‘डॉटर’, ‘अपॉलॉजी’ किंवा ‘ऑन द अदर साइड’सारख्या विदेशी चित्रपटांसाठी मराठी, गोवन आणि भारतीय चित्रपट रसिकांनी केलेली गर्दी असो. यावरुनच इफ्फी आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय झाल्याचे दिसून येते. विविध वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यांचे प्रक्षेपण पाहिल्यानंतर आपण एका वेगळ्याच आभासी जगात हरवून जातो. या हरवण्यामागे तंत्रज्ञानाची कमाल हे मुख्य कारण असते.

मात्र, इफ्फीसारख्या सरकारी शिष्टाचारात अडकलेल्या महोत्सवानेही त्या तंत्रज्ञानाची कास धरून रसिकांना खिळून ठेवणे कौतुकास्पद आहे. पणजीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी या भव्यदिव्य इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या उद्घ्ाटन समारंभात अशाच हॉलिवूडमध्ये वापरले जाणारे ‘बार्को’ हे अभिनव तंत्रज्ञान वापरण्यात आले. इफ्फीचा मोर अशाच तंत्रज्ञानातून जेव्हा स्टेडियममध्ये अवतरला तेव्हाच रसिकांना यंदाच्या वेगळेपणाची जाणीव झाली होती. इएसजीच्या प्राचीन आणि भव्य चिरेबंदी वाड्यावर करण्यात आलेल्या रोषणाईने केवळ प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणेच फेडले नाही. तर, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असावा तर असाच, या निश्चयावरही शिक्कामोर्तब केले. मुळात या सर्व बाबी जरी गोडगोजिऱ्या वाटत असल्या तरी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा लोकप्रियतेच्या बाबतीत अन्य आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या तुलनेत बराच मागे आहे. मग तुलना कान्सशी असो की बर्लिन चित्रपट महोत्सवाशी. या महोत्सवाच्या यशामागे दडले आहे लोकप्रियतेचे वेगळेच रसायन. जगभरातील विविध चित्रपट दुनियेतील मातब्बर तसेच प्रचंड लोकप्रियता असलेल्या सेलिब्रिटींची वर्दळ ही कान्स आणि बर्लिन महोत्सवाला लाभलेल्या वलयामागचे खरे कारण आहे. पूर्वोत्तर-पाश्चिमात्य, हॉलिवूड-बॉलिवूड ते थेट प्रादेशिक चित्रपटसृष्टीमधील अव्वल आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तारेतारकांची या महोत्सवांना आर्वजुन हजेरी असते. मात्र, इफ्फीच्या बाबतीत ही दुर्देवाची बाब आहे.

आंतरराष्ट्रीय महोत्सव या नात्याने याठिकाणी हॉलिवूड किंवा अन्य राष्ट्रांतील लोकप्रिय सेलिब्रिटी याठिकाणी उपस्थित असावेत अशी रसिकांची अपेक्षा तर आहेच. मात्र, किमान बॉलिवूड, मराठी किंवा दक्षिणेतील चित्रपटांचे नामांकित कलाकार तरी महोत्सवात असावेत अशी त्यांची भोळीभाबडी आशा असते. खंत इथंच वाटायला लागते की इफ्फीसारख्या महोत्सवात आपल्याकडे न विदेशी कलाकारांची जास्त वर्दळ दिसते अन ना ही भारतीय कलाकारांची. बोटावर मोजण्याइतके अन चरित्र भूमिकांमधून किंवा अगदीच संस्कारपूर्ण चित्रपटांमधून झळकणाऱ्या कलाकारांचीच याठिकाणी हजेरी असते. असे कलाकाराच या ठिकाणी येतात म्हणजे किरकोळ प्रकार असा म्हणण्याचा येथे उद्देश नाही.

खऱ्या अर्थाने हा महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकच लोकप्रिय करावयाचा असेल तर त्यात लोकप्रिय चेहऱ्यांचा, नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असायला हवा. यंदाच्या इफ्फीमध्ये थोड्याफार प्रमाणात असा प्रयत्न झालासुद्धा. रमेश सिप्पी, एसपी बालसुब्रमण्यम, नाना पाटेकर, महेश मांजरेकर, मुकेश खन्ना, सुशांतसिंग राजपुत अशा काही चेहऱ्यांनी येथील रेडकार्पेटची शान वाढवली. परंतु, यातून आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणवण्याचा उ्ददेश यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही. शेवटी काय तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा शिष्टाचार, तंत्रज्ञान किंवा नियोजनाच्या बाबतीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतो. मात्र, आंतरराष्ट्रीय म्हणवता येईल अशा व्याख्येत त्याची मांडणी करायची असल्यास आपण अद्यापही मागेच असल्याचा भास होतो.
- विवेक एम. राठाेड, उपसंपादक दिव्यमराठी
बातम्या आणखी आहेत...