आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक येताच आठवे, अहमदनगर शहराचा विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्याची कथाच मोठी विलक्षण आहे. विस्ताराने राज्यात सर्वांत मोठ्या असलेल्या या जिल्ह्यातील नेत्यांची राज्याच्या राजकारणावर मोठी छाप असते. या जिल्ह्यातून प्रत्येक मंत्रिमंडळात किमान दोन मंत्री असतात. सध्याच्या मंत्रिमंडळात जिल्ह्याचे तीन मंत्री आहेत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड अशी तिन्ही मंत्रिपदे अर्थातच संपन्न असलेल्या उत्तर भागाकडे आहेत. नाही म्हणायला बबनराव पाचपुतेंमुळे दक्षिण जिल्ह्याकडे काही काळ मंत्रिपद होते. राज्याच्या राजकारणात मोठी छाप असणा-या या नेत्यांचे कर्तृत्व फक्त त्यांच्या भागापुरते मर्यादित राहिले आहे. कारण ‘मतदार’ हाच यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. या अशा आपल्या डबक्यापुरते पाहण्याच्या ‘मंडूक’वृत्तीमुळे त्याच्या कर्तृत्वालाही मर्यादा पडल्या. त्यामुळे त्यांनी नगर शहराच्या विकासात कधीही लक्ष घातले नाही, हे कटू वास्तव आहे. अर्थात त्यांच्या भागातही नागरी सुविधांच्या बाबतीत काही फार मोठा विकास झाला नाही, हेही तितकेच खरे आहे. नगर शहराबद्दल त्यांची मानसिकता केवळ जिल्ह्याचे गाव असल्याने नाइलाजाने सरकारी बैठकांसाठी जिल्ह्याच्या गावी जायचे, अशीच राहिली आहे. शहराच्या विकासाचे आपल्याला काहीही देणेघेणे असल्याचे या नेत्यांनी कधीही दाखवले नाही. त्यांना त्यांच्या प्रभावक्षेत्रातील शहरालाच जिल्ह्याचे ठिकाण बनवायचे आहे. त्यांनी जिल्हा विभाजनाचे भूत उकरून काढलेच आहे. या मोठ्या नेत्यांच्या खुज्या मनोवृत्तीमुळे जिल्ह्याचे गाव असलेले नगर शहर मोठे खेडे बनून राहिले आहे. नगर शहराच्या मागे असलेली नाशिक व औरंगाबादसारखी शहरे विकासाच्या बाबतीत आता खूप पुढे निघून गेली आहेत.
मोठ्या व दूरदृष्टीच्या म्हणवणा-या या नेत्यांमुळेच नगर शहराच्या विकासाबाबत फक्त एकच नाव नगरकरांच्या मनावर कोरले गेले आहे, ते म्हणजे नवनीतभाई बार्शीकर. त्यांच्यानंतर कोणत्याही नेत्याचे नाव शहराच्या विकासाशी जोडले जात नाही. शहराचे वाटोळे करण्यात आपापल्या परीने सर्वांनीच वाटा उचलल्याचा इतिहास आहे. आता अचानक नगर शहर विकासाविषयी या नेत्यांच्या मनी जिव्हाळा दाटून आला आहे. महिनाभरापूर्वी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वांत प्रथम आमदार अनिल राठोड यांच्यावर नगर शहराचा विकास न झाल्याबद्दल टीकास्त्र सोडले. त्याला राठोड यांनी उत्तर दिले. त्यानंतर आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी राठोड यांच्या उत्तराला प्रत्युत्तर म्हणून शहरातील काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रक काढले. शिवसेनेतर्फे त्यालाही उत्तर देण्यात आले. या पत्रकबाजीनंतर पुन्हा नगर शहराचा विकास थंड बासनात गेला.


आता नुकताच शहरातील एका कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा विषय पुन्हा उकरून काढला. पुन्हा टीकेचा रोख आमदार राठोडांवरच होता. या वेळी मात्र या टीकेकडे शिवसेनेतर्फे डोळेझाक करण्यात आली. लवकरच मनपाची निवडणूक होणार असल्याने शहरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांनी ही टीका केली असावी, असे म्हणण्यास मोठा वाव आहे. कारण नगरकरांच्या दैनंदिन समस्यांबाबत कोणताही फरक पडलेला नाही. शहराच्या विकासाच्या चाव्या पूर्णपणे ठेकेदारांच्या हाती गेल्या आहेत. या ठेकेदारीत सर्वपक्षीय नेते सामील आहेत, ही यामागची मेख आहे. कारण कोणतेही काम होताना ते दर्जेदार होण्यासाठी विरोधी असलेली दोन्ही काँग्रेसची नेतेमंडळी आग्रही राहिली, असे कधीही होत नाही. त्यांचे प्रमुख नेतेच उदासीन असल्याने ठेकेदारांना मोकळे रान मिळाले आहे, याला सत्ताधारी, मनपा प्रशासनाबरोबरच विरोधी पक्षही जबाबदार आहेत. कोट्यवधींच्या योजना राबवल्याचे दावे सत्ताधारी व सध्याचे विरोधक (जे पूर्वी सत्ताधारी होते) करतात. पण नळांना पुरेसे वेळेवर येणारे पाणी, कच-याचे योग्य व्यवस्थापन, चांगले गुळगुळीत रस्ते, नागरिकांसाठी सायंकाळी घटकाभर मन रमवण्यासाठी उद्याने, या मूलभूत सुविधांच्या बाबी स्वप्नवतच ठरल्या आहेत. याला कारणही हेच नेते आहेत.


अशा स्थितीत अचानक काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना नगर शहराचा विकास आठवल्याने नगरकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूक जशी जवळ येईल तशा दोन्ही बाजूंनी टीकेच्या फैरी झाडल्या जातील. कोणाची तरी सत्ता येईल. पुन्हा ठेकेदारांना अनुकूल धोरणे आखली जातील. पुन्हा नगर शहर विकासाच्या बाबतीत आणखी दहा पावले मागे जाईल, असे नगरकर बोलून दाखवत आहेत.