आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीसाठी शाळा नव्हती म्हणून केली होती राजीनाम्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

@अरुंधती भट्टाचार्य : एसबीआयच्या एमडी आणि सीएफओ
> जन्म : 18 मार्च 1956
> आई-वडील : पी. के. मुखर्जी (इंजिनियर), आई - कल्याणी मुखर्जी होमिओपॅथी डॉक्टर
> कुटुंब व डॉ. प्रीतीमॉय भट्टाचार्य (पती) आयआयटी इंजिनियर. सध्या कन्सल्टंट, मुलगी सुकृता (विद्यार्थिनी)
> शिक्षण : प्राथमिक शिक्षण भिलाईमध्ये, पुढे बोकारो येथे सेंट झेवियर्समधून.
मी लहान असताना आम्ही भिलाईमध्ये राहत होतो. वडील भिलाई स्टील प्लांटमधे इंजिनियर होते. आईचे होमिओपॅथीचे शिक्षण सुरू होते. त्यामुळे रात्र-रात्र जागून आई अभ्यास करायची. तिच्याकडूनच मला सर्वाधिक प्रेरणा मिळाली. त्या वेळी भिलाईमध्ये फार सोयी-सुविधा नव्हत्या. तेव्हा आई घरीच उपचार करायची. आसपासच्या परिसरातील आदिवासींच्या उपचारासाठी ती होमिओपॅथीचा वापर करायची. वडील नेहमी एकाच गोष्टीवर जोर द्यायचे, ते म्हणजे नेहमी अभ्यास करत राहा. आईला अभ्यास करताना पाहून माझे मनही अभ्यासात रमू लागले. पुढे आई होमिओपॅथी डॉक्टर बनली. नंतर ग्रामीण भागातील महिलांना जमवून ती कपडे शिवणे, मसाले तयार करणे अशा कामांमध्ये व्यस्त राहू लागली. त्यामुळे नेहमी परिश्रम घेत राहायला हवे ही भावना माझ्या मनात लहानपणीच निर्माण झाली होती. माझी मावशी पार्वतीही अगदी अशीच आहे. आजही ती माझ्याबरोबरच राहते. माझे वडील नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे. ते माझ्याबरोबर माझ्या दोन बहिणी आणि भावाला नेहमी करिअर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करायचे. लग्नाबद्दल तर कधीच चर्चा होत नसायची. 1977 मध्ये मी एसबीआयमध्ये नोकरीला लागले. एकदा कोणत्यातरी शहरामध्ये माझी बदली झाली होती. त्या ठिकाणी शाळाही नव्हती. त्यामुळे माझ्या मुलीच्या शिक्षणाचे काय ? ही चिंता मला सतावत होती. पदोन्नती होऊन त्या शहरात माझी महाव्यवस्थापक पदावर नियुक्ती झाली होती. पण मुलीच्या शिक्षणासाठी त्या वेळी मी राजीनामा देण्यासाठी मनाची तयारी केली होती. मी तत्कालीन अध्यक्ष एस. एस. वर्मा यांना भेटले. त्या वेळी त्यांनी मला समजावले. इतक्या घाईत निर्णय घेऊ नका. सर्वकाही ठीक होईल, असे ते म्हणाले. पुढे मला मुलीसाठी चांगली शाळा मिळाली. यावरून ही शिकवण मिळते की, कधी-कधी जीवनात आपण आधीच ठरवून टाकतो की, आपल्याला भविष्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. पण जेव्हा ती वेळ निघून जाते तेव्हा असे जाणवते की, ते संकट नव्हतेच किंवा आधीच तो मार्ग खूप सोपा झाला होता. वडिलांनी लावलेली वाचनाची सवय आता छंद बनली आहे. आजही मला हार्पर ली यांनी लिहिलेली ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’ ही कादंबरी खूप आवडते. पुढे यासाठी लेखकाला पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता. त्यावरच ‘मॅकेनाज गोल्ड’चा अभिनेता ग्रेगरी पॅक याचा एक चित्रपटही आला आहे.
(अर्थमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर खासगी जीवनासंबंधी प्रथमच ‘दिव्य मराठी’शी बातचीत)