आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. आणि पँथर फुटली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध कवी, लेखक, बंडखोर विचारवंत अशा अनेक विशेषणांनी गौरव केला जातो ते जिंदादिल ‘पॅँथर’ नामदेव ढसाळ यांनी साहित्यासह राजकारणातही वेगळा ठसा उमटवला होता. दलित पॅँथरची उभारणी, फाळणी व शिवसेनेशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध या मुद्द्यावर टाकलेला प्रकाशझोत...!
1970 च्या दशकात दलित पँथर स्थापन केल्यावर दलित चळवळ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी असावी, यासाठी मी ‘दलित पँथर’चा अट्टहास केला. म्हणूनच त्या वेळी मी भूमिका घेतली आणि संघटनेसाठी जाहीरनामा लिहिला. मान्यवर, पुरोगामी मित्र वगैरे सर्वांना दाखवला होता. पहिल्या टप्प्यात आमचे मित्र राजा ढाले यांना काही त्यात आक्षेपार्ह आढळलं नाही. मात्र, बाबा आढाव यांनी हा जाहीरनामा मार्क्सवादी असल्याचे सांगितले अन् तिथून वादाला सुरुवात झाली. राजा ढाले म्हणाले की, दलितांची चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. राजकारणाचं माध्यम सोडून तिची पूर्तता होऊ शकते, असं काहीतरी रोमँटिक त्यांच्या डोक्यात आहे. टिळक-आगरकरांच्या वेळेला आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय स्वातंत्र्य, असा सवाल उपस्थित झाला होता. तसं हे भांडण होतं. स्वातंत्र्योत्तर काळात घटनेने सर्व त-हेचं संरक्षण दिल्यानंतरही सत्ताधा-यांनी दलितांचं जे शोषण केलं त्याविरोधात केवळ आपण सामाजिक परिवर्तनाची चळवळ करायची म्हणजे काय करायचं? अस्पृश्यता आपल्या संविधानानं नष्ट केली आहे आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार किंवा मार्गदर्शक तत्त्वं आहेत, यात व्यक्ती आणि समष्टी यात दोघांच्याही उन्नयनाच्या, अधिकाराच्या आणि कर्तव्याच्या गोष्टी निहित आहेत. हे सर्व असताना त्या सार्वभौम स्वातंत्र्य देशाने जर दलितांना शोषणाचं बळी केलं असेल, तर ही लढाई कशी लढायला पाहिजे? प्रश्न असा की, सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे आणि हा पूर्वास्पृश्य, हा वेशीबाहेरचा माणूस आहे. त्याच्यासाठी काही करायचं असेल तर त्याचं परत प्रबोधन केलं पाहिजे? बाबासाहेबांनी, फुल्यांनी एवढं प्रबोधन केलंय की, आता गरज आहे कुणाला? उलट स्वातंत्र्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवानंतरही दलितांचा राजकीय पक्ष होणं, हा माझा ‘दलित पँथर’च्या स्थापनेमागे अट्टहास होता.
70 च्या दशकात अमेरिकेतील ब्लॅक पँथरची चळवळ सुरू होती. त्या चळवळीचं वृत्त असलेले टाइमचे अंक राजा घेऊन येत असे. त्यामुळे त्याचं असं म्हणणं होतं की, मी ते अंक आणले आणि त्याविषयी चर्चा केली आणि तुम्ही ही ‘पँथर’ची आयडिया चोरलीत. हे कसं शक्य आहे? कारण ना कधी या विषयावर आमची चर्चा, ना कधी तो आमच्याशी बोलला. यादरम्यान इंदापूर तालुक्यातील बावड्याचं दलित अत्याचाराचं प्रकरण घडलं आणि एलिया पेरूमलचा रिपोर्टही आला. ब्राह्मणगावचं प्रकरणही त्याच काळातलं. ‘सिद्धार्थ विहार’मध्ये राजा ढाले, भगवान झरेकर, वसंत कांबळे, लतिफ खाटीक, काशीनाथ तुतारी, अनंत बच्छाव वगैरे जे लोक होते त्यांना घेऊन आम्ही ‘युवक आघाडी’ काढली. तिने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा आयोजित केला. मुख्यमंत्र्यांना निवेदन वगैरे दिल्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन आम्हाला रिपोर्ट द्या. पण मी आणि ज. वि. पवार यांचं असं म्हणणं होतं की, तिथे जाऊन सरकारला रिपोर्ट कशासाठी द्यायचा? मग सरकार कशासाठी आहे? त्यांच्याकडे पोलिस, गुप्तहेर वगैरे यंत्रणा आहे, तेव्हा सरकारनेच हा रिपोर्ट बनवायला हवा. आम्हा दोघांची ही भूमिका असल्यामुळे राजा वगैरे बावड्याला गेले, तेव्हा त्यांनी आम्हाला तिथे नेलंच नाही.
दरम्यान, ज. वि. पवार आणि माझ्यात चर्चा होतच होती. त्यानंतर काय झालं ते ज. वि. ने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. विशेष म्हणजे ढाले-ढसाळ भांडणात ज. वि. ने राजालाच साथ दिली. सिद्धार्थ कॉलेजच्या वसतिगृहात झालेल्या बावड्यासंदर्भातील बैठकीत आम्ही सभात्याग केला. तिथून येताना अन्याय करणा-यांना जरब बसवणारी एखादी अंडरग्राउंड चळवळ उभारावी, असा विचार आला आणि रस्त्यातच आम्हाला दलित पँथरची कल्पना सुचली.
राजा ढालेचा दलित पँथरच्या स्थापनेशी काही संबंध नाही. आम्ही त्याच्याशी यासंदर्भात कुठलीही चर्चा केली नाही. तो त्याच्या युवक आघाडीचं काम करत होता. नंतर आम्ही स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव हा काळा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळायचं ठरवलं. हा संघटनेचाच निर्णय होता. तो राजा ढालेचा निर्णय कधीच नव्हता. आमची संघटना वाढली. कारण आम्ही दलितांची सर्वाधिक वस्ती असलेला दक्षिण मुंबईचा सगळा परिसर पिंजून काढला. कुठून राजकीय पक्षाकडून मेगाफोन आण, याच्याकडून हे आण, त्याच्याकडून ते आण, असं करून ती वाढवली. रौप्यमहोत्सवाच्या दिवशी रात्री बारा वाजता जो मोर्चा काढला त्यात आमच्याबरोबर इतर पक्षांच्या अकरा तरुण संघटना होत्या. आम्ही भेटून आल्यावर प्रत्येकाचं भाषण झालं. मी अत्यंत कठोर भाषण केलं. अगदी वसंतराव नाईकांचं लफडंही बाहेर काढलं. तेव्हा हुसेन दलवाईने आक्षेप घेत, नामदेव ढसाळ या आघाडीत असेल, तर आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, अशी भूमिका घेतली. तरीही आम्ही आमची संस्था चालवली. नंतर आम्ही जगजीवनराम यांच्यापुढे निदर्शनं केली, तेव्हा कशाला आपल्यात भांडण, म्हणून राजा ढाले यांच्या हस्ते 64 लोकांचा सत्कार केला. अशा रीतीने राजा दलित पँथरमध्ये आला. पण पहिल्यापासून त्याची मानसिकता ही अशी होती.
बाळासाहेबांशी दोस्ती
*संजय परब
दलित पँथर व शिवसेना एकमेकांचे कट्टर दुश्मन होते. त्या काळी समाजाच्या तळागाळात काम करणा-या या संघटनांचे प्रमुख नामदेव ढसाळ व बाळासाहेब ठाकरे कधी काळी एकत्र येतील अशी कल्पना कुणी स्वप्नातही केली नव्हती. पण... एक घटना घडली आणि कडवा पँथर बाळासाहेबांचा जिगरी मित्र झाला! वगसम्राट दादू इंदुरीकर यांचा ‘गाढवाचं लग्न’ हा वग सुपरहिट होता आणि इंदुरीकर हे ढसाळांचे नातेवाईक होते. एका गावात त्यांचा फड जाळून टाकण्यात आला. त्यामुळे इंदुरीकरांचे अवसानच गळाले. या पडत्या काळात ढसाळांना का कोणे जाणे बाळासाहेब हेच आधार वाटले आणि त्यांनी शंकरराव अवसरीकर यांना घेऊन थेट मातोश्री गाठली. झाला प्रकार सांगितल्यानंतर बाळासाहेबांनी तातडीने काही लाखांची मदत करून इंदुरीकरांचा फड उभारून दिला. या एका घटनेने बाळासाहेबांकडे बघण्याची ढसाळांची दृष्टीच बदलली आणि ही दोस्ती शेवटपर्यंत टिकली...
‘सामना’तील एका विशेष लेखात ढसाळ यांनी ही आठवण सांगितली आहे. फड उभारून दिल्यानंतर आनंदित झालेल्या ढसाळ व इंदुरीकरांनी बाळासाहेबांना तमाशाचं खास निमंत्रण दिलं. शिवसेनाप्रमुख या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. यानंतर ढसाळ व बाळासाहेबांच्या वरच्यावर भेटी होत राहिल्या. मुळात दोघेही राजकीय नेते असले तरी साहित्य आणि कला हा दोघांच्याही जिव्हाळ्याचा होता. एक जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि दुसरे जागतिक दर्जाचे कवी. म्हणूनच ढसाळ या लेखात म्हणतात, ‘बाळासाहेबांविषयी त्या वेळी हजारो दलितांच्या मनात असलेली रागाची भावना माझ्याही मनात घर करून होती, पण त्यांच्या सहवासात ती कधी गळून पडली हे मलाच कळले नाही. इतक्या खुल्या काळजाचा माणूस जातीयवादी असूच शकत नाही, हे मला मनोमनी पटले आणि मी त्यांचा सुहृद झालो.’
बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे यांचे सामाजिक विचार सारखे असल्याने प्रबोधनकारांविषयी ढसाळांच्या मनात नेहमीच आदराची भावना असायची. मात्र सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांविषयी ढसाळांचे मत प्रतिकूल होते. मात्र, त्यांचा सतत सहवास वाढल्यानंतर दलित व सवर्णांमधील दरी बुजवून टाकली पाहिजे, यावर दोघांचेही एकमत झाले. आता जो शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग रिपाइंने केला तो दोन दशकांपूर्वीच बाळासाहेब व ढसाळांनी केला होता... त्या वेळी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसला तरी ब-याच प्रमाणात बाळासाहेबांविषयी दलित तरुणांच्या मनातील राग कमी झाला आणि सामाजिक अभिसरणाचा हा मोठा प्रयोग ठरला... असं विश्लेषण रिपाइंचे अध्यक्ष व दलित पँथरमधील ढसाळांचे सहकारी राहिलेले रामदास आठवले करतात.
सर्वकाही समष्टीसाठी...
बाळासाहेबांवर जातीयवादांचा आरोप करून काँगे्रसने दलितांच्या मनात नेहमीच त्यांच्याविषयी भीतीचा राक्षस उभा केला. उलट बाळासाहेबांनी जात-पात कधी मानली नाही. साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, कोष्टी, दलितांना नेते केले, मंत्री बनवले... काँगे्रसला इतकी वर्षे सत्ता भोगून जे जमले नाही, ते बाळासाहेबांनी करून दाखवले. ‘सर्वकाही समष्टीसाठी’ या सामनातील स्तंभलेखात ढसाळांनी मांडलेले हे विचार आहेत. एक दशक सुरू असलेला आपला हा स्तंभ बाळासाहेब नेहमी वाचायचे... चांगला वाटला तर शाबासकी द्यायचे, पण खराब झाला तर ‘काय रे, पाट्या टाकल्या का?’ असे म्हणून दरडवायचेही... असे आपल्या विशेष लेखात सांगताना ढसाळांनी आडपडदा ठेवलेला नसतो.