आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेल्सन मंडेला : पिचलेल्यांचा मुक्तिदाता, विश्वाचा महानायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1989 मध्ये मंडेला 71 वर्षांचे होते. आयुष्याच्या सायंकाळी त्यांना तुरुंगांच्या गजाआडूनच स्वातंत्र्याचा पहिला किरण दिसला. 27 वर्षांनंतर 11 फेब्रुवारी 1990 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. त्यांचा 50 वर्षांचा राजकीय संघर्ष दक्षिण आफ्रिकेच्या मातीला आपल्या रंगात न्हाऊ घालू लागला होता. तो रंग होता समता आणि स्वातंत्र्याचा! ज्यात काळ्या आणि गो-यांत कोणताही भेदभाव मानला जाणार नव्हता.
नावाचा अर्थ
त्यांच्या वडिलांनी लाडाने त्यांचे नाव रोहिल्हाला ठेवले होते. त्याचा अर्थ झाडांच्या फांद्या तोडणारा किंवा लाडका खोडकर मुलगा असा होता.
वलय कशामुळे?
गो-या सरकारच्या वर्णभेदी धोरणाचा कडाडून विरोध करणारा नेता. 27 वर्षे रोबेन बेटावरील तुरुंगात डांबले गेले. नंतर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष बनले.
राजघराण्यात जन्म
नेल्सन मंडेलांचे कुटुंब त्या देशातील राजघराण्याशी संबंधित होते. अठराव्या शतकात मंडेला कुटुंब त्या परिसरातील प्रमुख राज्यकर्ते कुटुंब होते. परंपरेप्रमाणे घरातील एखादा मुलगाच गावाचा प्रमुख व्हायचा. युरोपकडून गावे ताब्यात घेईपर्यंत ही परंपरा सुरूच होती.
वडिलांचेही तीन विवाह
मंडेला हे त्यांच्या वडिलांची तिसरी पत्नी नेक्युफी नोस्केनी हिच्यापासून झालेले पहिले अपत्य होते. एकूण तेरा भावांमध्ये ते तिस-या क्रमांकाचे होते. कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे ते राजघराण्याचे सल्लागार होतील, अशी लोकांची अपेक्षा होती; पण मंडेलांच्या मनात दुसरेच काही खदखदत होते.
वर्णभेदांच्या चटक्यांतून जन्मला क्रांतिकारक
विद्यार्थिदशेत त्यांना तुझा रंग काळा आहे, अशी दररोज हटकून आठवण करून दिली जायची. रस्त्यावरून ते ताठ मानेने चालू शकत नव्हते. तसे केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते. याच अन्यायामुळे त्यांच्यातील क्रांतिकारक घडवला.
मंडेला निवृत्त झाले आहेत असे लोकांना वाटत होते; पण ते स्वत: तसे मानत नव्हते. 1997 मध्ये ते म्हणाले होते :
सर्वांसाठी शांतता, रोजगार, अन्न, पाणी आणि मीठ मिळायला हवे, असे माझे स्वप्न आहे. आपण एकमेकांचा आत्मा, शरीर आणि मन समजून घेऊ शकू आणि एकमेकांच्या गरजांची पूर्तता करू शकू. अशा जगाची निर्मिती करण्यासाठी आम्हाला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. आम्हाला मजल-दरमजल करत तो पल्ला गाठायलाच हवा...
जेथे अटक, तेथेच स्मारक
हॉविकमध्ये मार्को सियानफनेली यांनी 1962 मध्ये हे स्मारक बांधले होते. स्मारकात 21.32 फुटांपासून 29.52 फूट उंचीचे स्टीलचे 50 कॉलम आहेत. येथे मंडेलांना अटक करण्यात आली होती.
जागतिक नेत्याचे अज्ञात पैलू
देश स्वतंत्र करण्यात यश, पण कौटुंबिक जीवनात अस्थैर्य
दक्षिण आफ्रिकेतील लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणारे नेल्सन मंडेला राजकीयदृष्ट्या भलेही यशस्वी व्यक्तिमत्त्व मानले जात असले तरी त्यांचे खासगी आणि कौटुंबिक जीवन नेहमीच अस्थिर राहिले. वडिलांप्रमाणेच त्यांनी तीन लग्ने केली. पहिले लग्न यशस्वी ठरले नाही, दुसरेही मोडले. 80 वर्षांचे वय झाल्यानंतर त्यांनी तिसरे लग्न केले.
पहिले लग्न
इव्हेलिनसोबत 1944 मध्ये
० परिचारिका इव्हेलिनशी विवाह. मंडेला यांचे तुरुंगातील मित्र वॉल्टर सिसुलू यांची बहीण. तिच्यापासून दोन मुले आणि दोन मुली.
० हे लग्न 13 वर्षे टिकले. मंडेला यांच्या प्रेमप्रकरणामुळे इव्हेलिन नाराज होती. त्यामुळे शेवटी 1957 मध्ये तिने घटस्फोट घेतला. मुलगा थेंबीचा 1969 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी मृत्यू झाला. त्या वेळी मंडेला तुरुंगात होते. त्यांना मुलाच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ दिले नव्हते. दुसरा मुलगा मॅकगाथो लेव्हनिका मंडेलाचा 6 जानेवारी 2005 रोजी एड्सने मृत्यू झाला.
दुसरे लग्न
विनीसोबत 1958 मध्ये
०विनिफ्रेड माडिकिजेलापासूनही दोन मुली झाल्या. त्याच वेळी स्वातंत्र्यासाठी लढणा-या मंडेलांना अटक करण्यात आली. त्या वेळी विनीनेच वर्णभेदविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले. ती मंडेलांपेक्षाही जास्त शक्तिशाली बनली होती.
०त्यांना राष्ट्रमाता म्हटले जाऊ लागले होते. नंतर विनीवर खून आणि अपहरणाचे आरोप झाले. खटला चालेपर्यंत मंडेला तिच्यासोबत राहिले, परंतु विनीची निर्दोष मुक्तता होताच दोघे विभक्त झाले. तरीही मुलगी जिंजी नेहमी वडिलांबरोबरच राहिली.
तिसरे लग्न
ग्रासा मसेलशी 1998 मध्ये
@ 1998 मध्ये आपल्या 80 व्या वाढदिवशी मंडेलांनी तिसरे लग्न केले. या वेळी मोझाम्बिकचे माजी अध्यक्ष स्व. समोरा मसेल यांची पत्नी ग्रासा मसेल त्यांची पत्नी झाली.
@ कधी काळी समोराही मंडेलाबरोबर राहिले होते. विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी प्रशासनानेच हा अपघात घडवून आणल्याचे सांगण्यात येते. ग्रासा मंडेलाला नेहमीच सामान्य माणूस मानत आली, संत नव्हे!