आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजडी अन् गावरान मटण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नामदेव ढसाळ हे पट्टीचे खवैये होते. त्यांना केवळ रुचकर पदार्थ खाण्याचीच आवड नव्हती, तर आपल्या हाताने मटणाच्या वेगवेगळ्या डिशेस करून खाऊ घालणेही त्यांना आवडत असे. आपल्या या आवडीमुळे त्यांनी मुंबई येथील अंधेरी उपनगरात लिंक रोड येथे ‘रॉयल इन’ नावाचे मल्टीकुजिन हॉटेल सुरू केले होते. तत्पूर्वी नामदेव ढसाळ यांनी ‘मुगल दरबार’ हॉटेलमध्ये काही काळ इंटर्नशिप केली होती.मुगल दरबारमधला अनुभव, खाण्या-खिलवण्याची आवड यामुळे त्यांनी आपल्या रूपकुमार मधानी नावाच्या मित्राबरोबर हे हॉटेल सुरु केले होते. अंधेरी पश्चिमेच्या उच्चभ्रू वस्तीत त्यांनी सुरू केलेल्या या हॉटेलमघ्ये गावरान भाक-या, बंद मडक्यातील धगीवर शिजणा-या मटणापासून वजडीपर्यंतचे पदार्थ उपलब्ध करून दिले होते. केवळ श्रीमंतानाच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही जेवणाचा आनंद घेता यावा, यासाठी त्यांनी खाद्यपदार्थांचे दरही वाजवी ठेवले होते.
नामदेव ढसाळ स्वत: कुकना चहाच्या रेसिपीपासून वजडीच्या रेसिपीपर्यंतची माहिती देत असत. त्यांनी स्वत: हाताने बनवलेल्या या डिशेस खवैयांना पसंतही येत असत. साहित्यात रमणा-या नामदेव ढसाळांनी अनेकदा आपल्या अनेक साहित्यिक मित्रांना आपल्या या हॉटेलमध्ये खास बोलावून खिलवले होते. हॉटेलमधील डिशेसची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेले मेन्यूकार्डही त्यांच्या कलंदर वृत्तीचाच एक नमुना होते. ढसाळांची पत्नी मल्लिका यांनी वेगवेगळ्या डिशेससाठी कविता केल्या होत्या. रोटी चांद की तरह चमकती हैं, पैरों के छालों को कौन देखता है, छू लो आसमान को यार, असे म्हणत खवैय्यांना वणवण विसरून पोटाकडे लक्ष देण्याचे आवाहन करणारी कविता हॉटेलात येणा-यांना प्रचंड आवडली होती. मात्र व्यवसायाची गणिते फिसकटली आणि दोन वर्षातच हे हॉटेल नामदेव ढसाळ यांना बंद करावे लागले. एकेकाळी ब-यापैकी पैसा गाठीशी असलेल्या ढसाळांना आजारपणात मात्र पैसा घालवावा लागला. आर्थिक चणचण असल्याने आता घर कसे चालवावे असा प्रश्नही अखेरच्या काळात त्यांच्यापुढे उभा राहिला. जेथे काही वर्षांपूर्वी ढसाळांचे हॉटेल होते, सध्या या ठिकाणी दुसरे हॉटेल सुरु आहे.