आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजी-नाराजीत अडकली युवती राष्ट्रवादी काँग्रेसची भरारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवा वर्गात, खासकरून महिला वर्गात मनसेबाबत प्रचंड क्रेझ असल्याचे बघून सर्वच राजकीय पक्षांपुढे आता ही व्होट बँक कशी मिळवायची असा प्रश्न आहे. मात्र, हा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्‍ट्रवादीने जलदगतीने पावले उचलली. त्यातूनच राष्‍ट्रवादी युवती कॉँग्रेसचा जन्म झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनीच राष्‍ट्रवादी युवती कॉँग्रेसचे सुकाणू हाती घेतल्यामुळे झटपट पायाभरणी झाली. जिल्ह्या -जिल्ह्यात सुळे यांनी स्वत: जाऊन चाचपणी केली. त्यानंतर विभागीय मेळावे घेऊन राष्‍ट्रवादीच्या वजनदार नेत्यांना उतरवण्यात आले. त्याद्वारे केवळ महिलांना 50 टक्के आरक्षणच दिले नाही तर सक्षम महिला नेतृत्व उभे करण्याचीही राष्‍ट्रवादीला तळमळ आहे हे दाखवून देण्यात आले. त्यासाठी युवतींना केंद्रस्थानी ठेवून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्याची प्रक्रिया पार पडली. आजघडीला, राष्‍ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या विस्ताराची प्रक्रिया गतिमान झाली असून त्यातूनच काही समन्वयक, संघटकांसारखी पदेही निर्माण केली गेली. संघटनात्मक बांधणी व युवतींच्या प्रश्नावर लक्षवेधी आंदोलने सुरू झाली. मात्र, या आंदोलनाला पाहिजे तसे बळ म्हणा वा पाठिंबा राष्‍ट्रवादीच्या मूळ संघटना किंबहुना युवक आघाडीकडूनही मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.


नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या राष्‍ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्‍ट्र शिबिरातून त्याची प्रचितीही आली. या शिबिराचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन व कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते समारोप एवढेच होते की काय, असा प्रश्न पडला. मुळात शिबिराच्या आयोजनालाच सुरुवातीपासून नाराजीचे ग्रहण लागले. 11 सप्टेंबरला विभागीय विद्यार्थी मेळावा व जोडीला युवतींचे शिबिर घेण्याकरिता खुद्द खासदार सुप्रिया सुळे यादेखील नाशिक दौ-यावर येणार होत्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने युवा जनाधार मिळवण्याचा प्रयत्न होता. मात्र, पालकमंत्री छगन भुजबळ यांची उपलब्धता नसल्यामुळे विभागीय विद्यार्थी मेळावा रद्द झाला. त्यानंतर शिबिर रद्द करण्याचाही विचार समोर होता. मात्र, सुळे यांनी स्वत: सूचना देऊन शिबिर कोणत्याही परिस्थितीत घ्याच, असे आदेश दिले.


शिबिराचे नियोजन झाल्यानंतर प्रदेशस्तरावरून नेत्यांनी येण्यासाठी अनुकूलता दर्शवली. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांना ‘निरोप’ न गेल्यामुळे त्यांची देहबोलीपुरतीच उपस्थिती शिबिरातून जाणवली. युवती काँग्रेसकडून स्थानिक पदाधिका-यांशी योग्य समन्वय न साधला गेल्यामुळे वरिष्ठ नेते नाराज झाले, तर पालकमंत्र्यांना निरोप दिल्यानंतर स्वतंत्र निरोप देण्याची गरज नाही या धारणेतून युवती कॉँग्रेसचे समन्वयकही गाफील राहिले. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती नसती तर स्थानिक नेते कार्यक्रमाला फिरकले तरी असते का, अशीही भीती त्यातूनच व्यक्त केली जात होती. स्थानिक पातळीवरील दोन गटांतही यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन झाल्याची चर्चा आहे. शिबिर रद्द करण्याची वेळ आली असताना पक्षातील एका आमदाराने ‘बुस्ट’ देत युवती कार्यकर्त्यांना हुरूप दिल्याचेही सांगितले जाते. राष्‍ट्रवादीसारखा मोठा पक्ष असूनही या शिबिराला नजरेत न भरण्याइतक्याच युवतींची उपस्थिती होती. त्यामुळे वक्तेही पाहिजे तसे खुलून मार्गदर्शन करू शकले नाहीत, असे खुद्द आयोजकांनीही खासगीत कबूल केले. एकूणच पाहता, युवती काँग्रेसचा मूळ उद्देश राष्‍ट्रवादीच्या मुख्य संघटनेला बळकटी देण्याचा असला तरी प्रत्यक्षात मुख्य प्रवाहातील नेत्यांना 50 टक्के महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर युवती काँग्रेसला बळ देण्यात फारसा रस नसल्याचे दिसून आले.


राष्‍ट्रवादीकडील गृहखातेच ‘लक्ष्य’
राष्‍ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यक्रमात आता विषयही नेहमीचेच झाले आहेत. उद्घाटनाच्या भाषणात गल्लीबोळात टवाळखोरांकडून होणारी छेडछाड, हुंड्यासाठी होणारा छळ व त्यावर शिवराळ भाषेतील टोलेबाजीमुळे खुद्द प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हेदेखील काहीसे नाराज झाले. त्यातूनच त्यांनी निव्वळ भाषणबाजी नको तर प्रत्यक्ष राजकारण व समाजकारण कसे करायचे याचे जास्तीत जास्त धडे व तेही प्रात्यक्षिकांच्या रूपाने देण्याचा सल्ला समन्वयकांना दिला. राज्याचे गृहखाते राष्‍ट्रवादीकडे असूनही कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबाबत जाहीरपणे युवती कॉँग्रेसकडून टीका होत असल्यामुळे नेहमी नेहमी घरचा आहेर कितीदा देणार, असेही सवाल याच पक्षातील नेत्यांकडून खासगीत केला जात आहे.