आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंकण्याजोगं अर्ध जग जिंकलं : अर्ध उरलंच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तसं पाहिलं तर वेधशाळेनं अवेळी पावसाचं भाकीत केलेलं नव्हतं किंवा फलंदाजांना लवकरचं विमान पकडण्याची घाई नव्हती अन् दीड तासातच शिखर सर करण्याच्या पैजा भारतीयांनी बहुधा लावलेल्या नव्हत्या. मग संयमित खेळासाठी प्रसिद्ध असलेला भारताचा हंगामी संघनायक अजिंक्य रहाणे इतका पेटून का उठला होता? पाहुण्यांचे प्रमुख अस्त्र असलेल्या व ताशी किमान १४६ किमी वेगाने सतत उसळता मारा करणाऱ्या, उंच्यापुऱ्या व धडधाकट कमीन्सला आल्याआल्या दोन चौकारांसह दोन षटकार खेचण्याची हिंमत अजिंक्यकडे आली कुठून आली? 

धरमशालातील चौथी कसोटी, त्यासह मालिका अन् त्या ओघात बॉर्डर-गावसकर करंडक जिंकण्यासाठी भारताला आव्हान होते किरकोळ, फक्त १०६ धावांचं. पण अशी किरकोळ आव्हानं फसवी ठरू शकतात. हाताशी भरपूर वेळ आहे, म्हणून फलंदाज सावधचा नव्हे, तर घाबरट खेळ करू लागतात अन् होत्याचं नव्हतं होऊन जात असतं. सुमारे दीड वर्षापूर्वी श्रीलंकेत गॉलच्या खेळपट्टीवर भारतानं सामना गमावला होता. आता तसं काहीही होऊ न देण्याचा निर्धार होता, कर्णधार रहाणेचा व राहुलचा. 

स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर गॉलला भारतीय फलंदाज आक्रमकता विसरले होते! रहाणे(३६), धवन (२८) व अमित मिश्र (१५) सोडून सारे श्रीलंकन फिरकीचे पटापट शिकार झाले. राहुल, रोहित, कोहली, सहा, अश्विन, हरभजन या सहा जणांच्या मिळून केवळ १८ धावा! त्या दौऱ्यावर जडेजा वा ओझा असा डावरा स्पिनर वगळण्याची चूक निवड समितीची अन् डावखुऱ्या रंगना हेराथने ४७ धावात सात जणांना तंबूचा रस्ता दाखवत, ती चूक प्रकाशात आणली! 

२०१५च्या स्वातंत्र्यदिनी आलेल्या अपयशातून भारतानं वेळीच बोध घेतला. संघाचे प्रशिक्षकच नव्हे, तर संचालक (!) असलेल्या रवी शास्त्री यांनी संघ-बैठक लावली. सर्वांना बोलायला लावलं. ज्या खेळपट्टीवर त्याआधीच्या दोन डावांत ३६७ व ३७५ अशा साडेसातशे धावा कुटल्या गेल्या, तिथं इतकं बचावात्मक खेळण्याचं कारणच नव्हतं. निव्वळ बचावाचा भित्रेपणा कशासाठी? खेळाडूंत एकमत झालं. प्रतिपक्षाच्या प्रमुख गोलंदाजांवरच चढाई करायची, त्यांनाच ठेचायचं असं सर्वांनी ठरवलं अन् अमलात आणण्यास सुरुवात केली. 

२०१५ ऑगस्ट. गॉलमध्ये आव्हान १७६चं. भारताचा जवाब ४९.५ षटकांत ११२. धावगती षटकात सव्वादोन. गोलंदाजांची प्रमुख जोडी. रंगना हेराथ २१-६-४८-७ अन् कौशल १७.५-१-४७-३ आणि आता २०१७ मार्च. धरमशालात आव्हान १०६चं. भारताचे उत्तर २३.५ षटकांत दोन बाद १०६. धावगती गॉलच्या दुप्पट, षटकात साडेचार धावा. राहुल ७५ चेंडूत नाबाद ५१, तर रहाणे २७ चेंडूत नाबाद ३८, जोडीची नाबाद भागी ५९ चेंडूत साठ धावांची. शंभर चेंडूमागे धावगती राहुलची ६८, तर रहाणेची १३८! अन् या जोडीनं लक्ष्य केलेली गोलंदाजांची प्रमुख जोडी : कमीन्स ८-२-४२-१ अन् लायन ५-०-१९-०! 

रहाणे व राहुल यांचा खास उल्लेख करतानाही, मी स्पष्ट करू इच्छितो की : ते दोघे होते, विराट कोहलीच्या सुमारे १५ जणांच्या पथकातील शूर सैनिक. या विजिगिषू चमूने गेल्या सात महिन्यांत चार पाहुण्या संघांचा फडशा पाडला : न्यूझीलंड ३-०, इंग्लंड ४-०, बांगलादेश १-० अन्  ऑस्ट्रेलिया २-१, त्याआधी द. आफ्रिका ३-० अन् परदेशीच्या यशस्वी मालिकात विंडीजवर २-० व श्रीलंकेशी २-१ अशी फत्ते. गेल्या सहा मालिका जिंकताना २० पैकी चौदांत जय व फक्त दोन झुंजींत पराजय अन् दहा-बारा वर्षांपूर्वींच्या मालिकांत झिम्बाब्वेवर २-० अन् पाकिस्तानवर १-० अशी सरशी. विंडीजमधील आठ देशांसह म्हटले तर दहा, म्हटले तर १७ देशांच्या या छोट्या दुनियेत आता जिंकण्याजोग जगच जणू उरलेलं नाही! 

कसोटी खेळणाऱ्या दहा वा सतरा देशांत भारत पुन्हा एकदा अव्वल अभिनंदन! पण जरा अंतर्मुख होऊया. कारण येत्या दोन वर्षांत, इंग्लंड-दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड या देशांचा दौरा करण्याची भारताची पाळी असेल. तेथील खेळपट्ट्यांवर या विजयांची बहुतांशी पुनरावृत्ती करू शकलो - तरच आणि तरच, हे यश पूर्णत्वास नेलेलं असेल. 

एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा केवढा दबदबा! रिची बेनॉ, बॉबी सिंप्सन, बिल लॉरी यांच्या कांगारूंविरुद्ध, जसू पटेल (कानपूर), चंद्रशेखर व बापू नाडकर्णी (मुंबई) व प्रसन्ना-बेदी (दिल्ली) यांनी एकेक झुंज जिंकवून दिली तेव्हा, स्वर्ग फक्त चार बोटं दूर वाटला होता! मग जमाना आला सचिन, राहुल, सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, कुंबळे, हरभजन, झहीर प्रभृतींचा. अन् गेल्या दोन दशकांत भारतातील आठ मालिकांपैकी सातात भारताने बाजी मारली. भारताचे जय सोळा, ऑस्ट्रेलियाचे पाच! पण याच कालावधीत ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवरचे चित्र साफ पालटलेले. ऑस्ट्रेलिया १२-२! दक्षिण आफ्रिकेविरुद्धही चित्र असेच. इंग्लंडबाबतचं छोटं वेगळेपण म्हणजे १९७१ ते २०१७ दरम्यान भारताने इंग्लंडमध्ये चार मालिका जिंकून घेतलेल्या आहेत! थोडक्यात; जिंकण्याजोगं अर्धं जग उरलंय, खुणावतंय, आव्हान देतंय!
बातम्या आणखी आहेत...