आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा डोलारा गीतेवरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवदगीता या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केल्यामुळे काही दिवसांपूर्वी देशात मोठाच वादंग माजला. हिंदुंच्या धर्मग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता दिली तर देशातील इतर धर्मीय मंडळीही त्यांचे त्यांचे धार्मिक ग्रंथांना राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याची मागणी करणार नाहीत काय, हा देश धर्मनिरपेक्ष असल्यामुळे एखाद्या धर्माच्या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून कसे घोषित करता येईल, भारतीय राज्यघटना हीच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असला पाहिजे, असा सूर श्रीमती स्वराज्य यांच्या मागणीला विरोध करताना उमटत आहे. दुसर्‍या बाजूला शाहनवाज हुसेनसारखे भाजपचे नेते सुषमा स्वराज यांचे समर्थन करत आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे अशीही मागणी हुसेन यांनी केली आहे.

न्यायालयानेच केली होती राष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी
भगवदगीतेला अवतीर्ण होऊन ५१५१ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात स्वराज यांनी गीतेला राष्ट्रीय ग्रंथ करण्याची मागणी केली. परंतु, अशी मागणी काही पहिल्यांदाच झालेली नाही. २००७ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेच अशी मागणी केली आहे आणि यासाठी भारतीय राज्यघटनेच्या ‘५१ अ’ या कलमाचा आधारही देण्यात आला होता.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन. श्रीवास्तव यांनी म्हटले की, ‘‘भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात प्रेरणास्रोत राहिलेली भगवदगीता देशाचे धर्मशास्त्र आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय पक्षी व राष्ट्रीय पुष्प या प्रमाणेच गीतेला धर्मशास्त्र म्हणून घोषित करावे. गीता ही भारतीय जीवनपद्धती आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने गीतेचे पालन केले पाहिजे. गीतेतील उपदेश सार्‍या संप्रदायांसाठी आदर्शवत असून, गीतेला राष्ट्रीय धर्मशास्त्राचा दर्जा देण्याची जबाबदारी सार्‍या राज्यांची आहे.’’

अमेरिकेतल्या सर्व चळवळींच्या मुळाशी गीता
मुळात हिंदू धर्म म्हणजे अनेक धर्मांचा समूह आहे. एक जीवनपद्धती म्हणूनही हिंदू धर्माचे वर्णन करण्यात येते. हा धर्म एकच एक धर्मग्रंथावरही आधारलेला नाही. जगातील अन्य धर्मांचा विचार करता हिंदू धर्माचे हे वेगळेपण भगवदगीतेत प्रतिबिंबित झाल्याचे दिसते. हाच वेगळा विचार स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषणातून मांडला होता आणि तो विचार जगाने डोक्यावर घेतला होता. तसे पाहिले तर गीतेचा प्रभाव हा केवळ हिंदूंपुरताच मर्यादित नाही. अत्यंत वेगवेगळ्या संस्कृतीत जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांवरही गीतेचा अपरिहार्य प्रभाव पडल्याचे दिसून येते.

१ फेब्रुवारी १९०० रोजी, अमेरिकेतील पॅसडिना येथील श्रोत्यांना संबोधित करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘... तुमच्या इमर्सन साहेबांनी ज्या उच्च तत्त्वांचा प्रचार केला त्याचे मूळ तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर ऐका - त्याचे मूळ गीताच होय. इमर्सन एकदा सन १८३३ मध्ये इंग्लंडमध्ये थॉमस कार्लाईल यांना भेटायला गेले असताना, कार्लाईल यांनी त्यांना गीतेचे एक पुस्तक भेट म्हणून दिले होते. अमेरिकेत उदारमतवादावर आधारलेली जितकी म्हणून आंदोलने आहेत ती सर्व कॉंकॉर्ड आंदोलनाशी संबंधित आहेत आणि त्याचे मूळ गीता आहे.’’
अमेरिकेतील विख्यात आणि लोकप्रिय मनीषी इमर्सन यांनी आपल्या आयुष्यातील ४८ वर्षांचा काळ कॉंकॉर्ड नावाच्या शहरात घालवला आणि तेथूनच त्यांनी आपले उदार, उदात्त आणि जीवन घडवणारे विचार सार्‍या अमेरिकेत प्रसृत केले, हे येथे ध्यानात घेतले पाहिजे.

वॉरन हेस्टिंग्ज, अल्डस हक्स्लेंवरही प्रभाव
हिंदुस्थानातील पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज हाही गीतेच्या प्रभावापासून मुक्त राहू शकला नाही. कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या परवानगीने वॉरन हेस्टिंग्ज यांनी ३० मे १७८५ रोजी गीतेचा इंग्रजी अनुवाद इंग्लंडमध्ये प्रसिद्ध केला. हे गीतेचे इंग्रजीतील पहिले भाषांतर. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत वॉरन हेस्टिंग्ज लिहितात, ‘जिज्ञासा जागवणारे जे काही सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आजवर सुशिक्षित जगाच्या हाती पडले असतील त्यापैकी ही गीता हा एक विलक्षण ग्रंथ होय.’

विख्यात संस्कृततज्ञ प्रा. मॅक्समूलर यांच्याशी लंडन येथे स्वामी विवेकानंदांची गाठ पडली होती. दोघांच्या ओळखीचे पर्यवसान गाढ आपुलकीत झाले. स्वामी विवेकानंद जेव्हा भारतात परत यायला निघाले तेव्हा ‘मायदेशी पोहोचल्यावर मला अशी एक वस्तू भेट म्हणून पाठवा की जी भारतीयांचे वैशिष्ट्‌य आहे.’ अशी विनंती मूलर यांनी केली. एवढ्या आस्थेने मागितलेली वस्तू स्वामी विवेकानंदांनी त्यांना भारतात परतल्यानंतर अतिशय तत्परतेने पाठवून दिली. ती वस्तू होती भगवदगीता. अल्डस हक्स्ले यांनी भागवदगीतेचे वर्णन शाश्‍वत तत्त्वज्ञान अशा शब्दांत केले आहे.

गीता फक्त हिंदूंसाठी नाही, कारण...
एकांतिक धर्म आणि भारतीय धर्म यामध्ये एक खूप मोठा फरक आहे. तो समजून न घेतल्याने मोठा घोळ झाला आहे. जगातील एकांतिक धर्मांमध्ये ‘माझाच धर्म खरा. माझ्या उपासनापद्धतीचा स्वीकार कराल तरच तुम्ही ईश्‍वरापर्यंत जाल. अन्यथा तुम्ही काफीर किंवा पॅगॉन आहात. तुम्ही नरकात जाल.’ असा विचार मांडण्यात आला आहे. भगवदगीता सांगते, ‘तुम्ही कोणत्याही मार्गाने ईश्‍वराची उपासना करा, शेवटी ती एकाच ईश्‍वरापर्यंत पोचते!’ गीतेचे तत्त्वज्ञान ही तत्त्वज्ञानाची परिपूर्णता आहे आणि हे तत्त्वज्ञान वैश्‍विक आहे. गीता हिंदुंचा धर्मग्रंथ असल्याचे म्हटले जाते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. जगातल्या सर्व मानवासाठी हे तत्त्वज्ञान आहे. गीता असो की उपनिषदे असोत त्यांनी धार्मिक, वांशिक किंवा राष्ट्रीय भेद कधीही कल्पिलेले नाहीत. कारण ज्या काळात हे ग्रंथ रचले तेव्हा विविध धर्म (रिलिजन) अस्तित्वातच नव्हते.

माणसाला कार्यकप्रवण करणारे पुस्तक
हैदराबादवरील लष्करी कारवाईचे प्रमुख जनरल जे. एन. चौधरी यांच्याबद्दलची एक आठवण स्वामी रंगनाथानंद यांनी नोंद केली आहे. स्वामी रंगनाथानंद म्हणतात, ‘मला जनरल चौधरी यांच्या टेबलवर पडलेली गीतेची प्रत दिसली. मी त्यांना प्रश्‍न विचारला, काय आपण भगवदगीता वाचता? तेव्हा ते उत्तरले, होय, मी जेव्हा कमालीचा थकलेला असतो आणि मला मन:शांतीची गरज असते तेव्हा मी गीतेतल्या काही ओळी वाचतो.’ चर्चेतून नंतर जनरल चौधरी यांच्या लक्षात आले की मन:शांती देण्याच्या पलीकडे गीतेला काही प्रयोजन आहे. केवळ मन:शांतीच नाही तर मनाला बळकटी देणे आणि प्रत्येकाला सक्षम, जबाबदार नागरिक बनवणे हेही गीतेचे प्रयोजन आहे. हे केवळ धार्मिक पुस्तक नाही तर ते माणसाला कार्यप्रवण करणारे पुस्तक आहे.

अमेरिकेत लोकप्रिय ठरतेय गीता
भगवदगीता या ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावे की नाही, यावर संपूर्ण भारत देशात मोठा वाद झाला. अमेरिकेत मात्र हा ग्रंथ भलताच लोकप्रिय ठरत आहे. मोटेल म्हणजे मोटरकारने प्रवास करणार्‍यांकरिता, थांबण्याची व आपली कार ठेवण्याची सोय असलेले हॉटेल. अमेरिकेतील मोटलांमध्ये आतापर्यंत १६ हजारहून अधिक गीतेच्या प्रती ठेवण्यात आल्या आहेत. याचे श्रेय इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शस्नेस या संस्थेला आहे. इस्कॉनने गीतेच्या प्रती ठेवण्याचा उपक्रम २००६ मध्ये सुरू केला. १० लाख गीतेच्या प्रती ठेवण्याचे लक्ष्य त्यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.

वॉशिंग्टन डी. सी.मधील मोटेलमध्ये निवास केलेला एक प्रवासी जॉन रॉड्रिग्ज, याने मोटेल मालकाला आभाराचे पत्र पाठवून कळवले की, ‘मोटेलच्या मालकाचे मी आभार मानतो की, त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. यावरून मला, मी कोण आहे?, हे जीवन म्हणजे काय?- याचे ज्ञान झाले. त्यामुळे माझे जीवन अधिक सुखी आणि तणावरहित झाले. माझ्या या सुदैवावर माझाच विश्‍वास बसत नाही. धन्यवाद.’
गीता हा जीवनग्रंथ आहे. पण एखाद्या विषयाला राजकीय रूप आले की योग्य काय आणि अयोग्य काय, हा विचार मागे पडतो. कशी भूमिका घेतली तर आपल्या पक्षाचा फायदा होईल, हाच एकमेव विचार प्रबळ ठरतो. त्यानुसार गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याच्या मागणीला डावे आणि सेक्युलर म्हणवणारे बुद्धीजीवी जीव तोडून विरोध करत आहेत.

गीतेच्या संदेशावरच उभा भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा डोलारा
भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा डोलारा हाच मुळी भगवदगीतेच्या संदेशावर उभा आहे. एकांतिक धर्मीयांचया आक्रमणामुळे आपापल्या मूळ भूमीत देशोधडीला लागलेल्या अनेक धर्मांना भारताने हृदयाशी धरले आणि त्यांना त्यांच्या धर्मासह स्वीकारले. याच्या मुळाशी भारतीय विचारधारा अर्थात भगवदगीताच तर आहे. जगाला देण्यासारखे काही मोलाचे आपल्याकडे असेल तर ती सहिष्णुता अर्थात सर्वच मतांना मानणे ही विचारधाराच होय. जगातल्या सर्वच धर्मांना (उपासनापद्धी/रिलीजन) सामावून घेण्याचा संदेश फक्त आणि फक्त भारतीय तत्त्वज्ञानात आहे आणि भारतीय तत्त्वाज्ञानाचा सार म्हणजे भगवदगीता.
जगाच्या पाठीवरील एकांतिक धर्मीयांच्या धर्मग्रंथांशी गीतेची तुलना होऊ शकत नाही. सत्य हे कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नसते. स्वामी विवेकानदांनी एकदा म्हटले होते, ‘‘समाज कोणताही असो आधुनिक असो की पुरातन, सत्य त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असते. समाजाने सत्याला मुजरा केला पाहिजे अन्यथा तो समाज नष्ट होत असतो. समाजाप्रमाणे सत्य बदलत नाही. समाजाला सत्याप्रमाणे स्वत:ला बदलावे लागते. सत्याच्या साच्यात स्वत:ला बसवावे लागते.’’ (खंड ३ पृष्ठ ८४)

थोडक्यात : गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घाषित करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झोल्यामुळे गीतेबद्दल काही प्रमाणात का होईना नव्या पिढीत जिज्ञासा निर्माण होईल. आणि यातून ती गीतेकडे वळल्यास देशाचे भले होण्यालाच मदत होईल. कारण टिळक, गांधी, भगतसिंग, सावरकर आदी महापुरुषांपासून ते अलीकडच्या काळातील ई. श्रीधरन यांच्यापर्यंत अनेकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली आहे. सक्रीय केले आहे. वाईटातूनही चांगले होते असे म्हणतात ते असे.

सिद्धाराम भै. पाटील
मुख्य उपसंपादक, दिव्य मराठी, सोलापूर
p.siddharam@dbcorp.in