आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूपर्व : पं. जवाहरलाल नेहरूंसमोरची आव्हाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहरूंचे मोठेपण असेल तर ते यात आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतासमोरील प्रश्नांचा त्यांनी विचार सुरू केलेला होता आणि स्वत:च्या मनाशी त्यांनी प्रश्नांच्या उलगड्यासाठी काही दिशा निश्चित केलेल्या होत्या.
नेहरूंची तुलनाच जर करायची असेल तर ती अशा नेत्यांशी केली पाहिजे, जे आपापल्या राष्ट्रांत नव्या युगाचे प्रस्थापक होते. या राष्ट्रनिर्मात्यांपैकी किती जणांसमोर नेहरूंइतके प्रश्न उभे होते, हा पहिला चिंतनीय प्रश्न आहे आणि हुकूमशाही मार्गानेसुद्धा पहिल्या एक-दोन दशकांत या राष्ट्रनिर्मात्यांना काय साध्य करता आले, हा दुसरा प्रश्न आहे.

पं. नेहरू भारतात आधुनिक औद्योगिकीकरणाने समृद्ध असणारे एक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राष्ट्र निर्माण करू इच्छित होते. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना नेहरूंचे हे करणे योग्य वाटणार नाही. कुणी असे म्हणतील की, मुळात लोकशाही राज्यव्यवस्थाच मागासलेल्या देशात यशस्वी ठरू शकत नाहीत, ती उभी करण्याचा प्रयत्नच चुकीचा होता. एखाद्याचा धर्मनिरपेक्षतेवरच आक्षेप असू शकेल. या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे. हिंदू-धर्म आणि परंपरांच्या आधारे हिंदू प्रजा संघटित करणे आणि धर्माच्या नावे संघटित झालेल्या जनतेला राष्ट्र म्हणून बलवान करणे हेच कोणाला रास्त वाटेल. कुणाच्या समोर आधुनिक औद्योगिकीकरणाने भारत व्यापणे ही गोष्टच चुकीची असेल. जीवनाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात आणि म्हणून वेगवेगळ्या अपेक्षाही असू शकतात. जे अस्तित्वात आणण्याची नेहरूंची कधी इच्छाच नव्हती, किबहुना जे अस्तित्वात येऊ नये म्हणून त्यांनी अखंड प्रयत्न केले त्या बाबी डोळ्यांसमोर ठेवून हे नेहरूंनी केले नाही, असा दोष लावण्यात अर्थ नाही. त्यांचे मूल्यमापन करताना जे अस्तित्वात आणण्याची त्यांना इच्छा होती, ते त्यांना कुठवर अस्तित्वात आणता आले, हा पहिला प्रश्न आपण विचारायला पािहजे आणि दुसरा प्रश्न थोडा फार मतभेदाचा म्हणून चर्चिला पाहिजे, तो हा की, नेहरूंचा ध्येयवाद कुठवर हितकारक आणि समृद्ध होता.
आमच्यापुरता आम्ही राष्ट्रवादाच्या संदर्भात विचार करीत आहो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वाटचालीत नेहरूंची पावले देशाच्या बळकटीच्या दृष्टीने किती हिताची होती आणि स्वातंत्र्योत्तर नेहरूंची धोरणे देशाचा विकास आणि हित साधण्यास किती उपयोगी ठरली, हा आमच्यासमोरचा मुख्य प्रश्न आहे आणि देश म्हणत असताना इतरही अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत.
उदाहरणार्थ, पुष्कळदा स्वतंत्र देशांचे स्वातंत्र्य नाममात्र असते. परकीय हस्तक्षेपापासून व परकीय दडपणापासून भारत कुठवर मुक्त राहू शकला, हाही प्रश्न आमच्या डोळ्यांसमोर आहे. देशातील जनतेला हे राष्ट्र टिकावे अशी इच्छा निर्माण होण्यासाठी त्यांना काही मिळावे लागते. विकासाच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्या लागतात, काही प्रमाणात जीवन सुसह्य व्हावे लागते. मुख्य सूत्र राष्ट्रवादाचे म्हणजे राष्ट्रहिताचे आहे. पण या सूत्राच्या बाबतीतही गणिताची पद्धत उपयोगाची नसते, दिशा महत्त्वाच्या असतात. स्वतंत्र भारतासमोर उभे असणारे प्रश्न किती यांची जर एक यादी आपण केली आणि या यादीपैकी किती प्रश्न नेहरूंनी सोडवले असा प्रश्न जर आपण विचारला तर हे विचारणेच अपरिपक्वपणाचे होईल. देशासमोरील प्रश्नांची संख्या कधी मर्यादित नसते आणि देशासमोरील कोणताही मूलभूत प्रश्न कधीच सहजासहजी सुटण्याजोगा नसतो. उदाहरणार्थ, भारत स्वतंत्र झाला, त्या वेळी जनतेत दारिद्य्र होतेच. आजही दारिद्य्र आहेच आणि नजीकच्या भविष्यकाळात कमी-अधिक प्रमाणात जनतेचे दारिद्य्र शिल्लक राहणार आहे. मागासलेल्या देशात जनतेचे दारिद्य्र हा दीर्घ मुदतीचा प्रश्न असतो आणि म्हणून दारिद्य्राच्या बाबत हो-नाहीसारखी उत्तरे देता येत नसतात. दारिद्य्र संपविण्यासाठी औद्योगिकीकरण आणि उत्पादनवाढ हे उत्तर नेहरू देत असत. ही दिशा बरोबर आहे काय, त्या दिशेने प्रयत्न झालेला आहे काय, असा शोध घ्यावा लागतो.

लो. टिळकांचा हेतू स्वराज्य संपादनाचा होता, त्यांच्या हयातीत स्वराज्य मिळू शकले नाही, म्हणून त्यांचे जीवन शंभर टक्के अयशस्वी झाले असे म्हणावे, की प्रश्नच थोडा वेगळ्या भाषेत मांडून जनतेच्या मनात स्वराज्यविषयीची जिद्द निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता. ती जिद्द त्यांनी निर्माण केली;- म्हणून त्यांचे जीवन शंभर टक्के यशस्वी झाले असे म्हणावे? शेवटी राष्ट्रजीवनात दिशा महत्त्वाच्या असतात. सुटलेल्या प्रश्नांची सरासरी महत्त्वाची नसते. सरासरीची गणिती पद्धत सामाजिक चिंतनाला उपकारक होत नाही. संपूर्णपणे सरासरीला शरण गेलेल्या एका विक्षिप्त विचारवंताची गोष्ट नेहमी सांगितली जाते. तो असे म्हणत असे की, जर एखाद्या माणसाचा एक हात भट्टीत असला आणि एक हात रेफ्रिजरेटरमध्ये असला तर सरासरीने पाहता तो माणूस सुखीच म्हटला पािहजे. अर्थात या गोष्टीचे तात्पर्य गणिताला महत्त्व नाही असे नसून सामाजिक चिंतनात गणिताचा वापर कुठे व कसा करावा याला मर्यादा आहेत हे आहे. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूंसमोर उभ्या असणा-या समस्या विविध होत्या आणि एकेका समस्येचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे व अजस्र होते. शतकानुशतके त्या समस्या साठत आलेल्या होत्या. इंग्रजांच्या शे-दीडशे वर्षीच्या राजवटीत यातील अनेक समस्या जाणीवपूर्वक कुजविलेल्या होत्या. लोकांची इच्छा अगदीच साधी आणि एका वाक्यात संपणारी होती. त्यांना सर्वच प्रश्नांची तत्काळ आणि समाधानकारक सोडवणूक हवी होती. जनतेच्या अपेक्षा या होत्या याबद्दल त्यांना दोष देण्याचे कारण नाही. पण या अपेक्षा पूर्ण करता येणे मानवी शक्यतेच्याही पलीकडचे होते. नेहरूंचे मोठेपण असेल तर ते यात आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतासमोरील प्रश्नांचा त्यांनी विचार सुरू केलेला होता आणि स्वत:च्या मनाशी त्यांनी प्रश्नांच्या उलगड्यासाठी काही दिशा निश्चित केलेल्या होत्या. हे प्रश्न चटकन सुटणारे नाहीत याची नेहरूंना जाणीव होती. योजनाबद्ध पद्धतीने दीर्घकाळ प्रयत्न करूनच हे प्रश्न सोडवता येेणे शक्य होते. या दिशा आपल्या सहकाऱ्यांना पटवून देण्याचा आणि सर्वसामान्य जनतेला समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जेव्हा नेहरू हा प्रयत्न करीत होते त्या वेळी उद्याच्या व दूरच्या प्रश्नांचा निरर्थक खल करणारे स्वप्नवादी म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

नेहरूंची तुलनाच जर करायची असेल तर ती अशा नेत्यांशी केली पाहिजे, जे आपापल्या राष्ट्रांत नव्या युगाचे प्रस्थापक होते. या राष्ट्रनिर्मात्यांपैकी किती जणांसमोर नेहरूंइतके प्रश्न उभे होते, हा पहिला चिंतनीय प्रश्न आहे आणि हुकूमशाही मार्गानेही पहिल्या एक-दोन दशकांत या राष्ट्रनिर्मात्यांना काय साध्य करता आले, हा दुसरा प्रश्न आहे. हुकूमशाहीच्या मार्गाने जाऊनही नेहरूंना समाजपरिवर्तनाची गती फार तीव्र करता आली असती काय, हा एक िववाद्य प्रश्न आहे आणि हुकूमशाहीच्या मार्गाने न जाता लोकशाहीच्या मार्गाने जायचे तर गती मंद राहणार हे तर निर्विवादच आहे.

(पंडित नेहरू : एक मागोवा- प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. न. गो. राजूरकर- साधना प्रकाशन- १९७३ या पुस्तकातील हा संपादित उतारा)