आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओंजळभर पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाडच्या चवदार तळ्याच्या जल आंदोलनास ९० वर्षे होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केलेला जल धर्मसंगर जातिव्यवस्थेस खूप काही शिकवण देऊन गेला. भौतिक बदल झाले. आंतरिक बदलही होत आहेत. माणसाने आशावादी असले पाहिजे. देशाने जगातली उत्तम लोकशाही स्वीकारली आहे. गरज आहे ती आपल्यात समंजसपणे संवाद साधला जाण्याची; ते आपण नेटाने करू. 
 

व स्तुत: संपूर्ण सृष्टी अखिल प्राणिमात्रांच्या हक्काची, मालकीची असताना मूठभरांनी ती मालकीहक्काने आपल्या अधिपत्याखाली अविरत ठेवावी हे एक विचित्र सत्य म्हणावे, असे करताना माणसानेच माणसामाणसांत भेद निर्माण केले. बलवानाने गरीब, बलहीनास अंकित ठेवले. दास केले. सेवक बनवले. सामाजिक सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून समाजात विशिष्ट वर्ग-वर्ण व्यवस्था निर्माण केली. अखेर ती व्यवस्था प्रथा म्हणून पाळणे; परंपरा म्हणून धर्माधिष्ठित ठेवणे हे सक्तीचे केले.  

धर्म ही माणसाच्या जगण्याची एक रीत, शैली असली तरी धर्मातील आचरण तत्त्वांचा अविवेकी अतिरेक, अवलंब यातून माणसाच्या ठायी केवळ कर्मकांडच उरले. वैदिक  धर्मग्रंथांत स्तोत्रे, सूक्ते, मंत्र यातून जीवन व्यवहार मांडला आहे. पुरुषसूक्तात व्यवस्था वर्णन आलेय. भृगू, मनु यांनी सामाजिक व्यवस्थेसंबंधी संहिता तयार करून तिचा काटेकोर अवलंब व्हावा ही सक्ती केली. यात मानवी कल्याण, सामंजस्य, सुखसमाधान, शिस्त, निर्बंधयुक्त पालन अशा अनेक अंगातून तत्त्वे मांडली गेली होती. प्रचलित चातुर्वर्ण्य व्यवस्था या संहितेमुळे, मनुस्मृतीच्या संकेत पालनामुळे अधिक कठोर झाली.

स्पृश्य-अस्पृश्य यांच्यातले भेद अधिक बळकट झाले. कर्मपरत्वे तिचे स्वरूप न राहता ती जन्मपरत्वे होऊन बसली. इथेच माणसातील भेदनीतीचा पाया मजबूत  होत गेला. धर्मास राजाश्रय असल्याने ही धर्म रूढी अधिकच कर्मठपणे प्रवाहित होत गेली. परिणामत: मनु पुरस्कृत जातिव्यवस्था इतकी रुजली की शूद्रांची अवस्था पशू-प्राण्यांपेक्षाही अत्यंत हीन, दारुण, विदारक झाली. माणूस म्हणून हक्काने जगण्याच्या सर्व सोयी-सुविधांपासून ते वंचित झाले. एकंदरीत दलितांचे माणूसपणच नष्ट होऊन ते कलंकित जिणे जगू लागले.   

इंग्रजी अमदानीतील काळात जे नवविचार व उदारमतवादी विचार पाश्चात्त्य इंग्रजी शिक्षणामुळे दृढ होत गेले, त्यामुळे सामाजिक स्तरावर अनेक बदल घडत गेले. जुन्या प्रथा, चालीरीती, अनिष्ट परंपरा टाकून देण्याचे, सामाजिक क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे काही नवशिक्षित विचारवंतांना प्रकर्षाने वाटू लागले. अशा विचारांचे अनेक समाजसुधारक सक्रियपणे सर्व थरांत कामे करू लागले. सामाजिक बदल घडू लागले. या संदर्भात महाड चवदार तळ्यातील निसर्गदत्त पाणी सामूहिकपणे पिण्याचे अस्पृश्यांनी एक क्रांतिकारक पाऊल उचलले. जे पाणी स्पृश्य, सवर्णांच्याच मालकीचे मानले जात होते. ज्या तळ्यात अस्पृश्यांशिवाय अन्य सगळ्यांना मुक्त प्रवेश होता. सर्व जनावरे पशू-पक्षी यांना प्रतिबंध नव्हता, तळ्यातील पाण्यात जनावरे धूत होते, ते पाणी अस्पृश्यांना मात्र वर्ज्य होते. अस्पृश्यांचा विटाळ लागून पाणी अपवित्र होणार होते. भ्रष्ट होणार होते. ही अजागळ कल्पनाच मुळी अविचाराचा कळस होती. तेव्हा हे पाणी मानवी हक्काने कोणत्याही परिस्थितीत, संघर्ष करूनदेखील, मिळवायचेच, किंबहुना थेट स्पर्श करून प्राशन करायचेच, दलितांना बहुसंख्य प्रमाणात बरोबर घेऊन  हे क्रांतिकारक अभूतपूर्व पाऊल उचलायचे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठरवले. अस्पृश्योद्धाराचे हे पाऊल मानवी हक्काचे एक क्रांतिकारक पाऊल ठरले.  एक समाजसुधारक रा. ब. सीताराम केशव बोले यांनी तत्कालीन ब्रिटिश मुंबई विधिमंडळात एक अत्यंत महत्त्वाचा ठराव संमत करून घेतला होता की, अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक स्थळे खुली केली जावीत म्हणून या अनुषंगाने महाड नगरपालिकेनेही चवदार तळे हे सार्वजनिक असल्याने स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांनाही खुले करण्यात येत आहे, असा ठराव संमत केला होता.  

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच काळात बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केल्यापासून अस्पृश्यांच्या जागृतीचेही मोठे काम जोमाने सुरू केले होते. अनायासे महाड नगरपालिकेचा ठराव झालेला तो अमलात आणून अस्पृश्योद्धाराची व समतेच्या कार्याची चळवळ सुरू करावी, असे डॉ. बाबासाहेबांनी ठरवले. यासाठी काही सभा घेतल्या. अनेक सहकारी लाभले आणि महाड चवदार तळे धर्मसंगर कार्यक्रमाचे नियोजन केले. १९ व २० मार्च या या दिवशी अनेक ठिकाणांहून अस्पृश्यांनी समुहाने एकत्र यायचे ठरवले.  

सार्वजनिक तळ्याच्या मुक्त पाण्याला अस्पृश्यांनी स्पर्श करायचा. तथाकथित कर्मठ रूढीप्रिय स्पृश्यांना तो विटाळ झाला तरी. निसर्गदत्त पाणी अस्पृश्यांमुळे बाटले तरी पाणीही विटाळते, ही कल्पनाच मुळी घोर अज्ञान व अस्पृश्यांचा घोर अपमान करणारी हाेती आणि हे असे पाणी सामूहिकपणे प्यायचे आंदोलन करणे हेही तितकेच रोमहर्षक हाेते. दुष्ट रूढीमुळे शेकडो वर्षे अस्पृश्यांना दुर्मिळ झालेले चवदार तळ्यातील पाणी खुले करणे. महाड येथे चवदार तळ्याच्या विहित ठिकाणी हजारो अस्पृश्य जमा झाले. गरीब मळक्या, फाटक्या कपड्यांतील दीन जमाव. १९ मार्चची ढळढळीत दुपार. एका ऐतिहासिक घटनेसाठी साक्ष म्हणून तीही प्रतीक्षेत... काही काळ थांबलेली... चवदार तळ्याचे पाणी प्यायचे ही साधी घटनादेखील ऐतिहासिक होते. धर्म रूढीतील ही कोणती परिणती? मानवी हक्क सिद्ध करण्याची ही घटना जगभरात अद्वितीय ठरावी.  

त्या दुपारी अस्पृश्यांनी चवदार तळे चौफेर घेरले. नियोजित ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सहकारी आणि दलित बांधव स्पृश्यांचे तळे जणू ताब्यात घेऊन जलस्पर्श करणार. सगळ्यांचा उत्साह ओसंडलेला. अस्पृश्यांचे दीन चेहरे त्या स्वच्छ, थंडगार पाण्याकडे आशाळभूतपणे लागलेले. तळ्यातले अलभ्य पाणी पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तळ्याच्या एकएक पायऱ्या उतरू लागले. बाबासाहेबांच्या मागून शिस्तबद्ध रांगा करून काही दलित बांधवही तळ्याच्या पायऱ्या उतरत होते. दोन पावलांवर पाणी थरथरणारे, शहारणारे काही क्षणातच इतिहासाचे पान लिहिले जाणार. सगळेच आतुर. डॉ. बाबासाहेब अखेरच्या पायरीवर बसतात. समोरचे पाणीही या महामानवाच्या स्पर्शासाठी आसुसलेले... आतुर... अधीर बाबासाहेबांनी पाण्यास स्पर्श केला. ओंजळभर पाणी हाती घेतले. डोळेभरून ते पाणी क्षणभर पाहिले आणि ते प्यायला लागले. त्यांच्यासह मग अन्य बांधवही ओंजळ भरभरून पाणी प्यायला लागले. टाळ्यांचा कडकडाट. तळ्यातले पाणी आणि डोळ्यातले पाणी क्षणात एकजीव झाले. हजारो वर्षांत जे घडू शकले नाही ते इथे घडत होते. प्रसंग साधा होता काय? नाही. एक उच्च विद्याविभूषित हजाराे वर्षांतून हे साधेच, परंतु क्रांतिकारक कार्य घडवतो. मानवी हक्काची मुहूर्तमेढ रोवतो, हे साधे काम नव्हते. हा एक अनोखा धर्मसंगर होता. अननुभूत घटना लहान, पण महान होती. नागरिकत्वाचे अधिकार, माणूसपणाचे अधिकार स्वत: हिसकावून घेणे ही साधी घटना नव्हती.  

अस्पृश्यांनी बाटवलेले तळे आता अशुद्ध झाले. पाणीही विटाळले गेले. तेव्हा हे अभद्र पाणी पुन्हा पवित्र कसे करायचे? स्पृश्य धर्ममार्तंडांपुढे फार मोठा यक्षप्रश्न उभा राहिला. जुन्या कुजकट विचारवंतांनी यावर सामूहिकपणे खूप चर्चा केली. शास्त्रार्थ शोधून काढले. असे करताना साधा मानवधर्म मात्र अशा पंडितांना ध्यानात येत नव्हता. कर्मठ परंपरावादी, रूढीप्रिय प्रथा पाळणारे स्वत:चा विवेक कधीच तपासत नाहीत. अखेर उपाय सापडला. अस्पृश्यांनी शिवाशिव केलेले पाणी, तो तलाव कसा पूर्ववत शुद्ध करायचा? ब्राह्मणांनी सोवळ्यात तलावाचे शुद्धीकरण मांडले. 

तळ्यातून एकशे आठ घागरी पाणी काढले. त्यात पंचगव्य मिसळले. म्हणजे गाईचे शेण, मलमूत्र वगैरे मिसळून मंत्रघोषात पाणी शुद्ध केले. ते वेदमंत्रांच्या उद््घाेषातले आणि पंचगव्य मिसळलेले पाणी पुन्हा तळ्यात ओतले. अशा प्रकारे जलशुद्धीकरण झाले. हा प्रकार खुद्द एका सुधारक विचारसरणीच्या स्पृश्य ब्राह्मणास पटला नाही. काय हा वेडेपणा? म्हणून सुधारक बापूराव जोशी यांनी शुद्धीकरण प्रक्रियेच्या वेळीच चवदार तळ्यात उडी मारून अंघोळ केली. 

जोशीबुवांचा हा प्रकार बघून सनातन ब्रह्मवंदांनी बापूराव जोशींवर बहिष्कार टाकला, त्यांना वाळीत टाकले. साधे पाणी पिणे माणसामाणसात भेद निर्माण करत असेल आणि अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मानवी देहधारी माणसास पाणी पिणे हे दुरापास्त व्हावे. तो अश्लाघ्य विटाळ मानला जावा आणि अशा मानवी हक्कापासून दलितांना वंचित केले जावे हे धर्म रूढीतले भयानक विकृत सत्य आहे. आज जगभर मानवी हक्क हा मूलभूत मानला जातो. बाबासाहेबांनी देशाचेे संविधान लिहिले तेव्हा मूलभूत हक्कांचे जोरदार समर्थन केले.  

महाडच्या चवदार तळ्याच्या जलआंदोलनास सध्या ९० वर्षे होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केलेला जल धर्मसंगर जातिव्यवस्थेस खूप काही देऊन गेला. अनेक स्थित्यंतरे झाली. या अवधीत देश स्वतंत्र झाला. आपल्या हिताचे संविधान झाले. ओंजळभर पिण्याच्या पाण्याचा हक्क हे मूलभूत मानवी हक्काचे निमित्त होते. आज अस्पृश्यांना खूप काही मिळाले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा पाणवठा खुला केल्याचा ठराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो ठराव अमलात यावा म्हणून केलेली कृती ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच देशाचे संविधान लिहिताना कलम अनुच्छेद ४६ स्वतंत्रपणे लिहिले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. हा विलक्षण आश्चर्यकारक योगायोग आहे. 

अनुच्छेदात म्हटले आहे, राज्य, जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील.  तथापि अजून बरीच वाटचाल आहे. भौतिक बदल झाले. आंतरिक बदलही होत आहेत. माणसाने आशावादी असले पाहिजे. देशाने जगातली उत्तम लोकशाही स्वीकारली आहे. गरज आहे ती आपल्यात समंजसपणे संवाद साधला जाण्याची, ते आपण नेटाने करू. 
 
- ल. सी. जाधव, दलित साहित्याचे अभ्यासक
बातम्या आणखी आहेत...