आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणता नाट्यसमीक्षक हरपला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखनातून सतत जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाट्यसमीक्षकांमध्ये डॉ. वि. भा. देशपांडे होते. युवा रंगकर्मींना या धाग्याची वीण समजावी म्हणून त्यांनी ‘नाट्यकोशा’चा बृहत्प्रकल्प साकारला. डॉ. लागूंसारख्या ज्येष्ठतम रंगकर्मींपासून ते आजच्या आलोक राजवाडे, मोहित टाकळकरपर्यंतच्या युवा रंगकर्मींपर्यंत साऱ्या पिढ्यांशी विभांचे सौहार्द होते, ते यामुळेच. त्यांची ‘एक्झिट’ अकाली नसली तरीही विभा नेहमीच आठवत राहतील..   
 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा ‘नाटक’ हा अविभाज्य घटक होता, आहे आणि यापुढेही राहील. मराठी माणूस नाटकवेडा आहे, हे खरेच. त्याचे हे वेड ‘जाणत्या’ वळणावर पोहोचावे, मराठी नाट्यवेड्या मनांची संवेदनशीलता अधिक समंजसपणे जोपासली जावी यासाठी नाट्यविषयक, रंगभूमीविषयक लेखन करण्याचे काम डॉ. वि. भा. देशपांडे यांनी सुमारे ४० वर्षे सातत्याने केले. कोशासारख्या संशोधनपर लेखनापासून ते वृत्तपत्रीय सदरलेखनापर्यंत नाट्य आणि विशेषत: रंगभूमीविषयक लेखनाचे सर्व प्रकार विभांनी हाताळले. केवळ संख्येचा विचार केला तर विभांची सुमारे ५० पुस्तके वाचकांसमोर आहेत. त्यात कोश आहे, समीक्षापर लेखन तर आहेच, काही संपादने आहेत, गाजलेल्या नाटकांतील व्यक्तिरेखांवरचे लेखन आहे, विशिष्ट भूमिका विशिष्ट नटाशी, नटीशी कायमची जोडली जाते अशा व्यक्तिरेखा आणि ते कलाकार, यांच्यावरही त्यांनी लिहिले आहे. काही नाटककारांवर त्यांनी आवर्जून लेखन केले आहे. रंगभूमीचे साक्षेपी अभ्यासक म्हणून सुमारे चार दशके विभा वावरले. या दीर्घकाळात आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर अशा अनेक नाटककारांशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्याविषयी विभांनी स्वतंत्र लेखन केले आहे. तसेच निळू फुले, डॉ. लागू, कमलाकर सारंग, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी अशा नाट्यकर्मी कलाकारांशी त्यांचा जुळलेला स्नेहबंधही त्यांनी अक्षरबद्ध केला आहे. 

विभांचा जन्म ३१ मे १९३८ चा. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी आपला प्रबंध सादर केला तो ‘पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकांतील व्यक्तिरेखाटन’ (१८८० ते १९८०) या विषयावर. १९६७ ते १९९८ या काळात विभांनी अध्यापनाचे कार्य केले. मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुखपदावरून ते १९९८ मध्ये निवृत्त झाले आणि त्यांनी पूर्णवेळ नाट्यसमीक्षेसाठी दिला. नाट्यशास्त्र या विषयाचे अतिथी प्राध्यापक म्हणून ते पुणे विद्यापीठ,फर्ग्युसन कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ येथे वावरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएचडी तसेच एमफिलचे प्रबंध पूर्ण केले. नाट्यसमीक्षक अशी ओळख असलेले विभा महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रमुख कार्यवाह आणि कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. नाट्यविषयक अनेक रंगमंचीय कार्यक्रम, सादरीकरण, एकपात्री प्रयोग, व्याख्याने, चर्चा यात विभांचा मार्गदर्शक, संहितालेखक, वक्ता म्हणून सहभाग असे. 

मराठी नाटक नाटककार भाग ते (विष्णुदास भावे ते गडकरी, वरेरकर ते शिरवाडकर आणि कानेटकर ते तेंडुलकर इतर) असा शंभर वर्षांचा मराठी रंगभूमीचा विस्तृत कालखंड त्यांनी ग्रंथबद्ध केला. अनेक नाट्यविषयक ग्रंथांची संपादनेही त्यांनी केली. त्यामध्ये मराठी नाट्यकोश, हिंदी अनुवाद, रंगयात्रा,आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा, पुल ७५, माझा नाट्यलेखन दिग्दर्शनाचा प्रवास, मराठी नाट्यसमीक्षा काही दृष्टिकोन, निवडक मराठी एकांकिका, निळू फुले व्यक्ती आणि कलाकार, निवडक नाट्यमनोगते, वसंत शिंदे व्यक्ती आणि कलाकार, नाटककार वसंत कानेटकर,मराठी नाट्यप्रवेश भाग यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. विभांनी स्मरणिका गौरविका ग्रंथांसाठीही संपादनाचे लेखनाचे काम केले. त्यातील मॉडर्न कॉलेज स्मरणिका, स्वराभिषेक (पं. जितेंद्र अभिषेकी), अखिल भारतीय नाट्य संमेलन स्मरणिका, ललितकलादर्श नाट्यसंस्था अमृतमहोत्सव, साहित्यसूची अंक, दिवाळी अंकातील लेखविभागांचे संपादन डॉ. लागू आणि अमोल पालेकर यांचा निर्देश करणे आवश्यक आहे.

विभांचा एक विशेष म्हणजे मराठी रंगभूमीविषयी ते लिहित राहिलेच, पण कर्नाटकातील यक्षगाननाट्य परंपरा आणि बंगाली रंगभूमीचाही अभ्यास त्यांनी केला होता. या अभ्यासासाठी त्यांची शिफारस आणि साह्य पु. ल. देशपांडे यांनी आत्मीयतेने केले होते. या अभ्यासातून जे गवसले तेही विभांनी लिखित स्वरूपात उपलब्ध केले होते. रंगभूमीविषयी विलक्षण आस्था, परंपरेचा आदर राखत विभांनी समकालीन रंगभूमी, रंगकर्मी यांच्याविषयी तर लेखन केलेच, पण उगवत्या, नव्या रंगकर्मींविषयी आणि त्यांच्या ‘प्रयोगा’विषयी ते उत्सुक असत. प्रायोगिक, समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीवर नवीन काय चालले आहे, कोण काय लिहिते आहे, याचा कानोसा ते सतत घेत असत. नाट्यसमीक्षेच्या क्षेत्रात युवा समीक्षक फारसे नाहीत, याची खंतही त्यांना वाटत असे. त्यांच्या निधनाने रंगभूमीवर मनस्वी प्रेम करणारा, मराठी रंगभूमीचा जाणता नाट्यसमीक्षक हरपल्याची भावना मनात आहे. विभांना विनम्र आदरांजली. 
बातम्या आणखी आहेत...