आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅसिस्ट बनून फॅसिझमचा मुकाबला करता येईल काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दि. २३ सप्टेंबर १९७५
(दै. मराठवाडा)
सध्या फॅसिस्टविरोधी परिषदांचा धडाका चालू आहे. खरे म्हटले तर या फॅसिस्टविरोधी परिषदांचा संबंध राष्ट्राअंतर्गत प्रश्नापेक्षा आंतरराष्ट्रीय प्रश्नाशी अधिक आहे. फॅसिस्टांवर फॅसिस्टविरोधी शक्तींनी जगात विजय मिळविला त्याला यंदा तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या स्मृतीला उजाळा द्यावा आणि जगात निरनिराळ्यात देशांत नव्या स्वरूपात फॅसिझमचा उदय होत असेल तर त्यापासून जगातील जनतेला सावध राखावे, हा उद्देश या परिषदा घेण्यामागे आहे. परंतु अलीकडे ज्या परिषदा होत आहेत, त्यातून हा उद्देश कोणी सांगतच नाही. व्यापक संदर्भाचा साधा उल्लेख करणेही कोणाला आवश्यक वाटत नाही. जणू स्थानिक प्रश्नासाठीच व तेवढ्यापुरत्या या परिषदा आहेत. असा समज यामुळे पसरला आहे. यामुळे या परिषदांचा परिचय मूळ उद्देशाच्या तुलनेत फार आकुंचित बनला आहे व बनत चालला आहे.

राजकीयदृष्ट्या जे आज आपल्याबरोबर असतील तेवढे आपोआपच फॅसिस्टविरोधी व ज्यांचे राजकीय मतभेद असतील ते फॅसिस्ट, असा सोयीस्कर आडाखा हितसंबंधी मंडळींनी जाणता-अजाणता बसविला आहे. वस्तुत: हा आकुंचितपणाच फॅसिस्ट वृत्तीला जन्म देणारा ठरू शकतो. वंश, धर्म, देश आणि जातीपाती यांच्या
अभिनिवेशातून फॅसिझमचा आधार तयार होत असतो. हिटलर स्वत:ला आणि आपल्या अनुयायी जर्मनांना आर्य वंशाचा म्हणवून घेत असे. आर्यांनाच जगावर राज्य करण्याचा अिधकार पोचतो, असा दावा होता. यातूनच फॅसिस्ट विकृती व अहंगंड निर्माण झाला. इतिहासातील हा दाखला लक्षात घेऊन फॅसिस्टविरोधी परिषदा संघटित करणार्‍यांनी उद्देशाची ही व्याप्ती लोकांसमोर आवर्जून मांडली पाहिजे.

या फॅसिस्टविरोधी परिषदांतून अपेक्षेप्रमाणे राजकारणही घुसले आहे. कम्युनिस्ट पक्ष (उजवा) सध्या काँग्रेसशी सोयरिक जुळवून असल्यामुळे असल्या परिषदा संघटित करण्याबाबतचा पुढाकार तोच पक्ष आपल्या हाती ठेवीत आहे. जेथे जेथे अशा परिषदा झाल्या, तेथे तेथे उजव्या कम्युनिस्टांचाच पुढाकार होता. काँग्रेस पक्ष दाखविण्यापुरताच होता. याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षात उमटणे अपरिहार्य आहे. कम्युनिस्टांना वगळून फॅसिस्टविरोधी परिषदा घेऊ लागले आहेत. परवाच औरंगाबादी युवक काँग्रेसने अशी एक फॅसिस्टविरोधी परिषद घेतली. सहकारमंत्री श्री. यशवंतराव मोहिते या परिषदेचे उद््घाटक होते. त्यांनी एकट्यानेच आपल्या भाषणातून काही विचारणीय मुद्दे मांडले.

या परिषदेत काही अतिव्याप्त आणि अविवेकी विधाने काही वक्त्यांच्या भाषणातून करण्यात आली. अर्थात अशी विधाने काही युवकांनी केली असल्यामुळे प्रौढ आणि परिपक्व नेत्यांचे माप त्यांना न लावता त्यांना त्यांच्या विधानातील उणिवा आताच दाखवून देणे आवश्यक आहे. अर्थात हे सर्व तरुण खरोखरीच फॅसिझमला विरोध करू इच्छितात व त्यांची लोकशाहीवर नितांत निष्ठा आहे, असे आम्ही गृहीत धरतो.

मोरारजी आणि जयप्रकाश नारायण यांच्याविषयी एक विधान असे करण्यात आले की, या नेत्यांनी जी
भूमिका घेतली व ज्यांना त्यांनी जवळ केले ते लक्षात घेतले तर त्यांना गोळ्याच घालायला पाहिजेत! परंतु आम्ही त्यांना डाकबंगल्यात आरामशीर ठेवले आहे. आमच्या कानावर आलेले हे विधान कोणी केलेच नसेल तर आमचे काही म्हणणे नाही. तथाप विधान झाले असो अथवा नसो, अशी शंका काहींच्या मनात असण्याची शक्यता आहे. म्हणून या विधानाचा ऊहापोह आवश्यक आहे. राजकीय कारणासाठी ज्यांना अटक करण्यात येते त्यांना योग्य त्या मानमरातबाने वागविणे हा सर्वत्र शिरस्ता आहे. इंग्रज आपल्या देशावर राज्य करीत होते तेव्हा गांधीजी, पंडितजी, सरदार, मौलाना, जयप्रकाशजी वगैरेंना अनेकदा अटक करण्यात आली. इंग्रज साम्राज्यवादी होते तरीही त्यांनी आपल्या या नेत्यांना आताच्यापेक्षाही अधिक आरामात ठेवले होते. गांधीजी, कस्तुरबा आिण महादेवभाई यांना तर पुण्याला आगाखान पॅलेसमध्येच ठेवण्यात आले होते.

राजकीय नेते म्हणून त्यांना सर्व सोयीदेखील पुरवण्यात येत असत. तेव्हा केवळ एवढ्यावरून इंग्रजांना आपण लोकशाहीवादी मानले नाही की त्यांचा वसाहतवाद आपण विसरलो नाही. विरोधकांना योग्य त्या आदराने वागविण्याचा भाग अर्थातच सामान्य सभ्यतेचा व सुसंस्कृतपणाचा आहे. फॅसिस्टविरोधी म्हणवून घेणार्‍या साम्यवादी रशियात तुरुंग म्हणजे अघोरी यमयातनांची केंद्रेच राहत आली आहेत. अनेक विरोधकांना चक्क मारूनच टाकण्यात आले. काही धास्तावून पळाले. विरोधकांशी सहिष्णुतेने वागण्याच्या बाबतीत साम्यवादी व हिटलर यांच्यात फारसा फरक नव्हता. ज्यूंची कत्तल हिटलरने केली आणि सोव्हिएट रशियानेही ज्यूंना त्राहि भगवान केले! तेव्हा विरोधकांना आपण डाकबंगल्यात ठेवतो म्हणून आपण लोकशाहीवादी आहोत, असे समजून लोकशाहीनिष्ठा कृपा करून सवंग करू नये.
बातम्या आणखी आहेत...