आधुनिक लोकशाहीचा उगम इंग्लंडमध्ये झाला आहे. मात्र, या देशात लोकशाही राजवटीबरोबरच राजघराण्याची नामधारी का होईना पण परंपरा टिकवून ठेवण्यात आली आहे. इंग्लंडचे राजघराणे हे तेथील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे अभिमानस्थळ आहे. राजघराण्यातील व्यक्तींच्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्यावर इंग्लंडचे नागरिक कौतुकाचा वर्षाव करतात, राजघराण्यावर सरकारी ितजोरीतून अमाप पैसा खर्च केला जातो म्हणून हेच नागरिक प्रसारमाध्यमांतून प्रखर टीकाही करतात. पण ही राजघराण्याची परंपराच नष्ट करा असा कोणी आग्रह धरत असेल तर त्याला इंग्लंडचे नागरिक फारसा प्रतिसादच देत नाहीत. आपल्या परंपरा, इतिहास टिकवणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे इंग्लंड समजत असल्याने तेथे राजघराणे अद्यापही महत्त्वाचे मानले जाते. इंग्लंडच्या विद्यमान राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्या देशाची सर्वाधिक काळ सम्राज्ञी राहाण्याचा विक्रम बुधवारी पूर्ण केला.
ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नव्हता त्या काळात राणी असलेल्या व्हिक्टोरिया यांचा सर्वाधिक काळ सम्राज्ञी असण्याचा विक्रम एलिझाबेथ द्वितीय यांनी मोडला आहे. एलिझाबेथ द्वितीय या तब्बल २३,२२६ हून अधिक दिवस सम्राज्ञीपदी आहेत. भारत, चीन, ब्राझीलसारख्या संभाव्य महाशक्ती आकाराला येत असून या सगळ्यांसमोरही इंग्लंडचे महत्त्व फारसे जाणवत नाही. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी दुसर्या महायुद्धानंतरचे जेता इंग्लंडही त्यांनी बघितले आहे व आता आर्थिक पेचप्रसंगांतून सावरणारेही इंग्लंडही. युवराज्ञी डायनाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर राजघराण्याची प्रतिष्ठा सावरण्याचे काम ज्या चलाखीने एलिझाबेथ द्वितीय यांनी केले त्याला तोड नव्हती. इंग्लंडच्या बारा पंतप्रधानांची कारकीर्द बघितलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांनी त्या देशाचे सम्राज्ञीपद सर्वाधिक काळ भूषवण्याच्या विक्रमाव्यतिरिक्त अन्य फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. तिचा गौरव करताना हे वास्तव विसरता येणार नाही.