आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साम्यवादाचा अंगार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
६० च्या दशकात क्युबातील बॅटिस्टा राजवट उलथवून फिडेलने सत्ता ताब्यात घेतली तेव्हा तो तिशीत होता. पुढे सुमारे ५० वर्षे त्याने एकहाती सत्ता राबवली. ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय)नंतर प्रदीर्घ काळ सत्तेत असणारा तो एकमेव सत्ताधीश ठरला.
काही व्यक्ती अशा असतात की त्या जिवंत असतानाच इतिहासाने त्यांच्या कार्याची गौरवशाली दखल घेतलेली असते. ही व्यक्तिमत्त्वे एक लिजंड म्हणून केवळ एका देशाला नव्हे, तर जगाला प्रेरणा देत असतात. महात्मा गांधी, प. नेहरू, चे गवेरा, हो-ची -मिन्ह, माओ, नेल्सन मंडेला या २० व्या शतकावर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या नेत्यांच्या पंक्तीत फिडेल कॅस्ट्रोचे नाव घेता येईल. ६० च्या दशकात क्युबातील बॅटिस्टा राजवट उलथवून फिडेलने सत्ता ताब्यात घेतली तेव्हा तो तिशीत होता. पुढे सुमारे ५० वर्षे त्याने एकहाती सत्ता राबवली. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय)नंतर प्रदीर्घ काळ सत्तेत असणारा तो एकमेव सत्ताधीश ठरला. सत्ताकाळात त्याच्यावर अमेरिका व नाटो राष्ट्रांकडून सातत्याने तो हुकूमशहा असल्याचे आरोप केले गेले. क्युबातील नागरिकांचे मूलभूत अधिकार व स्वातंत्र्य यांच्यावर क्रूरपणे हल्ला करणारा हुकूमशहा अशी अमेरिकेने त्याची नकारात्मक प्रतिमा जगभर निर्माण केली होती. कारण १९६२ मध्ये सोव्हिएट युनियनला क्युबामध्ये आण्विक तळ उभे करण्यास फिडेलने मंजुरी देत जागतिक राजकारणाला कलाटणी दिली होती. क्युबा व अमेरिकेच्या सीमांमध्ये केवळ ८० किमीचे अंतर असल्याने सोव्हिएट युनियन अमेरिकेवरअणुहल्ला करणार या शक्यतेने जगभर घबराट निर्माण झाली होती. ‘क्युबन मिसाइल क्रायसिस’ अशी नोंद झालेल्या या घटनेमुळे फिडेल जगभर क्रांतीचा एक शिलेदार म्हणून प्रसिद्ध झाला. अखेर १३ दिवसांनंतर हे प्रकरण शमले व जगापुढचा अणुयुद्धाचा धोका टळला. पण क्युबन मिसाइल क्रायसिसमुळे शीतयुद्धाला एक नवा आयाम मिळाला. या घटनेचा परिणाम असा की, जगभरातले बुद्धिवादी, विचारवंत, पुरोगामी वर्गाला प्रामाणिकपणे वाटू लागले की, कम्युनिझममुळे जगाची प्रगती व मानवी समाजाचे उत्थान होऊ शकते. पण शीतयुद्धाने जगाची वैचारिक फाळणी झाली होती. अमेरिकेने या घटनेनंतर क्युबाविरोधात जोरदार राजकीय आघाडी उभी केली. अंकित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या बळावर अमेरिकेने सामान्य क्युबन माणसाचे जगणे हलाखीचे आहे आणि फिडेलची मग्रुरी वाढतच चालली आहे, असा विखारी प्रचार केला. तरीही क्युबाच्या सामान्य नागरिकांमध्ये फिडेलविषयी प्रचंड आत्मीयता, विश्वास होता व तो ९० व्या वर्षी जाईपर्यंत कायम होता. अमेरिकेच्या मनगटशाही, साम्राज्यवादाला एका छोट्या देशातला एक साधा गनिम आयुष्यभर आव्हान देतो याचेच कौतुक जगाला होते. जॉन एफ केनेडी यांच्यानंतर अमेरिकेच्या १० अध्यक्षांनी आपापल्या कारकीर्दीत क्युबाशी असलेले तणावाचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले नाहीत. या काळात फिडेलच्या हत्येचे सुमारे ६०० प्रयत्न अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएद्वारे व अन्य संघटनांच्या माध्यमातून करण्यात आले. पण हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने व त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्या व्यवस्थेने क्युबाशी जुळवून घेणे याचा अर्थ आपली मान या छोट्या देशापुढे तुकवणे असा समज करून घेतला. अमेरिकेचा सोव्हिएत युनियनमधील कम्युनिझमशी झगडा कायम होताच,पण दुसरीकडे त्यांनी क्युबाबरोबरही तो संघर्षमय राहील अशीच परिस्थिती कायम ठेवली. क्युबावर आर्थिक निर्बंध टाकण्यापासून त्यांच्या व्यापाराला जगाच्या बाजारपेठेत तीव्र विरोध करत अमेरिकेने क्युबाची अर्थव्यवस्था अक्षरश: उद्ध्वस्त केली. या उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेतही क्युबाची जनता फिडेलच्या मागे धैर्याने उभी राहिली. याच काळात फिडेलने देशाच्या शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. अखेरीस काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी ५० वर्षांचा हा संघर्ष गैरसमजाचा व अनाठायी असल्याची भूमिका घेत स्वत:हून क्युबाकडे मैत्रीचा हात केला. पण फिडेलला अमेरिकेच्या धोरणातील बदल पटला नाही. अमेरिकेशी आपला लढा वैचारिक आहे व तो मरेपर्यंत कायम राहील, असे सांगत फिडेलने ओबामांची भेट घेण्याचे प्रयत्नही केले नाहीत.

फिडेलचे समस्त विश्वावर असलेले गारुड हे विस्मयकारक व अविश्वसनीय असे होते. कारण त्याच्या अंगी पददलित, गरिबांविषयी करुणा होती. साम्राज्यवादाविरोधात अंगार होता. फिडेल हा केवळ साम्यवादी क्रांतीचा प्रतीक नव्हता, तर तो उद्दाम अमेरिकेला झुंजवत ठेवणारा नेता म्हणून आफ्रिका, आशिया, मध्यपूर्व देशांपुढचा एक आदर्श होता. मात्र हा आदर्श हुकूमशहा आहे असा आरोप होत असला तरी प्रत्यक्ष क्युबामध्ये फिडेलचे पुतळे, पोस्टर उभे राहिले नाहीत. फिडेलच्या नावाची एकही सार्वजनिक वास्तू उभी राहिली नाही की त्याच्या नावाने एखादे क्रांतीदायी स्मारक नाही की नाण्यावर त्याची मुद्रा नाही. म्हणूनही फिडेलला हुकूमशहा म्हटल्याचा आरोप सहन होत नव्हता. मी व्यवस्थेच्या विरोधातला एक सामान्य माणूस आहे, असे तो सातत्याने सांगत होता. एका मुलाखतकाराने त्याला प्रश्न विचारला की, इतिहास तुमचे मूल्यमापन कसे करेल? त्याला वास्तववादी उत्तर देत फिडेल म्हणाला, मी त्याची चिंता करत नाही. कारण या मानवजातीने असंख्य चुका, असंख्य वेळा मूर्खपणा केला आहे. १०० वर्षांनंतरची पिढी आपल्याला असंस्कृत, रानटी वगैरे समूहात गणेल व आपण विस्मरणात जाऊ...
सुजय शास्त्री
उपवृत्तसंपादक, मुंबई ब्युरो
बातम्या आणखी आहेत...