आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजशास्त्राचा व्यासंगी ‘अनुबंधकार’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अध्यापन करू लागलेली माणसे नंतर स्वत:च्या अध्ययनाकडे दुर्लक्ष करताना आढळतात. डाॅ. द. ना. धनागरे मात्र सातत्याने विद्यार्थीदशा जपत राहिले. त्यामुळेच त्यांचे चिंतनात्मक, संशोधनपर लेखनही रुक्ष, साचलेले वाटत नाही. 
 
ज्येष्ठ समाजशास्त्रतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्या निधनाने समाजशास्त्राचा प्रगाढ आणि व्यासंगी अनुबंधकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जडणघडण झालेल्या धनागरे सरांना ‘इतरांपेक्षा आपले जीवनानुभव वेगळे आहेत’, याची सतत जाणीव होती. शिक्षण, उच्च शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ते सातत्याने विदेशांत आणि देशभर भ्रमंती करत होते. या भ्रमंतीत जे गवसले, त्याचे दस्तएेवजीकरण होणे आणि करणे हे समाजाप्रति असणारे दायित्व असल्याच्या जाणिवेने त्यांनी लेखन केलेले आढळते. त्यांच्या एकूण लेखनात त्यांच्या चिंतनाचा, संशोधनाचा गाभा असणाऱ्या समाजशास्त्राला प्राधान्य असणे स्वाभाविकच आहे, मात्र धनागरे यांचे ‘हिरवे अनुबंध’ या शीर्षकाचे पुस्तक नावापासूनच वाचकाला चकवा देणारे आहे. फक्त नाव वाचले, तर पर्यावरणविषयक किंवा नातेसंबंधांविषयी काही लेखन असावे, असा समज होऊ शकतो. प्रत्यक्षात ज्या मुस्लिम बांधवांचा, बुद्धीवंतांचा सहवास धनागरे सरांना लाभला, त्यांच्याविषयीचे अतिशय आत्मीयतेने, जिव्हाळ्याने आणि त्याचवेळी त्यांच्यातील सजग समाजशास्त्रतज्ज्ञाने केलेले हे वेगळ्याच जातकुळीचे लेखन आहे. धनागरे सरांच्या सार्वजनिक जीवनात त्यांना विविध कारणांनी प्रो. नुरुल हसन, प्रा. हामझा अलावी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रो. मुनीस राझा, डॉ. अली अश्रफ, डॉ. आरिफ महंमद गय्यूर अशा मुस्लिम बुद्धिवंतांचा परिचय आणि सहवास घडला. ‘या व्यक्तिमत्वांच्या स्वभाव, आवडीनिवडी, वैचारिक धाटणी यात कमालीची विभिन्नता होती, पण आपल्या मतांशी ठाम राहूनही त्यांच्यात असलेली उदारमतवादी सहिष्णुता मला केवळ जाणवली नाही, तर भावलीसुद्धा,’ असा उल्लेख धनागरे सरांनी स्वत:च केला आहे. आपल्या सहवासात आलेल्या छोट्या-मोठ्या व्यक्तींमधल्या माणूसपणाचा शोध घेण्याचा छंद धनागरे यांनी जपलेला दिसतो. त्याचप्रमाणे एक समाजशास्त्रज्ञ म्हणून ‘उदारमतवादी सहिष्णुता हा व्यक्तिविशेष असणे पुरेसे नाही तर ते संपूर्ण समाजाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून जेव्हा साकार होईल तेव्हाच आपण सुसंस्कृत, सभ्य समाज घडवू शकलो, असे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मात्र यासाठी प्रयत्न करत असताना त्यांची लेखणी, वाणी प्रचारकी थाटाची होणार नाही, हे भान त्यांनी सतत जपलेले दिसते. व्यक्तींच्या गुणदोषांसह आपण त्यांना स्वीकारू लागलो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘अनुबंध’ तयार होतात, यावर त्यांचा विश्वास असल्याचे दिसते. 

धनागरे यांचा जन्म आणि सुरुवातीचे शिक्षण विदर्भात वाशीम येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. पुढे अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्चशिक्षण पूर्ण केले. शिक्षणक्षेत्रात प्रदीर्घकाळ वावरलेल्या धनागरे सरांनी आग्रा विद्यापीठ, कानपूर आयआयटी, पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. १-११ ९५ ते ३१ ऑक्टोबर २००० या काळात ते कुलगुरू होते. अध्यापन करू लागलेली माणसे नंतर स्वत:च्या अध्ययनाकडे दुर्लक्ष करताना हमखास आढळतात. धनागरे सर, हा यातही अपवाद होता. ते सातत्याने स्वत:ची विद्यार्थीदशा जपत राहिले आणि कायम ‘अर्जनपर्व’ करत राहिले. त्यामुळेच त्यांचे समाजशास्त्रीय चिंतनात्मक, संशोधनपर लेखनही रुक्ष, साचलेले वाटत नाही. त्यात प्रवाहीपणा आहे. ताजे संदर्भ आहेत. संशोधनाच्या आधुनिक पद्धतींचा स्वागतार्ह स्वीकार आहे. मुख्य म्हणजे धनागरे स्वत:विषयी काही लिहिणे अनेकदा टाळतात. आपण इतरांबद्दल सांगावे आणि ते करीत असताना ओघाओघाने स्वत:बद्दल जे लिहिले जाईल, ते टाळता न येण्यापुरतेच असावे, असे त्यांनी स्वत:च एके ठिकाणी म्हटले आहे. हे भान त्यांनी कायम जपलेले दिसते. 
अध्ययन, अध्यापन, संशोधन हे सरांचे कार्यक्षेत्र, तेही ठरवून, निश्चयपूर्वक निवडलेले. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित लेखनात ते मन:पूत रमलेले आढळतात. ‘सेंटर फॉर एज्युकेशन अॅंड कम्युनिकेशन’ या दिल्लीत काम करणाऱ्या संस्थेशी संबंधित असल्याने सरांना पहिल्यांदा लाहोरला जाण्याचा योग आला, तेव्हा पाकिस्तानात भेटलेल्या मंडळींविषयी त्यांनी केलेले लेखन मुळातूनच वाचायला हवे. अनलंकृत, सरळ, साधी भाषा हे धनागरे सरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य दिसते. अर्थात जिथे निखळ संशोधनपर निष्कर्ष किंवा मांडणी आहे, विश्लेषणात्मक विचार आहेत, तिथे त्यांची लेखणी आवश्यकतेनुसार गंभीर, विद्वत्तापूर्ण आहेच, पण ग्रथित लेखन त्यांनी सुगम भाषेत केलेले आहे. आणखी एका पैलूचा उल्लेख आवर्जून करायला हवा – तो म्हणजे मराठी भाषेत लेखन करण्यास सरांनी फारच उशिरा सुरुवात केली. ‘वयाची साठी उलटल्यानंतरच मी मराठी भाषेतून लेखन केले’, असे त्यांनी म्हटले आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन वाचले, तर उपरोक्त विधानाची सत्यता पटेल. सरांची व्याख्याने हाही अभ्यासकांसाठी पर्वणीचा योग असायचा. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या स्मृत्यर्थ प्रज्ञापाठशाळा मंडळाने सरांचे व्याख्यान ठेवले होते. नागरी समाजाच्या जडणघडणीसंदर्भातील विचार त्यांनी मांडले. त्यांचे व्याख्यान, त्यानंतरची चर्चा, चर्चेतील मुद्दे यांचा सखोल परामर्श घेण्याची मागणी वाचक-रसिकांनीच केल्याने मंडळाने वाई येथे तीन दिवसांचे विशेष शिबिर घेतले. , एवढे सांगितले तरी धनागरे सरांच्या समाजशास्त्र विषयातील व्यासंग, चिंतन यांची कल्पना येते. 
आजच्या एकूणच सर्व क्षेत्रात आलेल्या उथळपणाच्या, तात्पुरतेपणाच्या पार्श्वभूमीवर धनागरे सरांचे हे वैगळेपण कायम स्मरणीय राहील.
-----
बातम्या आणखी आहेत...