आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वात, एनएसजीच्या विस्ताराने दहशतवादाचा बीमोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई असाे की पठाणकाेट, या ठिकाणचे दहशतवादी हल्ले अाणि त्यानंतरची कारवाई या बाबींचा सर्वंकष विचार करता दहशतवादाचा बीमाेड करण्यासाठी ‘स्वात’ अाणि ‘एनएसजी’चा अाता देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये विस्तार करण्याची गरज निर्माण हाेत अाहे.
पठाणकोटच्या हल्ल्यानंतर एक गोष्ट मात्र समोर आली, ती म्हणजे मुंबईत घडलेल्या २६/११ च्या हल्ल्यापासून घेतलेला धडा. ‘एनएसजी’चे पथक मुंबईतील हल्ल्यावेळी ७ तास उशिरा पोहोचले होते, मात्र पठाणकोटमध्ये अगदी वेळेवर पोहोचले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यात मदत झाली. ‘एनएसजी’चे पथक वेळेवर पोहाेचण्याचे अाणखी एक कारण म्हणजे केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून हल्ल्याच्या शक्यतेची दिली गेलेली पूर्वकल्पना आणि गुरुदासपूरच्या पोलिस अधीक्षकाच्या अपहरणानंतर त्यांच्या वाहन चालकाला सैनिकी पोषाखातील दहशतवाद्यांनी ठार मारल्याने समाेर दिसत असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ‘एनएसजी’कडे मागितली गेलेली मदत. राष्ट्रीय सुरक्षा पथक वेळेवर पाेहाेचल्याचे समाधान असले तरी पठाणकोटमधील काही गोष्टी मात्र निश्चितच चिंताजनक आहेत. एक तर पंजाब पोलिसांना ५ दिवस अगाेदर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची गुप्तवार्ता ‘अायबी’कडून मिळाली होती. जरी ही गुप्तवार्ता नेमक्या जागेविषयी निश्चित नव्हती तरीदेखील नवीन वर्षाच्या आगमनाच्या जवळपास असा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली असताना पंजाब पोलिसांनी गुरुदासपूरमध्ये २७ जुलै २०१५ ला झालेला हल्ला लक्षात घेऊन संभाव्य हल्ल्याचा कट उधळून लावण्याच्या दृष्टीने रणनीती अाखण्याची गरज होती.

गुरुदासपूरच्या पोलिस अधीक्षकाच्या एकंदरीत सर्वच वर्तनावर शंका घेण्यासारखी स्थिती अाहे. आधीच पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांच्या विरोधात ५ महिला पोलिस शिपायांबरोबर असभ्य वर्तन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्यानंतर त्यांना सोडून देऊन त्यांच्या वाहन चालकाला ठार मारले जाणे हे काही तर्कसंगत वाटत नाही. दहशतवादी एवढे मूर्ख निश्चितच नाहीत की, एक पाेलिस अधीक्षक हाती लागलेला असताना त्याला सोडून त्याच्या चालकाला ठार मारतील. यात निश्चितच काही तरी काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सलविंदर सिंग दर्ग्याला नेहमी जातात, असे त्यांच्या निवेदनातून कळते. परंतु दर्ग्याच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे सलविंदर सिंघ नेहमीच काही तेथे जात नसत. दर्ग्याला जाताना सरकारी मोटार सलविंदर यांचा मित्र चालवत होता. सरकारी वाहन हे केवळ सरकारी कर्मचाऱ्यानेच चालवले पाहिजे, असा नियम पोलिस खात्यात तरी निश्चितच आहे. सलविंदर यांच्या या सर्व वर्तनावरून अशी शंका का घेतली जाऊ नये की त्यांचा कोठे तरी दहशतवाद्यांना मदत करण्याचा उद्देश असू शकतो. अर्थात ‘एनअायए’ च्या चौकशीत अनेक बाबी उघडकीस येतीलच.

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर धडा घेत सरकारने ‘एनएसजी’ची दिल्ली (मनेसर/हरयाणा) जवळच्या केंद्राखेरीज मुंबई, हैदराबाद, आणि चेन्नई येथे केंद्रे उघडली आहेत. परंतु असे दिसते की राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या आणखी बऱ्याच शाखा निर्माण करण्याची गरज आहे. या ‘एनएसजी’च्या ‘SWAT’ (Special Weapons And Tactics)च्या तुकड्या जास्त प्रमाणात आणि अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलावी लागतील. या SWAT तुकड्या जर प्रत्येक राज्यामध्ये निर्माण केल्या तर मुंबईतील २६/११ आणि पठाणकोट सारख्या हल्ल्यांना सामोरे जाणे सोपे आणि निर्णायक ठरू शकेल.

नवाझ शरीफ पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून सत्तेवर आल्याने पाकिस्तानात लोकशाही मजबूत होण्याची िचन्हे दिसत होती, परंतु पाकिस्तानातील तालिबान आणि इस्लामिक कट्टरवादी संघटना नवाज शरीफांना सुरळीत राज्य कारभार करू देणार नाहीत, हे देखील उघडच होते. त्याचप्रमाणे पाकिस्तान लष्कर प्रमुख राहील शरीफ हादेखील स्वतःची पाकिस्तानवरील पकड शिथिल होऊ देणार नाही. या दाेन्ही बाबींना पाकिस्तानच्या इतिहासातूनच दुजोरा मिळतो. अमेरिकन लेखक स्टेनली वोल्पर्ट यांनी झुल्फिकार अली भुत्तो यांच्या चरित्रात भुत्तो यांनी लिहिलेली एक ‘पॉलिसी नोट’ जी तत्कालीन (१९६४-६५) पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अय्युब खान यांना पाठवली त्याचा उल्लेख पुढीलप्रमाणे केलेला आहे. “Pakistan’s long term security and stability can be achieved only by commencing the destabilization and fragmentation of India by engineering the secession of J & K in the North - West and Assam and other hill states in the North - East from India”. पाकिस्तानच्या ‘अायएसअाय’ ने १९९१ मध्ये जी व्यूहरचना आखली त्याचा हाच अाधार हाेता. दोन काश्मिरी अतिरेकी, दोन खलिस्तानी दहशतवादी, दोन मुस्लिम कट्टरवादी असे एकूण सहा जणांना लाहोरला नेण्यात आले. लाहोरमधील बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला ज्यामध्ये भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरात ते आसामपर्यंत अराजकता माजवण्याचा मनसुबा नमूद हाेता. या कारस्थानाला ‘के-२ प्लॅन’ असे नाव देण्यात आले हाेते, या ‘के-२ प्लॅन’ ची प्रचिती मुंबईतील २६/११ तसेच पठाणकोट हल्ल्यानंतर दिसून येते.

या हल्ल्यासंबंधी लिहिताना एक आठवण होते ती म्हणजे भारतातील पुरस्कार प्राप्त मान्यवर लेखकांनी असहिष्णुतेचे कारण दाखवत सरकारला पुरस्कार परत केले. उत्तर प्रदेशातील दादरी येथील अखलाकच्या हत्येचे भांडवल करून भारतामध्ये असहिष्णुता वाढीस लागून ती हाताळण्यापलीकडे गेली आहे असा कांगावा केला; त्या लेखकांना पठाणकोटच्या हल्ल्यात असहिष्णुता दिसली नाही का? जिवावर उदार होऊन शत्रूशी लढताना देशासाठी जीव देणाऱ्या शिपायाचे हौतात्म्य त्यांना का दिसले नाही? हैदराबाद येथे "हैदराबाद साहित्यिक उत्सवाचे’ उद्घाटन करताना लेखिका नयनतारा सहेगल यांनी मागील वर्षभरात दादरीतील अखलाकच्या हत्येपासून असहिष्णुता कशी वाढीस लागलेली आहे आणि हिंदुत्वाचा कसा प्रभाव वाढत जात आहे याची पुन्हा एकदा री ओढली. त्यांच्या भाषणाला तेलंगणा राज्याचे राज्यपाल नरसिंहन यांनी मात्र चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "स्वातंत्र्याचा हक्क हा जगमान्य असला तरी कोणत्याही प्रश्नावर विरोध दर्शविणे ही एक व्यक्तिगत बाब आहे व आपण कोणत्या प्रश्नाकडे कसे बघतो यावर ते अवलंबून आहे. कुटुंबाचे उदाहरण देताना ते म्हणाले, "एखाद्या कुटुंबामध्ये मतभेद जरूर असतात, परंतु त्या मतभेदांना मागे टाकून आपण पुढे जात असतो.’