क्रेझअभावी रघुनाथदादांचे ‘आप’लेपण बेदखल
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आपमध्ये प्रवेश केला खरा; पण त्याने राज्याच्याच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या राजकारणावरही दखलपात्र परिणाम होण्याची शक्यता नाही. ऊस आंदोलनातून दादांचे नेतृत्व उदयाला आले; मात्र सध्या ऊस आंदोलनातही ते बेदखल झाले आहेत. मुळात ‘आप’कडे तरुणवर्ग आकर्षिला जात आहे. रघुनाथ पाटील यांच्याविषयी तरुणांमध्ये क्रेझ नाही. किंबहुना, वादग्रस्त विधाने करण्यापलीकडे आणि अव्यवहार्य ऊसदर मागण्यामुळे रघुनाथदादांना कोणी गांभीर्यानेच घेईनासे झाले आहे. त्यामुळे त्यांचा ‘आप’लेपणाही असाच बेदखल होण्याची शक्यता आहे
खळ्ळ खटॅकवाल्यांना काय मिळाले? आंदोलनापासून कार्यकर्ते दूरच
नाशिकमध्येच महापालिकेत सत्ता मिळालेल्या मनसेला नाशकात दोन वर्षांत कोणतेही मोठे काम उभे करून दाखवता आले नाही. यामुळे पुन्हा जनमानसात आपले स्थान पक्के करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज यांनी टोलविरोधात शस्त्र पुन्हा हाती घेतले. मात्र, हे शस्त्र पाहिजे तसे परजलेच नाही. याबाबत मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र वेगळाच मतप्रवाह दिसून आला. परप्रांतीय आणि मराठीचा मुद्दा हाती घेतेवेळी मनसेला मिळालेली प्रसिद्धी आणि त्या आंदोलनात झालेली खळ्ळ खटॅक मात्र या रस्त्यावरील आंदोलनात पाहावयास मिळाली नाही. यामुळे साहजिकच या आंदोलनाने साहेबांना आणि त्यांच्या सैनिकांना काय मिळाले अशी चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होणार्या कार्यकर्त्यांना पदे वाटप करताना दूर ठेवत असल्याने असे कार्यकर्ते आंदोलनापासून काहीसे दूरच राहिले.
चहावालेच दाखवतील कात्रजचा घाट
भा जपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना कॉँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात चहावाला म्हणून हिणवणार्या कॉँग्रेस नेत्यांना चोख उत्तर देत याच टीकेला आधार करीत भाजपने प्रचार सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरातील अनेक शहरांत एकाच वेळी चहाच्या टपरीजवळ एकत्र येणार्या नागरिकांना ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमातून मोदींशी संवाद साधला जात आहे. शहरात बुधवारी याच प्रकारचा कार्यक्रम चार ठिकाणी झाला. मोदींनी गुड गव्हर्नन्स या मुद्दय़ावर देशवासीयांना त्यांचे व्हिजन सांगत लोकांकडूनही सूचना मागविल्या. गुजरातमध्ये गुड गव्हर्नन्स कसे यशस्वी होत आहे याचे दाखलेही त्यांनी दिले.
देशातून आलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी सर्मपक उत्तर दिल्याने नागरिक टाळ्यांचा कडाकडाट करून स्वागत करत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन भाजपने नाही तर सीएजी या संस्थेने केले होते. हाच कार्यक्रम अजून आठ वेळा शहरातील विविध भागांत होत असल्याने मोदी आणि त्यांचे चहावाले कॉँग्रेसला मात्र कात्रजचा घाट पाहायला लावतील, अशी चर्चा सुरू आहे.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(संकलन- समाधान पोरे l धनंजय रिसोडकर l संजय भड l सचिन वाघ l विजय दुधभाते l दीपक कांबळे l किशोर वाघ l भूषण महाले)