आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीपकुमार नव्हेच; राजकारणातील ‘ट्रॅजेडी किंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार हे निर्विवादपणे आजघडीचे राज्यातले सर्वोच्च नेते. सत्तेत नसण्याची वेळ दीर्घकाळानंतर त्यांच्यावर आली आहे. पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगण्यात पाच दशके घालवल्यानंतर भावनेचे राजकारण करण्याची वेळ पवारांच्या पक्षावर यावी, ही खरी ‘ट्रॅजेडी’ आहे.

देशाच्या राजकारणातले वजनदार नेते शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय टक्कर महाराष्ट्राने अनुभवली आहे. सन १९९५ मध्ये शरद पवारांना राज्याच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले यामागे मुंडे यांनी त्या वेळी राज्यभर काढलेल्या संघर्ष यात्रेचा वाटा लक्षणीय होता. मुंडे यांनी पवारांवर चौफेर हल्ले केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात तोपर्यंत शरद पवारांना अंगावर घेण्याचे राजकीय धाडस कोणी दाखवले नव्हते. अर्थात पवारांवर बेछूट फैरी झाडणाऱ्या मुंडे यांना सत्तेत आल्यावर एकही आरोप सिद्ध करून दाखवता आला नव्हता. मात्र पवार-मुंडे यांच्यात उभी फूट पडली ती तेव्हापासूनच. एरवी वैयक्तिक आयुष्यात विरोधकांशीही मैत्री जपणारे नेते ही पवारांची ओळख आहे. राजकीय पटलावर आणि खासगी आयुष्यात या दोन्ही ठिकाणी मुंडे यांच्याशी मात्र पवारांची सलगी कधीच जुळू शकली नाही. ‘पवारांचा कडवा विरोधक’ ही प्रतिमा मुंडे यांनीही आयुष्यभर कसोशीने जपली. पवारांनी पातळी सोडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मुंडेंचा लाडका पुतण्या पवारांच्या पुतण्याने ओढून नेला तेव्हा मात्र मुंडे मनापासून दुखावले होते. पवारांनी घर फोडल्याचे दु:ख ते खासगी गप्पांमध्ये व्यक्त करायचे.

पवार यांनी राजकीय जीवनात पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या अनेकांशी राजकीय कुस्ती खेळली. शंकरराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, विठ्ठलराव गाडगीळ, विलासराव देशमुख, सुधाकर नाईक, पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेस नेत्यांपासून ते बाळासाहेब ठाकरे, एन. डी. पाटील यांच्यापर्यंत कित्येकांशी त्यांचे मतभेद राहिले. परंतु मुंडे-पवार वादाला जी टोकदार किनार होती ती यातल्या कोणत्याच विरोधकाबरोबरच्या संघर्षाला नव्हती. पंकजा या गोपीनाथरावांच्या कन्या. महाराष्ट्राच्या राजकारणात त्या नवख्या आहेत. राजकीय डावपेच, छक्केपंजे यात त्या किती तरबेज आहेत, याची झलक अजून महाराष्ट्राने पाहिलेली नाही. गोपीनाथरावांच्या अकाली निधनाच्या भांडवलावरच त्यांचे आतापर्यंतचे राजकारण पुढे सरकलेले आहे. चिक्की प्रकरणाच्या धगीतून अद्याप त्या पुरत्या बाहेर पडलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासमवेत एका व्यासपीठावर येण्याची संधी त्यांना नुकतीच मिळाली. या वेळी बोलताना त्यांनी शरद पवारांचा उल्लेख ‘राजकारणातले दिलीपकुमार’ असा केला. पवार आणि दिलीपकुमार यांच्यातील कोणते साम्य पंकजा यांनी पाहिले, असा प्रश्न स्वाभाविकपणे पुढे आला.

पाकिस्तानातल्या पेशावर येथे जन्माला आलेले मोहंमद युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार आता ९२ वर्षांचे आहेत. बारामतीचे पवार पंचाहत्तरीत असल्याने दोघांच्या वयाची तुलना करण्याचा प्रश्न मोडीत निघतो. दिलीपकुमार अभिनेते तर पवार नेते. दोघांची कार्यक्षेत्रेही भिन्न. दोन साम्ये मात्र दाखवता येण्यासारखी आहेत. दिलीपकुमार यांना तरुणपणी मंडईत फळविक्री करावी लागली होती. पवारही तारुण्यात तालुक्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला विकायला जायचे. दिलीपकुमार यांचे भारतीय हिंदी चित्रसृष्टीतील अढळ स्थान वादातीत आहे. अभिनयात त्यांनी गाठलेल्या उंचीचे अनुकरण आजचे अभिनेतेही करतात. गेल्या सहा दशकांपासून सर्वांचे आदरस्थान, प्रेेरणास्थान असलेले दिलीपकुमार जसे अभिनय क्षेत्रात तेच स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचे. महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणातील सर्वोच्च स्थानी असलेले नेते या अर्थाने पंकजा यांनी शरद पवार यांना राजकारणातले ‘दिलीपकुमार’ ठरवले. पंकजांच्या बोलण्यात उपहास नव्हता तर त्या आदरानेच बोलत होत्या, असे कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांचे सांगणे आहे. पवारांच्या मनात मात्र ‘ट्रॅजेडी किंग’चा संदर्भ पकडत आपल्याला ‘दिलीपकुमार’ ठरवले की काय, असा संशय आला असावा.

पवारांच्या पक्षाला राजकारणात फारसे स्थान असणार नाही, असा निकाल वर्षभरापूर्वीच्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जनतेने घेतला. देशाच्या आणि राज्याच्या सत्ताकारणात स्थान नसण्याची वेळ जवळपास तीस वर्षांनी पवारांवर ओढवली. उत्कृष्ट प्रशासक, शेतीतज्ज्ञ, नियोजनकार, जाणता राजा वगैरे असूनही त्यांच्या दीर्घ सत्ताकाळात विदर्भ-मराठवाड्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचले नाही. नवे सरकार येऊन जेमतेम वर्ष उलटत नाही तोवर मात्र त्यांच्या नावे खडे फोडत दुष्काळग्रस्तांसाठी चक्क रस्त्यावर उतरण्याची ‘ट्रॅजेडी’ पवारांच्या नशिबी आली. राज्यात ४ खासदार आणि ४५ पेक्षा कमी आमदार इतके नीचांकी राजकीय समर्थन आजवरच्या राजकीय इतिहासात पवारांना पहिल्यांदाच मिळाले. त्याअर्थीही पवार यंदाचे ‘ट्रँजेडी किंग’ ठरले. नेमक्या याच जखमेवर पंकजांनी चारचौघात बोट ठेवले की काय, अशी शंका पवारांना आली असावी. पंतप्रधानपदाचे स्वप्न आणखी पाच वर्षांनी लांबणीवर पडले, ही ‘ट्रॅजेडी' आणखी वेगळी. रमेश कदमांपाठोपाठ विविध घोटाळ्यांच्या वादळात अडकलेल्या आणखी कोणत्या पाठीराख्यांचा ‘जेलभरो' कार्यक्रम पाहण्याची ‘ट्रॅजेडी' होणार, हे काळच सांगू शकतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी केल्याची खात्री असताना पंधरा वर्षांच्या सत्तेत त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, यालासुद्धा ‘ट्रॅजेडी’च म्हणावे लागेल. पुरंदरे यांनी धार्मिक उन्माद पसरवल्याचे माहिती असूनही त्यांनाच ‘डॉक्टरेट’ने गौरवण्यासाठी पवार गेले, हीसुद्धा ‘ट्रॅजेडी’च. पवार आणि त्यांच्या पक्षातील अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सातत्याने लोकांच्या भावना आणि अस्मिता भडकवण्याचा आरोप केला. आता याच पवारांना आणि त्यांच्या पक्षाला सत्तेबाहेर जाऊन वर्षसुद्धा होत नाही तोवर ठाकरे यांचीच वाट चोखाळावी लागते ही खरी ‘ट्रॅजेडी’ आहे. हेच संदर्भ लक्षात घेत पंकजांनी ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीपकुमारची उपमा दिल्यामुळे पवार कावले का? अन्यथा एरवी पोराटोरांच्या मतांना महत्त्व न देणारे पवार इतक्या तातडीने प्रत्युत्तर देऊन मोकळे झाले नसते.