आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूने जिवंत ठेवलेले नेताजी (गूढ इतिहास)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेताजींच्या वडील बंधूंना म. गांधींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सुभाषबाबूंचे श्राद्ध स्थगित करा आणि ईश्वराची साधी प्रार्थना करा. सरोजिनी नायडूंनीही बोस भारतात प्रगटले तर आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले होते. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी जनरल मॅक आर्थरने भारताच्या गव्हर्नर जनरलना तारेने कळवले की बोस पुन्हा निसटले.

डिसेंबर २००१ च्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जपानला भेट दिली. त्या वेळी रेन्कोजी टेंपलमध्ये जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीस अभिवादन केले. नेताजींचे सहकारी राहिलेले शिगेमोटो ओकुडो यांनी (आज ते ७९ वर्षांचे आहेत)अटलजींना नेताजींच्या अस्थी भारतात न्याव्यात, अशी विनंती केली. या टेम्पलमध्ये अस्थी कलश ठेवलेला आहे. या अस्थी खरोखरच नेताजींच्या आहेत काय याविषयी वाद असल्याने अटलजींनी वेळ मारून नेली. पूर्वीही जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी या टेंपलला भेट दिली होती, पण नेताजींच्या अस्थींबाबत त्यांनी मौन पाळले होते.

नेताजींचा अपघाती मृत्यूच वादग्रस्त झाल्याने अस्थी कोणाच्या याचे सत्य शोधण्यासाठी भारत सरकारने दोन आयोग पूर्वी स्थापन केले होते. एकदा शहानवाझ खान, तर दुसऱ्या वेळी न्या. जी. डी. खोसला आयोगाचे अध्यक्ष होते. या दोन्ही आयोगांनी अस्थी नेताजींच्याच आहेत, असा निष्कर्ष काढला, तरी शंकेचे वातावरण निवळले नाही. म्हणून मे १९९९ मध्ये एच.एन. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक आयोग स्थापन झाला.

नेताजी आज जिवंत असते तर १०४ वर्षांचे असते. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी फोर्मोसातल्या तैहोकू शहराजवळील विमान अपघातात ओढवला, ही बातमी आजही सत्य म्हणून कोणी मानायला तयार नाही. कारण त्यांच्या मृत्यूचा ठोस पुरावा विविध चौकशी समित्या कायम होऊनही मिळू शकला नाही. या गूढतेच्या वलयाने नेताजी मृत्यूनंतरही लोकांना ते मरण पावले नाही, असेच वाटते. नेताजी आज जिवंत आहेत काय, अशी शंका आज निरर्थक आहे, पण १८ आॅगस्ट १९४५ च्या विमान अपघातात ते निधन पावले, याची सत्यता मात्र साशंक आहे. नेताजींनीच या वेळी आपल्या मृत्यूची हूल उठवली आणि ते भूमिगत होऊन आपल्या कार्याला लागले, असेही बऱ्याचदा बोलले गेले. नेताजी अपघातात मरण पावले हे खोटे आहे हे दाखवण्यासाठी एक छायाचित्र मधल्या काळात प्रसिद्ध झाले होते. त्याचा प्रसंग जवाहरलाल नेहरूंच्या अंत्यदर्शनाचा. त्यांचे निधन २७ मे १९६७ रोजी झाले. २८ मे रोजी ज्या लोकांनी जवाहरलालजींचे अंत्यदर्शन घेतले त्यात एका प्रसंगी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखी हुबेहूब छबी असणारी एक व्यक्ती छायाचित्रात दिसते. त्याबद्दल कथा अशी सांगितली जाते की, बौद्ध भिख्खू आणि लामा यांच्या वेशातील दुसऱ्या काही व्यक्तींसह नेताजी सकाळी अकरा वाजता टॅक्सीतून त्रिमूर्ती भवनापाशी आले. नेताजी टॅक्सीत बसून राहिले. बाकी लोक त्रिमूर्ती भवनात गेले व लालबहादूर शास्त्रींना घेऊन टॅक्सीजवळ आले. टॅक्सीतून एक बंद पाकीट शास्त्रींना देण्यात आले. ते फोडून त्यांनी पत्र वाचले. स्मितपूर्वक ते नेताजींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलले व त्रिमूर्ती भवनात गेले. काही वेळाने शास्त्रीजी परत आले. नेताजी व त्यांचे सहकारी यांना घेऊन जवाहरलाल यांच्या पार्थिवापाशी गेले. व्हीआयपी मार्गाने नेताजींना आत नेण्यात आले. जवाहरलालजींच्या पार्थिवाचा एक गुडघा थोडा वर उचललेला होता. त्या ठिकाणी एक काळा ठिपका छायाचित्रात दिसतो. ती नेताजींनी लिहिलेली चिठ्ठी आहे. त्यावर इंग्रजीत वाक्य होते : "जवाहरलाल नेहरूंचे दुसरे नाव होते साहस. चला, या साहसाने भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण झटूया' सुभाषचंद्र बोस यांचा २८ मे रोजी आकाशवाणीवरून आँखो देखा हाल दिला जात होता. त्यात नेताजी असा उल्लेख नव्हता, पण असे वर्णन होते की एक योगी जवाहरलालना हार घालत आहेत.

त्याला एक कागदाची चिठ्ठी जोडलेली आहे. ही चिठ्ठी दूर असल्याने मला वाचता येत नाही. असे म्हणतात की, डॉक्युमेंटरी विभागाने या अंत्यदर्शनाची न्यूज रील काढली होती. त्यातून एवढे दृश्य नंतर कापण्यात आले. कारण हे दृश्य येताच टॉकीजमध्ये प्रेक्षक नेताजी-नेताजी अशा आवाजात गलका करत असत. नंतर दुसरा खोसला आयोग कायम झाला. त्यांनी हा योगी धर्मवीर नावाचा होता, असे म्हटले. पण ही व्यक्ती सरकारने समाजापुढे कधीच उभी केली नाही किंवा तिची खात्रीलायक माहिती दिली नाही.

नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ ला अपघाती झाला. याची खात्री असती तर १९५६ व १९७० मध्ये सरकारने दोन आयोग कशासाठी नेमले, हाही प्रश्न निर्माण होतो. नंतर या दोन्ही समित्यांचे अहवाल रद्द झाले. असे म्हटले जाते की १८ ऑगस्ट १९४५ ला नेताजी तैपेहमध्ये नव्हतेच. ते त्या वेळी दक्षिण व्हिएतनामची राजधानी येथून भूमिगत झाले. तसे पाहता सुभाषबाबूंचे आयुष्य एक मिथक होऊन राहिले. नेताजींनी भारतातून अदृश्य होण्याआधीपासूनच म्हणजे १९४० पासून रशियाशी संपर्क साधला होता. १९४४ पासून ते जपान सरकारवर सतत दडपण आणत होते की त्या सरकारने त्यांना रशियाला पोहोचण्यासाठी साह्य करावे. म्हणजे रशियाला जाऊन पुढील चळवळ चालू ठेवण्याचा त्यांचा इरादा होता. कारण सोव्हिएत रशिया भारताच्या स्वातंत्र्याचा समर्थक बनेल, अशी खात्री सुभाषबाबूंना वाटत होती. कारण ब्रिटन-अमेरिका नेतांजींचे शत्रू होते व रशियाचे त्यांच्याशी पटत नसे. १९४५ मध्ये याल्टा संमेलनात स्टॅलिन, चर्चिल व अमेरिकेचे रुझवेल्ट यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. ही गोष्ट रशिया व दोस्त राष्ट्रांच्या म्हणजे ब्रिटन -अमेरिकेच्या व रशियाशी असलेल्या तात्पुरत्या मैत्रीचेच संकेत देत होती. असाही उल्लेख सापडतो की नेताजी १९४५ च्या तथाकथित विमान अपघाताच्या दोन महिने आधी स्वत: रशियात जाऊन आले होते. रशियात जाण्यासाठी त्यांना हिकारी किकान या जपानी अधिकाऱ्याने खूप मदत केली. बाॅम्बर विमानाची व्यवस्था केली व नेताजींना अदृश्य होण्यास मदत केली.
विमान अपघात १८ ऑगस्टला झाला, पण बातमी जगभर प्रसारित करण्यात आली २३ ऑगस्टला. म्हणजे पाच दिवसांनंतर. या काळात नेताजी सुरक्षितपणे रशियात पोहोचले याची खातरजमा करण्यासाठी तर हा उशीर लावला नसेल ना, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर नेताजींना ब्रिटन-अमेरिकेने शत्रूचे एजंट ठरवत नेताजींना युद्ध अपराधी म्हणून घोषित केले होते. तसे नेताजी आपल्या आयुष्यात तीन वेळा मेले, पण प्रत्येक मरण खोटे ठरले. १९४२ मध्ये ब्रिटिश सरकारने विमान कोसळून नेताजी मरण पावले असा खोटा प्रचार केला. नंतर खुद्द नेताजींनीच मी जिवंत आहे, असे आझाद हिंद रेडिओवरून जाहीर केले. १९४४ ला सिंगापूरहून मौलमेनला जाताना मोटार अपघातात नेताजी मरण पावले, असा खोटा प्रचार झाला आणि तिसऱ्यांदा १८ ऑगस्ट १९४५ ला तैपेहला नेताजी विमान अपघातात निधन पावले. ही बातमी आली. हाही अपघाती मृत्यू संशयास्पद आहे , कारण असाही उल्लेख सापडतो की त्यानंतर १९ डिसंेबर १९४५ ला नेताजींनी मांचुरिया रेडिओवरून भाषण केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी भारतात जाईन. असे म्हणतात की, या रेडिओवरून त्यांनी तीन भाषणे केली आणि ती भाषणे बंगालच्या तत्कालीन राज्यपालांचे रेडिओ मॉनिटर पी.सी. धर यांनी मुद्रित केली होती.

तद्नंतर नेताजींच्या वडील बंधूंना महात्मा गांधींनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, सुभाषबाबूंचे श्राद्ध स्थगित करा आणि ईश्वराची साधी प्रार्थना करा. सरोजिनी नायडूंनीही बोस भारतात प्रगटले तर आश्चर्य वाटणार नाही, असे म्हटले होते. १९ ऑगस्टला अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांचे लष्करी अधिकारी जनरल मॅक आर्थरनी भारताच्या गव्हर्नर जनरलना तारेने कळविले की सुभाषचंद्र बोस पुन्हा निसटले आणि त्यांनी आपल्याला फसवले. के. पी. एस मेनन हे ९ वर्षे रशियात भारताचे वकील होते. त्यांनी असे म्हटले की, नेताजी रशियात होते आणि अटकेत नव्हते, तर स्टॅलिनचे सन्माननीय पाहुणे म्हणून राहत होते. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान अॅटली यांनी भारताचे व्हाइसराय लॉर्ड व्हेव्हेल यांना विचारले की, नेताजी बोस यांच्याबरोबर कसा व्यवहार करावा? तेव्हा वेव्हेलने उत्तर दिले की, सुभाषचंद्र बोसना ते जेथे आहेत तेथेच राहू द्यावे आणि त्यांना शरणागती पत्करण्याचा हुकूम देऊ नये. नसता भारतात सत्तांतर गुंतागुंतीचे होईल. एकूण काय, तर एवढे सर्व असून त्यांच्या मृत्यूचे गूढ कायमच आहे.
बातम्या आणखी आहेत...