आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकड्यांचा खेळ आणि शाळाबाह्य लेकरांची दैना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या लेकरांविषयी साने गुरुजींचे हृदय घेऊन अधिकारी, शिक्षक सर्व्हे करतील तेव्हाच ही लेकरं सापडतील आणि शाळेत येतील...साने गुरुजी, सांगा ना तुमची करुणा कोणत्या वेबसाइटवर आहे ..डाऊनलोड करून घेईन म्हणतो ....

अकबराने बिरबलला विचारले ‘आपल्या राज्यात कावळे किती?
बिरबल म्हणाला ‘महाराज, राज्यात इतके इतके कावळे आहेत
अकबर म्हणाला, आणि जास्त भरले तर...
बिरबल म्हणाला, जास्त भरले तर पाहुणे आले आणि कमी भरले तर कावळे परगावी गेले...
२०१५ मध्ये अकबराने बिरबलला पुन्हा विचारले, आपल्या राज्यात शाळाबाह्य विद्यार्थी किती?
बिरबल म्हणाला, महाराज फक्त ५०,०००.
अकबर म्हणाला, अरे पण त्या स्वयंसेवी संस्था तर बोंबलताहेत की ९ लाख मुले आहेत म्हणून
बिरबल म्हणाला, महाराज, त्यात काय विशेष...सांगून टाका उरलेली काही शाळेत गेली आणि काही
स्थलांतरित झाली.
बिरबलाची वरवर विनोदी वाटणारी गोष्ट आज शासनाने अक्षरश: खरी करून दाखवली आणि एका दिवसात शाळाबाह्य विषय संपवून टाकला.

प्रश्नच मान्य करायचा नाही म्हणजे तो सोडविण्याची जबाबदारी आपल्यावर येत नाही हे शासन शाळा आणि शिक्षक या तिघांचे एकमत झाले. राज्यातील २० जिल्ह्यांत फिरून मी ‘आमच्या शिक्षणाचे काय’ हा अहवाल प्रसिद्ध केला. बालकामगार,भटके विमुक्त, आदिवासी, रस्त्यावरची मुले, ऊसतोड, वीटभट्टी, दगडखान यातील मुले बघितली. पण आज त्यांचे अस्तित्वच मान्य करायचे नाही. हाच सर्व्हेचा सांगावा आहे.

राजस्थानसारख्या मागास राज्याने जनगणनेच्या धर्तीवर शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आणि जिथे फक्त दोन लाख मुले दाखवली होती तिथे चक्क २२ लाख शाळाबाह्य मुले सापडली. हे जर राजस्थानात घडू शकते तर महाराष्ट्रात का नाही, म्हणून या क्षेत्रातील कार्यकर्ते शासनाला हेच सुचवत राहिले आणि शासनाने मान्यही केले. कार्यकर्ते खूप खुश झाले. ४ जुलैला राज्यातील ९ लाख मुले सापडणार आणि शाळेत बसणार...अगदी निर्धास्त होते सारे आणि आकडे आले ...मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात १ लाख ४५ हजार दाखविले होते तितकेसुद्धा राहिले नाहीत ...सापडले फक्त ५०,०००...

आम्हाला वाटले आता ज्यांनी खोटे सर्व्हे केला किमान त्यांच्यावर कारवाई तरी होईल, पण शिक्षणमंत्री म्हणाले हा सर्व्हे निम्माच होता. पुढे वर्षभर सुरू राहील...झाले सर्वांना क्लीनचिट मिळाली, पण सर्व्हे करणाऱ्या १० लाख शिक्षकांचा व यंत्रणेच्या नुसत्या एक दिवसाच्या पगाराचा नुसता हिशेब केला तरी कोट्यवधी रुपयांची रक्कम पाण्यात गेली. बहुसंख्य शिक्षक व अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या एकतर खोटी माहिती दिली किंवा पूर्ण भेटी दिल्या नाहीत, पण कुणावरच कारवाई झाली नाही.

नंतर बातम्या आल्या ..चॅनलवर चर्चा झाल्या...आम्ही आंदोलन केले...आणि शासनाने पुन्हा फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि त्या पत्रात आंदोलनाचा उल्लेख केला. लोकशाही आंदोलनाच्या आमच्या या यशाने आम्ही भारावून गेलो. वाटलं जे सुटले ते आता सापडणार आणि उद्या शाळेत बसणार. पण जिल्ह्याजिल्ह्यात विचारले, तर ते उलटे आम्हालाच विचारायला लागले, असा काही आदेश होता का...याचा अर्थ फेर सर्वेक्षण तर दूरच पण साधे आदेशसुद्धा नीट पोहोचले नाहीत.

आता कार्यकर्त्यांनी काय फेर फेरसर्वेक्षणाच्या फेरचौकशीची मागणी करायला पुन्हा फेरउपोषण करायचे का...आणि त्या फेरचौकशीचा पुन्हा फेरपाठपुरावा करत राहायचा का? कधी कधी वाटते की व्हाउचर पद्धती आणावी. व्हाउचर पद्धतीत शासन एका मुलावर जितका खर्च करते ती रक्कम थेट पालकांच्या हातात कूपन स्वरूपात देते. या शाळाबाह्य मुलांच्या हातात २२ हजार रुपयांचे कुपन द्यावे म्हणजे मग शाळा या मुलांना नेण्यासाठी भांडतील.

कार्यकर्ते म्हणतात, राज्यात ९ लाख मुले शाळाबाह्य आहेत. शासन म्हणते ५०,०००. ५ ते १० हजारांची गफलत समजू शकते. व्यवहारात रस्त्यावर अंधारात १ रुपया हरवला तरी शोधणारे हिशेबी आपण इथे एक मुलगा म्हणजे एक एक स्वतंत्र आयुष्य असताना इथे लाखांचे आकडे इकडचे तिकडे होतात आणि शासन ते शाळा इथपर्यंत कुणालाच काही वाटत नाही. इतकी व्यवस्था म्हणून आम्ही संवेदना गमावून बसलो. इतकी आयुष्य पणाला लागताना आम्ही आकड्यांचे खेळ करतो आहोत.

लालफितीच्या सचिवालयातील प्रतिक्रिया तर धक्कादायक आहे. ज्या अर्थी इतकी कमी मुले सापडली याचा अर्थ उरलेली शिक्षकांनी दाखल केली अशी बिरबलासारखी भाषा ऐकावी लागली आणि असलेली मुले आधी ऑनलाइन नोंदवून घेऊ आणि मग उरलेली मुले शोधू हे उत्तर. याचा अर्थ तोपर्यंत आणखी काही महिने या मुलांनी वाट बघायची. माझ्या सहज मनात प्रश्न आला की आपल्या घरातील मुलांना शाळेत दाखल करताना आपण इतके थंड वागू का?

चातुर्वर्ण्य व्यवस्थेने ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले त्यांना आज कल्याणकरी राज्यात फुले-शाहू- आंबेडकरांचा जयघोष करणाऱ्यांच्या राज्यात पुन्हा एकदा शिक्षणापासून आपण वंचित ठेवणार आहोत. त्या मागच्या व्यवस्थेला किमान प्रतिगामी म्हणून शिवी तरी देता येत होती. पण या व्यवस्थेच्या हातात फुले-शाहूच्या नामाची जपमाळ आणि चेहऱ्यावर लोकशाही समाजवाद आहे ...यांना बोलायची चोरी...व्यवस्था बदलली तरी आमची मानसिकता तीच आहे.

जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत पोलिस पाठीमागे लावून सर्व्हे केला तरी हेच आकडे येतील. या लेकरांविषयी साने गुरुजींचे हृदय घेऊन अधिकारी, शिक्षक सर्व्हे करतील तेव्हाच ही लेकरं सापडतील आणि शाळेत येतील...
साने गुरुजी, सांगा ना तुमची करुणा कोणत्या वेबसाइटवर आहे ..डाऊनलोड करून घेईन म्हणतो...
- लेखक शाळाबाह्य विद्यार्थी समितीचे माजी सदस्य आहेत.
बातम्या आणखी आहेत...