आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Jayanti Special, Article About Shivaji Maharaj Visit Of Mangalvedha

एक लढाई : शिवरायांची दख्खन स्वारी अन् मंगळवेढा भेट, मुघलांनी घेतली माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना हिंदुस्थानच्या बऱ्याच मुलुखात घौडदौड करावी लागली. राज्याचा कानाकोपरा महाराजांनी अक्षरश: पिंजून काढला. हल्लीच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, ब्रह्मपुरी, कासेगाव, सलगर आणि सांगोला आदी ठिकाणी महाराजांच्या भेटींचे दाखले भरभक्कम पुराव्यासह इतिहास तज्ज्ञांकडून दिले गेले आहेत.
शिवाजीराजांनी मुघलांबरोबर आदिलशाही मोहिमेवर स्वत:च्या सात-आठ हजार सैन्यासह सहभागी होण्याची अट होती. त्यानुसार उभय सैन्य पुरंदर पायथ्यापासून आदिलशाही मुलुखात नीरा नदी ओलांडून पुढे सरकले. फलटण, नाथवडा असा आदिलशाही मुलूख जिंकून मुघलसैन्याबरोबर शिवाजीराजे १९ डिसेंबरला मंगळवेढा किल्ल्याजवळ पोहोचले. उभय सैन्याच्या आघाडीला सरनोबत नेताजी पालकर असत. त्यांनी त्याच दिवशी आदिलशाही ताब्यातील मंगळवेढा घेतला. २० डिसेंबर १६६५ रोजी मिर्झाराजे शिवाजीराजे यांनी मंगळवेढा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली आणि तळावर परतले. (हल्ली मंगळवेढा येथे किल्ल्याची चौबुर्जी आहे. त्या वेळच्या किल्ल्याचे अस्तित्व नाही.)
मिर्झाराजेंनी मुघलांतर्फे सरफराज खान यास किल्लेदार म्हणून नेमले. मिर्झाराजे आणि शिवाजीराजे यांच्या फौजांचा २३ डिसेंबरपर्यंत मंगळवेढा परिसरात तळ होता. तो हल्लीच्या जुन्या मंगळवेढा - कासेगाव रस्त्यावर असावा, असे वाटते. २४ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजीराजे यांची फौज विजापुरी फौजांवर चालून गेली. त्यांच्या साथीला मुघलांचे सरदारही होते. तर आदिलशाही सैन्यात सर्जाखान, खवास खान, कल्याणी यादव आदींसह शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले होते. उभय सैन्यात युध्द झाले पण ते निर्णायकी नव्हते.
पुन्हा विजापुरी सेनापती सर्जाखान याने थेट मंगळवेढ्याच्या किल्ल्यावरच हल्ला करून किल्लेदार सरफराज खान याच्यासह त्याच्या पुत्रास जावयास ठार मारले. या विजापूर मोहिमेत मुघलांना यश मिळाले नाही. त्यांना बादशाहाच्या आदेशानुसार माघार घ्यावी लागली. त्याचा शेवट होण्यापूर्वीच शिवाजीराजांनी ११ जानेवारी १६६६ रोजी मिर्झाराजांच्या मान्यतेने पन्हाळ्याकडे कूच केले. यावरून १९ डिसेंबर १६६५ ते ११ जानेवारी १६६६ या काळात शिवाजीराजे मंगळवेढा तळावर होते, असे म्हणता येईल.
पुढे वाचा, सिद्धी मसूदने मागितली शिवाजी महाराजांकडे मदत...
शब्दांकन: महेश भंडारकवठेकर, पंढरपूर