आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिर्र....थरार लोकोत्सवाचा; बैलांच्या शर्यतीचा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचशे वर्षांची परंपरा असलेल्या बैलांच्या शर्यतींवरील छळाचे आरोप निराधार आहेत. पोटच्या पोराइतके बैलांवर प्रेम केले जाते. केंद्राचा निर्णय कायम राहण्यासाठी आम्ही कॅव्हेट दाखल करतो आहोत. शर्यतीत भाग घेणारा कोण स्वतःहून आपल्या बैलाला इजा करेल? त्यामुळे बैलांचा छळ होतो हा आरोपही तथ्यहीन आहे.
केंद्रातल्या काँग्रेस सरकारने बैलगाडा शर्यतींवर निर्बंध आणले. त्याविरोधात सन 2013 मध्ये पुणे जिल्ह्यातून खेड तालुका गाडा चालक-मालक संघटना आणि किशोरशेठ दांगट यांच्या वतीने सर्वप्रथम आम्ही दोन याचिका दाखल केल्या. मात्र, 7 मे 2014 ला बैलगाडा शर्यतीवर कायमची बंदी आली. क्रूरतेच्या नावाखाली या शर्यती बंद झाल्या. या देशात घोड्यांच्या शर्यती चालतात. का? तर तो पळणारा प्राणी आहे. बैलांचे खूर पळण्यासाठी योग्य नसतात, असे सांगितले गेले. परंतु, बैलांच्या शर्यतींनासुद्धा परंपरा असल्याने आम्ही शासकीय स्तरावर झगडत होतो.

बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सतत भेटत होतो. मागच्या सरकारने अधिसूचना काढून अस्वल, माकड, वाघ, चित्ता, सिंह आणि बैल या सहा प्राण्यांच्या प्रदर्शन किंवा त्यांच्या प्रशिक्षणावर बंदी घातली होती. बैल हा हजारो वर्षांपासून माणसाचा साथीदार आहे. त्यामुळे या प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ शब्द वगळावा, ही बैलगाडा चालक-मालकांची भूमिका होती. या संदर्भातल्या कायदेशीर बाबी जावडेकर यांनी समजून घेतल्या. जावडेकर यांनी या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलले आणि बैलांच्या शर्यती, तामिळनाडूतील जलिकट्टू या पारंपरिक खेळांना मान्यता दिली. या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो. केंद्राच्या या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. म्हणूनच आम्ही सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करतो आहोत.

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर गुजरात, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, केरळ आदी राज्यांमध्येसुद्धा शेकडो वर्षांपासून बैलांच्या शर्यती होतात. साधारणतः संक्रांतीनंतर ग्रामीण महाराष्ट्रात यात्रा, जत्रा, उरूस सुरू होतात. बैलांच्या शर्यती हा ग्रामीण लोकोत्सवांचा अविभाज्य भाग असतो. शर्यतींचे प्रकारांमध्ये त्या-त्या ठिकाणी फरक असतो. परंतु, शर्यतींचा आनंद लुटण्याची परंपरा किमान पाचशे वर्षे जुनी आहे. बैलांच्या शर्यती हा प्रकारच क्रूर आहे, शर्यतींमध्ये पळवल्या जाणाऱ्या बैलांवर अत्याचार केले जातात, त्यांना इजा होते, यांसारखे आक्षेप घेत अलीकडच्या काळात प्राणिप्रेमी संघटनांनी बैलगाडा शर्यतीला विरोध सुरू केला. परंतु, या आक्षेपांमध्ये तथ्य नाही. बैलाशिवाय आपली कृषी संस्कृती पूर्ण होत नाही. बैलाच्या बळावर शेतीचा गाडा ओढणारा शेतकरी दावणीच्या बैलावर पोटच्या पोराइतके प्रेम करतो. शर्यतीमध्ये पळवण्यासाठीचे बैल असतील तर मग त्यांची आणखीनच काळजी घ्यावी लागते. कारण बैल जर तगडे, सशक्त नसतील तर ते पळूच शकणार नाहीत. त्यामुळे शर्यतींमध्ये पळवले जाणारे बैल हे शारीरिकदृष्ट्या सर्वोत्तम असतात, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे.

काही विशिष्ट, मोजके फोटो दाखवून बैलांवर अत्याचार होत असल्याचेही सांगितले जाते. वास्तविक शर्यतीच्या बैलांचा सांभाळ लहान मुलांसारखा केला जातो. हे बैल फक्त पळण्यासाठीच वापरतात. त्यांना ओझ्याची, शेतीची कामे लावली जात नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर्षभरात मिळून जेमतेम सात-आठ मिनिटांची शर्यत हे बैल पळतात. पुणे परिसरात चारबैली शर्यती जास्त होतात. पाचशे फुटांच्या घाटात (ट्रॅक) पळल्यानंतर त्यापुढे दोनशे फुटांच्या व्यासात जाऊन बैल थांबतात. शर्यतीचे बैल हे खासकरून खिल्लार वंशाचे असतात. जत, सांगोले, पंढरपूर येथील बाजारांमधून जातिवंत खिल्लाराची खरेदी होते. दीड-दोन वर्षे वयोगटातील वासरे स्पर्धेसाठी आणली जातात. त्यांना अनुभवी बैलांबरोबर घाटातून पळण्याचा सराव दिला जातो. घाट संपल्यावर थांबण्याची सवय त्यांना लागते. खिल्लार वंश मुळातच चपळ असतो. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. त्यामुळे पळवण्यासाठी त्यांना वेगळे प्रशिक्षणसुद्धा द्यावे लागत नाही. कमी सेकंदांत घाट ओलांडणारा जिंकतो. कोणी 12 सेकंदांत, कोणी 15 सेकंदांत घाट पूर्ण करतो. शर्यतीच्या बैलांना खास खुराक असतो. सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, गव्हाचे पीठ, उडीद-चण्याची डाळ येथपासून ते अगदी काजू-बदाम खाऊ घालणारे बैलगाडा मालक आहेत. काही श्रीमंत गाडा मालक हौसेने दूधसुद्धा पाजतात. साधारणतः तरणा बैल चार वर्षे शर्यतीत पळवला जातो. वयस्कर, म्हातारे, कमजोर बैल शर्यतीत उतरवले जात नाहीत.

जानेवारीपासून एप्रिलच्या मध्यापर्यंत ग्रामीण महाराष्ट्रात बैलगाड्यांच्या शर्यती रंगतात. एकट्या पुणे परिसरातच शर्यतीचा षौक जपणारे वीस ते बावीस हजार शेतकरी असतील. यांच्याकडे शर्यतीचे चलाख बैल आहेत. स्वतःच्या गावच्या शर्यतीत हे बैल पळवले जातात. शिवाय पंचक्रोशीतल्या शर्यतींमध्येही भाग घेतला जातो. या शर्यती जिंकण्यामागे बक्षिसाच्या रकमेचे आकर्षण अजिबात नसते. गावाची प्रतिष्ठा, चुरस, आनंद, शर्यतीचा थरार हे सगळ्यात महत्त्वाचे असते. काही सेकंदांची शर्यत जिंकण्यासाठी लाखो रुपयांचे बैल आणून त्यांना वर्षभर जपले जाते. देवाचे ऋण फेडण्यासाठी यात्रा-जत्रा आणि उरूस भरतात. त्या ठिकाणी देवाच्या पायी बैलांच्या शर्यती होतात. बैलांना मारहाण केली जात असल्याचा प्राणिप्रेमींचा आक्षेप असतो. एखाद्या शर्यतीत सुमारे 300 गाडा मालक येतात. एवढ्या मोठ्या स्पर्धेत एखाद्-दुसरी घटता घडतेच. काही वेळा बैल ठेचकाळून पडतात. अपघात होतात. त्यामुळे बैलांना इजा होते. शर्यतीत भाग घेणारा कोण स्वतःहून आपल्या बैलाला इजा करेल? त्यामुळे बैलांचा छळ होतो हा अतिरंजित आरोप आहे. बैलांना दारू पाजण्याचा आरोपही असाच तथ्यहीन आहे. चुकूनसुद्धा हे घडत नाही. कारण दारू पाजलेला बैल सरळ रेषेत पळू शकत नाही. शर्यती मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपवादही असतो. म्हणूनच गाडा मालक संघटनांनी आता वैद्यकीय मदत, आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली आहे. परंतु, चार-दोन घटनांपायी संपूर्ण परंपरेची बदनामी होऊ नये. बैलांची शर्यत हा लोकोत्सवाचा भाग आहे. या वार्षिक आनंदावर कोणी विरजण टाकू नये.