आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब व उच्च शिक्षण - विद्यापीठ शिक्षणाचे ध्येय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील सर्वाधिक गोंधळ असलेले क्षेत्र म्हणून विद्यापीठीय उच्चशिक्षण क्षेत्राचा निर्देश केला जातो. या परिस्थितीमुळे भारतात दर्जेदार, उच्चशिक्षणाचा अभावच दिसून येतो. अलीकडे भारतातील उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठे आणि शिक्षण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय झाले आहेत. जागतिक दर्जाच्या शिक्षणात भारतीय शिक्षणसंस्था आणि विद्यापीठे मागे का? दर्जेदार उच्चशिक्षण देणाऱ्या संस्था व विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत एकाही भारतीय संस्था व विद्यापीठ का नाही? याचे उत्तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शोधत आहेत. शिक्षणविषयक प्रत्येक कार्यक्रमात राष्ट्रपती हा प्रश्न उपस्थित करतात; परंतु त्यांना त्यांचे ठोस सकारण उत्तर मिळालेले नाही. भारतातल्या उच्च शिक्षण क्षेत्रावर क्ष-किरण टाकून जी व्यवस्था आपल्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे त्यातल्या दोषांवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले आहे.

डॉ. आंबेडकर हे एकंदरच शिक्षणाबाबत आणि त्यातल्या त्यात उच्चशिक्षणाबाबत, त्याच्या मानवी जीवनातल्या आवश्यकतेबाबत अतिशय आग्रही होते. मानवी आयुष्यासाठी ज्ञान ही अत्यंत पायाभूत गोष्ट आहे, असे सांगून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. विद्यार्थ्यांनी आपली विचार करण्याची शक्ती विकसित करण्यासाठी झटावे आणि आपण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करत राहावा, असा सल्ला विद्यार्थ्यांना ते देतात.

विद्यापीठीय उच्चशिक्षणाच्या उद्देशाबाबत बाबासाहेबांचा नेमका विचार समजून घेण्यासाठी त्यांनी चिमणलाल सेटलवार समितीपुढे दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात ते म्हणतात, "शिक्षणाचा उद्देश वस्तुस्थितीपूरक माहिती पुरवणे किंवा काही सिद्धांत शिकवणे हा नसावा, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होईल, त्यांच्या मानसिक, बौद्धिक क्षमतांची वाढ होईल, प्रस्थापित अधिकारी विद्वानांच्या विचारांचे टीकात्मक परीक्षण करण्यास ते समर्थ होतील, प्रथम सूत्राचा शोध घेऊन ते आवश्यक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्या मनात कोणत्याही विषयाविषयी जिज्ञासा निर्माण होऊन, त्याद्वारे सखोल अध्ययनाच्या प्रवृत्ती विकसित होतील, एखाद्याने व्यक्त केलेले मत आणि वस्तुस्थिती यामधील अंतर ते जाणू शकतील, समस्या जाणून घेऊन प्रत्येक समस्येचा नेमकेपणा त्यांच्या लक्षात येईल. प्रत्येक समस्येचे निदान, गुणावगुणांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होईल. एखाद्या विचाराचा किंवा संकल्पनेचा स्वीकार किंवा अस्वीकार करण्यापूर्वी त्याने विवेकनिष्ठ विचार करावा. मौलिक स्वरूपाचे शोधकार्य करणारा विद्यार्थी होण्यापेक्षा मौलिक संशोधन कसे केले जाते हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. याची जाणीव त्याला व्हावी. त्याने उपलब्ध पुराव्यांचे योग्य मूल्यमापन करावे, त्याने तर्काचा पाठपुरावा करावा त्यावर टीका करावी. तसेच अधिकारी विद्वानांच्या मतावर भाष्य करावे. या सर्वांसाठी विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करणे हे विद्यापीठ शिक्षणाचे ध्येय असावे.” ब्रिटिशांच्या आदेशात्मक शिक्षण व्यवस्थेचीच री आपली विद्यापीठे अद्यापही ओढीत आहेत. परिणामी, भारतातल्या विद्यापीठीय उच्च शिक्षणातून बाबासाहेबांना अपेक्षित बौद्धिक स्वातंत्र्य प्राप्त झालेली पिढी निर्माण होऊ शकली नाही. तसेच आपली विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या सर्वंकष क्षमता विकसित करण्यात कितपत यशस्वी झाली? या प्रश्नांची उत्तरे समाधानकारकरीत्या देता येत नाही. तात्पर्य, ‘आजचे विद्यापीठ शिक्षण हे ध्येयपूर्ती आणि कार्यप्रवणता या पातळीवर संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.’ या बाबासाहेबांच्या तक्रारीत निश्चितच दम आहे. कारण राष्ट्रपतींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांच्या विद्यापीठ शिक्षणविषयक विचार आणि उपयुक्त तक्रारीत आहेत.
ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा पगडा
ब्रिटिशांच्या आदेशात्मक शिक्षण व्यवस्थेचीच री आजही आपली विद्यापीठे ओढीत आहेत. परिणामी भारतातल्या विद्यापीठीय उच्च शिक्षणातून बाबासाहेबांना अपेक्षित बौद्धिक स्वातंत्र्य प्राप्त झालेली पिढी निर्माण होऊ शकली नाही.
बातम्या आणखी आहेत...