आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरला घडवण्याएेवजी बिघडवण्याची उठाठेव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चालुक्यांच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या लत्तलूर (लत्तातूर, लट्टाटूर) नामक गावाला आजचे लातूर घडवताना अनेकांनी खस्ता खाल्ल्या. मात्र, पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी अगदी काल-परवापर्यंत कोठूनही पाणी अाणू, अशी वल्गना करणारे सरकार आणि प्रशासन आता याच शहरातील लोकांना जणू हाताला धरून बाहेर काढतेय...
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे शहर वसवलं, मलिक अंबरने औरंगाबाद वसवलं, ब्रिटिशांनी जयपूर, नवी दिल्ली आणि स्वातंत्र्योत्तर काळात चंदिगड ही शहरं नव्याने वसवली. इतिहासात त्या-त्या काळातील राजांनी आपल्या राजधानीची शहरं वसवल्याची उदाहरणे आढळतात. आक्रमक मोगल आणि दीडशे वर्षे सत्ता गाजवलेल्या ब्रिटिशांनीही राजधान्या आणि व्यापारासाठी महत्त्वाची असलेली ठिकाणं वसवल्याची उदाहरणे आहेत. अशी शहरे वसवताना तिथे राहणाऱ्या लोकांसाठी मुबलक पाणी, मजबूत रस्त्यांची उपलब्धता करून देण्यात येत असे. मात्र, लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकार आणि सत्ता राबवणारी यंत्रणा अशी ओळख असलेले प्रशासन पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शहर उठवत असेल तर? होय, पाणीटंचाईवरची उपाययोजना म्हणून कालपर्यंत कोठूनही पाणी अाणू, अशी वल्गना करणारे सरकार आणि प्रशासन आता लातूरसारख्या शहरातील लोकांना जणू हाताला धरून बाहेर काढतेय. शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये लाखभर लोक केवळ शिकायचे म्हणून राहतात. बाहेरगावातून पाणी आणून ते लातूरकरांना पाजण्यापेक्षा लातूरमधील माणसांनाच बाहेर काढण्याचा जालीम उपाय प्रशासनाने शोधून काढलाय आणि तो राज्य सरकारलाही पटलाय. म्हणजे एखाद्याने पाय दुखत असल्याची तक्रार केली तर त्याचा पाय कापून टाकायचा, जेणेकरून पायच नसेल तर तो दुखण्याचीही तक्रार राहणार नाही असला हा नतद्रष्टपणा आहे. कोणतेही गाव एका रात्रीत वसत नाही. लातूरही त्याला अपवाद नाही. चालुक्य राजवटीपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या तत्कालीन लत्तलूर नामक गावाचे आजचे लातूर होण्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्ल्या. पूर्वीच्या ज्ञात-अज्ञात राजांपासून ते अगदी निझाम राजवटीपर्यंतचा इतिहास चाळला तर लातूरच्या व्यापार-उदिमाचे अनोखे वैशिष्ट्य जाणून या गावाला विकसित करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद इतिहासात आढळते. फार नव्हे, अगदी तीन वर्षांपूर्वीपर्यंत दिवंगत नेते विलासराव देशमुखांनीही शहराच्या विकासासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. व्यापार, उद्योग, शिक्षण या तीन प्रमुख बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातून होऊ घातलेले स्थलांतर रोखायचे की लोकांना स्थलांतरित व्हा असे सांगायचे? लातूरला पाणी पुरवणे शक्य नसल्याचे सांगणारे गेले चार महिने संधी मिळूनही झोपले होते की झोपेचे सोंग घेऊन पडले होते? राजशकट हाकणाऱ्यांनाही त्याची शरम वाटत नाही, हे अधिकच धक्कादायक. अगदी कालपर्यंत लातूर शहर हे मराठवाड्यातील दुसऱ्या विभागीय आयुक्तालयावर हक्क सांगणारे शहर म्हणून ओळखले जायचे. आज त्याच लातूरमधून माणसे कशी कमी होतील याच्या नियोजनात महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी बुद्धी खर्ची घालत आहेत. शहराचे आमदार, पालकमंत्रीही सणावाराला आल्यासारखे बैठकांपुरते दिसताहेत. लातूर परिसरात पाणीच नाही असे अहवालावर अहवाल पाठवून प्रशासन सरकारची दिशाभूल करतेय. दुसरीकडे पैसे मोजले की पाहिजे तितके टँकर उपलब्ध आहेत. पाणी भरून विक्रीसाठी थांबलेल्या टँकरची रांगच रस्त्यांवर उभी असलेली दिसते. मुळात ७०-८० हजार रुपये खर्च करून शिक्षणासाठी लातूरमध्ये घर करून राहिलेल्यांना ७०० ते ८०० रुपयांचा टँकर परवडत नाही असे नाही. पण त्यांना गावाबाहेर काढण्याचा मूर्खपणा झाला तर लोकसंख्या वाढली म्हणून महापालिका झालेल्या या शहराची पुन्हा नगर परिषद करायची वेळ येईल आणि विद्यमान सरकारच्या मूर्खपणाची साक्ष देत ओसाड पडलेले एकमेव शहर अशी लातूरची ओळख होत राहील.
१५ कोटी मिळाले अन् घोडं न्हालं
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना लातूरच्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी ३२ कोटी दिले होते. महापालिकेने नऊ वेळेस निविदा काढून कुणीही ते कंत्राट घ्यायला पुढे आले नाही. त्याचे कारण होते नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या मलिद्याची रक्कम होणाऱ्या फायद्यापेक्षा तिप्पट होती. अखेर तो पैसा परत गेला. यावर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने तीन महिन्यांचा अवधी मिळाला होता. त्या काळात माकणी धरणावरून जलवाहिनी आणली असती तर २५ कोटी रुपयांत लातूरला कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध झाला असता. मात्र, त्याऐवजी नगरसेवक, अधिकारी, पदाधिकाऱ्यांना टँकर सुरू करणे, बोअर घेणे, धरणात चरी खोदणे ही कामे करण्यात जास्त रस होता. मंत्रालयात बसलेल्या पाणीपुरवठा सचिवांनीही जलवाहिनी टाकण्याचे घोंगडे भिजत ठेवून त्याला साथ दिली. लातूर शहर अाणि धरण परिसरात बाेअर घेण्यासाठी ५० लाख, मांजरा तसेच साई धरणात चर खाेदण्यासाठी ५० लाख अाणि टँकरसाठी १५ काेटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून दिले. तथापि, संबंधितांना टँकरने पाणी पुरवण्यात अधिक स्वारस्य दिसते अाहे; कारण टंचाईच्या काळात होणाऱ्या कामासाठी नियम शिथिलक्षम असतात म्हणूनच त्याआडून या दुष्काळाच्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न चालला अाहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यातच लातूर महापालिकेने तीन कोटी रुपयांची कामे विनानिविदा केल्याचे आता उघड झाले असून याचसाठी केला होता का अट्टहास? असा प्रश्न लातूरकरांना पडला नसेल तरच नवल!
बातम्या आणखी आहेत...