आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अगं अगं म्हशी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीचे दिवस आहेत. निवडणुकीची जत्रा प्रत्येक कार्यालयासमोर दिसते. प्रत्येक पक्षाचे हे वैभव आहे. निष्ठावंत पक्षाच्या विजयाकरिता सूचना घेऊन झटत असतात. कर्तृत्ववान पक्षकार्यकर्ते पक्षाच्या यशामध्ये आपणही असावे या भावनेने नेत्यापुढे असतात. संधीसाधूंची टोळकी मात्र या जत्रेमध्ये एखाद्या पॉकेटमारसारखी घुसून आपल्या पद्धतीने वर्णी लावायच्या प्रयत्नात असते. या वैचित्र्याचा एक अभ्यासच होऊ शकतो असा हा काळ. जत्रेमध्ये बापाचे बोट सोडून हरवलेले मूल जसे सर्व विसरून जत्रा अनुभवत असते, मात्र बापाचे बोट सुटल्याने सुख अनुभवता येत नाही, अशीच धांदल पत्रकारांची आणि विविध वाहिन्यांच्या हिरिरीने सरसावणा-या संघर्षातून खासकरून पाहायला मिळते.
पक्षकार्यात गुंतलेल्यांना ती गोंधळवत असते, ज्यांचा संबंध नाही ते मात्र हा गोंधळ बावरलेल्या पत्रकारितेच्या बातमीतून आणि वाहिन्यांच्या वैचित्र्यातून अनुभवून वेगळेच सुख घेत असतात तो हा काळ. खरे तर हे असेच असायला हवे, पण महाराष्ट्रात विचित्रच घडतेय. आम्ही लढवणारच हा आविर्भाव सगळ्यांचा असला तरी "आम्ही' यामध्ये आपल्यासोबत अनेकांना सामावून
घेऊन विजयाकडे वाटचाल करण्याची राजकीय वृत्ती आणि प्रवृत्ती आपण अनुभवतो.
सध्या बघून घेतो, सर्वच जागा लढतो, असे लोकसभेत गारद झालेल्यांचेही केविलवाणे आवाज ऐकायला मिळतात. त्याच वेळी विजयाचा डोलारा डोक्यावर आल्यानंतर जबाबदारीच्या जाणिवेतून मतदारांचा आदर करण्याऐवजी आता "आम्हीच' असा आविर्भाव अनुभवायला मिळतो. हे जे वर्णन आहे ते पाहण्याचे, ऐकण्याचे, अनुभवायचे दिवस असतात. नाकर्त्या राज्यकर्त्यांचे मात्र नवीनच प्रयोग सुरू असतात. पक्षाची निवडणुकीची कार्यालये वर म्हटल्याप्रमाणे हे अनुभवत तर नाहीतच, उलट प्रथमतःच निवडणुकीच्या या काळात, स्मशानासारखे शांत असलेले मंत्रालय एकदम गजबजून गेले होते. रेल्वेच्या डब्यातील प्रवाशांच्या गर्दीला लाजवेल एवढी झुंबड मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उडाली होती. निवडणुकीचे तिकीट विसरून नागरिक मंत्रालयातील आपल्या कामाच्या नस्तीच्या मागे धावत आहेत. मंत्री कधी येतील, अशी वाट पाहणा-या मंत्रालयातील मंत्र्यांची दालने, मंत्री आज दिवसभर इथे आहेत, मात्र कधी जातील अशा केविलवाण्या पद्धतीने वाट पाहत होती. गेल्या १५ वर्षांत दालनांच्या दरवाजांची जितक्या वेळा उघडझाप झाली नसेल त्याच्या शतपटीने उघडझाप ४-५ दिवसांत झाल्याने, आम्ही खिळखिळे होऊन पडणार तर होणार नाही ना, असा बिजाग-यांचा आक्रोश सुरू होता. नोटांनी भरलेले खिसे बिनदिक्कत मंत्रालयात फिरत होते. प्रत्येकाला वायदा देणारे आवाज शोधून त्याच्या कामाची वेळ सांगताच लकवा लागलेला हात झटपट कामाला लागलेला पाहून अधिकारी आणि कर्मचारी दिग्मूढ झाले होते. नोकरीला लागल्यापासून हयातीत काम केले नव्हते, अशा मरगळलेल्या मेंदूला आपण एवढे प्रचंड कार्यक्षम आहोत याची जाणीव होत असताना एका अध्यादेशासाठी सहा-सहा महिने लावणारे शेकडो कर्मचा-यांचे विचारवंत हात
दिवसाला ५०-५५ अध्यादेश काढण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे ही अद्भुतता अनुभवत होते.
आमचे काय होणार, करोडो रुपये लावले, जागांमध्ये अडकवले, मुंबईकरांना घरे देतो सांगितले, जुन्या चाळक-यांना घरांची आश्वासने दिली. १०-१० वर्षे मंत्रालयात फडकणारा झेंडा सहाव्या मजल्यावर पाहत होती ती मंडळी, बारा वाजता तू, साडेबारा वाजता तू, एक वाजता तू अशा पद्धतीने अर्ध्या-अर्ध्या तासाने आपली कामे मार्गी लागलेली बघून आनंदाने सहाव्या मजल्यावरून उड्या मारत जिना उतरताना पाहायला मिळाली. कामाचे एवढे उचंबळून आलेले मंत्रिमंडळाचे कार्यकर्तृत्व पाहून भरपावसाळ्यात समुद्रसुद्धा, माझ्यापेक्षा जास्त उसळणारे मंत्री पाहून अचंबित होत होता.
गेले महिनाभर सर्वात प्रगत महाराष्ट्र माझा असे सांगणारे आपण हे चुकून केले याची जाणीव झाल्याने महाराष्ट्र खरेच पुढे नेण्यासाठी धडपडले पाहिजे या आविर्भावात अस्तन्या सरसावून कामाला लागलेत. मंत्रालयाची पायरी उतरल्यावर देतोस की नाही १४४, कसे घेतो बघतो, अशी एकमेकांची कॉलर धरणारे मंत्र्यांच्या दालनात मात्र आम्हीच कार्य करणारे या आविर्भावात दिसले. पत्रकारांना वेडचाप समजत, किती काम केल्याचे भासवतात.
राज्य उद्योगात क्रमांक एकवर नेऊ, उद्योगांना २४ तास वीज, राज्यातील सर्व घरांना वीज, कृषिपंप विजेअभावी बंद होऊ देणार नाही हे सांगणा-या ऊर्जामंत्र्यांना विजेनेच मोठा धक्का दिला. कोळसा कमी पडत आहे, आहे तो भिजलेला आहे, यामुळे वीजनिर्मिती ५० टक्क्यांवर आली आहे. गावे अंधारात बुडाली, वीज नसल्याने कारखान्यांची निर्मिती क्षमता थंडावली, कंपन्या अकार्यक्षम होऊन कामगारांचा रोजगार बुडत आहे, अशा वेळी सर्वात पुढे महाराष्ट्र माझा, अशा घोषणा देणारे आणि जाहिरातींचा मारा करणारे सरकार केंद्र सरकारच्या नावाने दोन्ही हातांनी होळी नसतानाही हाळी ठोकतेय. पुणे, नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथील नागरिक घरेच घरे मिळतील अशा आनंदाने बहरून जातील, असे निर्णयकारांना वाटले. मुंबईचा सामुदायिक विकास करतो, मुंबईच्या १७ हजार धोकादायक इमारतींचा गेल्या १५ वर्षात बोजवारा उडवणा-या, मृत्यूच्या सापळ्यात उभ्या करणा-या सरकारला आजही यश आले नसताना नवी मुंबईच्या जुन्या इमारतींना आधार देण्याचा निर्णय सरकारने घेतला. ठाण्यामध्ये योजना आणण्याचा प्रयत्न, पुणे महापालिकेच्या हद्दीतील २४ गावांच्या विकासाच्या वल्गना हे निर्णय घेतले. त्यांना ठाऊक होते की, हे निर्णय अमलात येणारच नाहीत. अध्यादेश काढायला महिना जातो, कायदा विधान भवनात व्हावा लागेल. आम्हाला जे करायचेच नाही ते जाहीर करायला काय जाते?
आरक्षण हा विषय तसा गंभीरच. केंद्र सरकार ते केंद्रीय समितीपर्यंत अडकलेला हा विषय. महाराष्ट्राला जातींमध्ये विभागण्याचा जणू विडाच राज्य सरकारने उचलल्याचे दिसून येत आहे. मराठा, मुस्लिम, लिंगायत यांचे आरक्षण झाले, धनगर आटोपले. त्यानंतर कैकाडी आणि वडारांची आठवण झाली, मात्र वंजा-यांना सरकार कसे विसरले याचे आश्चर्य वाटते.
गणपतीच्या मिरवणुका थंडावल्या. कारण त्याला आवाजाच्या प्रदूषणाचे बंधन होते. बिनआवाजाचे ढोल मात्र लकवाग्रस्त हात असे काही वाजवतायत की महाराष्ट्राला खात्री व्हावी, सर्वात पुढे महाराष्ट्र माझा हे चुकून सांगितलेले दुरुस्त करण्याची हातघाई सुरू आहे. मात्र सरकारच्या लक्षात आले नाही की आपण जनतेला किती फसवतोय? याचे उत्तर मोठा बोलबाला करून जाहिरातींच्या माध्यमातून आपले कार्यकर्तृत्व दाखवणारी मोनोरेल जनतेने झिडकारल्याने रिकामी धावतेय, तशाच प्रकारे जनता या निकामी आणि बोलघेवडेपणा करणा-या भ्रष्टाचारी सरकारला झिडकारून महायुतीचे सरकार राज्यात आणून मेट्रोप्रमाणे राज्याचा खरोखर विकास करील आणि राज्याला प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देईल. त्यामुळे आघाडी सरकार घोषणांचा पोकळ डोलारा उभा करून अगं अगं म्हशी....ची म्हण सार्थ करण्याचा प्रयत्न करीत आहे असे वाटते.