आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुरुक्षेत्र' जिंकले, डावपेच हरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामराजे यांनी उदयनराजे यांना बँकेची पायरी चढू न देण्याची शपथ घेतली होती. मात्र त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले तर निवडणुकीत जिंकण्यासाठी आटापिटा करावा लागेल असे वाटणा-या उदयनराजे यांना बँकेत सहज प्रवेश मिळाला. बाकी राष्ट्रवादीच्या उमेदवारांपैकी सहा उमेदवारांना बिनविरोध प्रवेश मिळाला तर केवळ माण येथील गेली चाळीस वर्षे संचालक असणारे सदाशिव पोळ यांनाच केवळ पराभवाचा धक्का बसला. तो ही राष्ट्रवादीच्या त्या तालुक्यातील अंतर्गत बंडाळीमूळे ! बँकेत राष्ट्रवादीचे 18 संचालक निवडून आले. खा.भोसले अपक्ष असले तरी खासदार राष्ट्रवादीचे आहेत. एकेकाळी पूर्णपणे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या बँकेत जयकुमार गारे यांच्या नावाचा केवळ औषधापूरता काँग्रेसचा संचालक मिळाला तर पस्तीस वर्षे संचालक असलेले एकेकाळचे किंगमेकर विलासराव पाटील उंडाळकरांना अपक्ष म्हणून निवडून यावे लागले. सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादीची पकड अधिक मजबूत करत शरद पवारांनी दोन्ही राजे घराण्यांच्या राजकारण्यांना आपले कोंदण राजेंसाठी तसेच सत्ता मिळवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणवून दिले. कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने सातारा येथे दरवर्षी येणा-या शरद पवारांनी त्यांची शाळा घेत बँक त्यांच्यादृष्टीने कशी चालवायची याचा कान मंत्र दिला. मुंबईत दोन आणि सातारा येथे एक बैठक पवारांनी घेतली आणि सरते शेवटी बँक खिशात टाकत जिल्ह्याचे राजकारण आपणच चालवतो हे सिध्द केले.

राष्ट्रवादी अंतर्गत झालेली ही निवडणूक पेल्यातले वादळ असले तरी भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीत पॅनेल उतरवण्याच्या केलेल्या वल्गना किती फोल होत्या हे सिध्द झाले. पालकमंत्री शिवतारे यांना युतीची केवीलवाणी परिस्थीती कळल्यावर, त्यांनी आगामी पाच वर्षात कष्ट करू आणि पुढील निवडणुकीत लढू, असे सांगत आपली माघार जाहीर केली. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर सातारा येथे येणे या काळात सोडले. सहकारमंत्र्यांना या निवडणूकीने सातारा, सांगली आणि कोल्हापूरसाठी खूप काम करावे लागेल याची जाणीव करून दिली. या भागात सहकार रुजला मात्र भाजप रुजला नाही याची ओळख त्यांना वास्तववादी झाली असेल. राज्यात अत्यंत उत्तम पध्दतीने चालवली जाणारी ही बँक राजकारणी चालवत नाहीत तर बँकेतले अनेक चांगले सेवक, कर्मचारी चालवतात.
केवळ राजकीय पुनर्वसन, घराणेशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि विरोधकाच्या आर्थिक मुसक्या आवळण्यासाठी सर्वच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राजकारण्यांना जावेसे वाटते हे उघड सत्य आहे. सातारा जिल्ह्याला कै. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहे असे हे राजकारणी सांगतात मात्र त्याच यशवंतराव चव्हाणांनी राजकारण आणि सहकार ही दोन्ही क्षेत्रे पूर्णपणे वेगळी ठेवा. या दोन्ही क्षेत्रात तीच ती मंडळी असता कामा नये अन्यथा सहकार क्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल, असे सांगीतले होते. मात्र, आज यशवंतरावांचे नाव घेत राजकारणातून अर्थकारण करणारी मंडळी केवळ सहकारच नाही तर कला, क्रीडा, साहित्यासह शिक्षणक्षेत्रातही धुमाकूळ घालत आहेत. पावित्र्य कसे राखायचे हा प्रश्नच स्वतंत्र राहीला.
बातम्या आणखी आहेत...