आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकहाती कारभारी (सांगली जिल्हा बँक निवडणूक)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधी लोकसभा, नंतर विधानसभा आणि आता जिल्हा बँक अशा सर्वच निवडणुकांतून जयंत पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. वसंतदादा घराण्यात फूट पाडून त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची यशस्वी खेळी त्यांनी खेळली आहे. आता दादांच्या विचारांना मानणाऱ्या तालुक्या-तालुक्यातील नेत्यांनाही आपल्या पाठीशी येण्यास भाग पाडले.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या घराण्यांची सत्ता कित्येक वर्षांपासून राहिली आहे. (त्यात अलीकडे पतंगराव कदम यांची भर पडली.) यांच्यातील राजकीय वैराचा वारसा त्यांच्या वंशजांनीही जोपासला आहे. यातूनच राजकारणातून एकमेकांना संपवण्यापासून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राखण्याची जीवघेणी स्पर्धा या दोन्ही घराण्यांमध्ये होत आली आहे आणि राजारामबापूंचे पुत्र माजी मंत्री जयंत पाटील हे आता जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व मिळवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.

वसंतदादांचे थेट वारसदार प्रतीक पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यात जयंत पाटील यांची महत्त्वाची भूमिका होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी दादांचे थेट वारसदार विशाल पाटील यांना पराभूत करण्यासाठी दादांच्या घराण्यातीलच मदन पाटील यांना सोबत घेऊन डावपेच रचले. यात विशाल पाटील पराभूत झाले नाहीत; मात्र दादा घराण्यातच भांडण लावण्यात आणि फूट पाडण्यात ते यशस्वी झाले. वास्तविक दादा घराण्यातील एकमेव मदन पाटील हेच जयंत पाटील यांना तगडा शह देऊ शकत होते. महापालिका निवडणुकीत हे सिद्धही झाले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी मदन पाटील यांनाच सोबत घेऊन मोठा डाव मारला आहे.

जयंत पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या स्वत:च्या हाती ठेवण्यात वसंतदादांचा गट ही मोठी अडचण होती. या गटाची मोठी ताकद होती आर.आर.पाटील आणि मदन पाटील. आर.आर. यांचे निधन झाले आणि मदन पाटलांना त्यांनी सोबत घेतले. पतंगराव कदम यांचा त्यांना कधीच अडसर वाटला नाही; कारण पतंगरावांनी सगे-सोयरे आणि पैपाहुण्यांपलीकडे कधी राजकारण केलेच नाही. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात आपल्या पाठीशी राहणाऱ्या नेत्यांची फळी निर्माण करता आली नाही.

राजारामबापूंनी प्रत्येक तालुक्यात प्रभावी नेता निर्माण केला. त्यांना राजकीय पाठबळ दिले. हाच कित्ता जयंत पाटील यांनी गिरवला. त्यांनी शिराळ्यापासून जतपर्यंत तालुक्याच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव असलेल्या नेत्यांची फळी निर्माण केली. आता यातील बहुतेक नेते भाजपत गेले असले, तरी ते जयंत पाटील यांचेच नेतृत्व मानणारे आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाचा विषय येतो, तेव्हा ते जयंत पाटील यांच्याच पाठीशी उभे राहतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही हेच घडले. भाजपचे सर्व आमदार, खासदार यांना सोबत घेऊन जयंत पाटील यांनी पॅनल तयार केले. मदन पाटीलही जयंत पाटील यांच्यासोबत गेले. त्यामुळे एकाकी पडलेल्या पतंगरावांना नाइलाजास्तव दादा घराण्याशी जुळवून घेऊन पॅनल उभा करावा लागला. त्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव करावी लागली. संस्थात्मक पातळीवर प्रभावी असलेले सर्व नेते जयंत पाटील यांच्या सोबत असल्याने बँकेचा निकाल काय लागणार, हे आधीच स्पष्ट होते.

आधी लोकसभा, नंतर विधानसभा आणि आता जिल्हा बँक अशा सर्वच निवडणुकांतून जयंत पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. वसंतदादा घराण्यात फूट पाडून त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची यशस्वी खेळी त्यांनी खेळली आहे. आता दादांच्या विचारांना मानणाऱ्या तालुक्या-तालुक्यातील नेत्यांनाही आपल्या पाठीशी येण्यास भाग पाडून सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील स्पर्धक ते संपवतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बातम्या आणखी आहेत...