आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातले ‘मूत्रप्रयोग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या आधुनिक राजकारणात ‘मूत्रप्रयोग अध्याय' सुरू करण्याचे श्रेय माजी उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांना द्यावे लागेल. देसाई स्वतः शिवांबूभक्त होते. शिवांबू म्हणजे स्वमूत्र प्राशन करणे होय. मोरारजींच्या दिवसाची सुरुवात स्वमूत्रप्राशनाने व्हायची. त्यांना 99 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले होते. या दीर्घायुष्याचे श्रेय ते शिवांबूला देत असत. सगळ्यांनी शिवांबू क्रिया आचरणात आणावी असा प्रसारही ते जाहीरपणे करत. अर्थातच उपपंतप्रधान असताना याला राष्ट्रीय कार्यक्रमाचे स्वरूप देऊन मोरारजींनी शिवांबू सक्ती केली नाही, हे भारतीयांचे भाग्यच म्हणायचे. मोरारजींनी शिवांबू चिकित्सा वैयक्तिक ठेवली. अर्थात यामुळे त्यांची टिंगल होणे टळले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर गोळीबार केल्याने मोरारजी महाराष्ट्रासाठी खलनायक ठरले होते. सार्वजनिक मुता-यांवर ‘मोरारजी ज्यूस बार' असे लिहून पुणेकरांनी त्याकाळी मोरारजींवरचा राग व्यक्त केला होता. मोरारजी गेले आणि शिवांबूच्या जाहीर चर्चेला विराम मिळाला.
अलीकडच्या काळात मूत्रप्रयोगाला राजकारणात स्थान मिळवून दिले ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी. रिकामी पडलेली धरणे मी लघवी करून भरू का, अशा आशयाचा सवाल जाहीर कार्यक्रमात विचारण्याचे धारिष्ठ्य त्यांनी दाखवले होते. वास्तविक हा प्रश्न करताना त्यांनी वापरलेले शब्द ग्रामीण भागासाठी फार वेगळे नव्हते. मात्र प्रश्न शब्दांचा नव्हता. हे विधान कोणी आणि कोणत्या वेळी केले या औचित्याचा होता.
पवार बोलले तेव्हा ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अर्थमंत्री होते. जलसंपदामंत्री होते. साहजिकच राज्याच्या जबाबदार नेतृत्त्वाने जनतेशी संवाद साधताना सुसंस्कृतपणाची, धीर देणारी भाषा वापरावी, हे अपेक्षित होते. खास करून महाराष्ट्राची जनता एेन दुष्काळाने होरपळलेली असताना तिच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम पवारांच्या शब्दांनी केले. विरोधकांनी निवडणुकीच्या राजकारणात मतदारांना भडकवण्यासाठी पवारांच्या विधानाचा यथेच्छ वापर केला. विशेषतः गोपीनाथ मुंडे तर प्रचारात जातील तेथे ‘राष्ट्रवादीचे चिन्ह कोणते', असा प्रश्न करायचे आणि स्वतःची करंगळीच वर करून दाखवायचे. वास्तविक अजित पवारांपेक्षा मुंडे यांचे वर्तन अधिक असभ्य होते. कारण पवारांची गाडी बोलण्याच्या ओघात घसरली होती. मुंडे जाणूनबुजून बोलत होते. शेतकरी संघटना आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही मुंडे यांचे भ्रष्ट अनुकरण मते मागण्यासाठी केले. या सगळ्याचा प्रभावी परिणाम मतदारांवर झाला, हे वास्तव होते. मूत्रप्रयोगाबाबतचे पवारांचे विधान राष्ट्रवादीला चांगलेच महागात पडले.
अलीकडच्या काळातला तिसरा राजकीय मूत्रप्रयोग केला तो भाजपचे शेतीतज्ज्ञ नितीन गडकरी यांनी. भाजपने नागपुरात आयोजित केलेल्या शेतीसंबंधित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी स्वतः केलेल्या मुत्रप्रयोगाची सविस्तर माहिती दिली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने दिल्लीत गडकरींना ऐसपेस सरकारी बंगला मिळाला आहे. या बंगल्यात एक एकर क्षेत्रावर गडकरी त्यांची शेतीची हौस भागवतात. पूर्वी हाच बंगला कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे होता. गडकरी म्हणाले, "दिल्लीत ते त्यांचे मूत्र साठवून ठेवतात. साठलेले मूत्र बंगल्यातील झाडांवर फवारतात. यामुळे इतर झाडांच्या तुलनेत या झाडांची वाढ अधिक चांगली झाल्याचे माझे निरीक्षण आहे. मानवी मूत्राचा वापर दर्जेदार खत म्हणून होऊ शकतो, असे माझ्या लक्षात आले." वास्तविक गडकरी यांनी ब्रह्मज्ञान सांगितले किंवा फार मोठा शोध नव्याने लावला अशातला भाग नाही. मानवी मूत्राचा वनस्पतींवर होणारा परिणाम यावर भरपूर संशोधन यापूर्वीच झालेले आहे. मानवी मूत्राद्वारे बाहेर पडणारे फॉस्फरस, नायट्रोजन हे घटक पीकवाढीस अनुकूल असतात, ही माहितीही जुनीच. परंतु, या वेळी ती गडकरींनी सांगितली. सत्ताधारी बोलले तेही शेतीसंदर्भात बोलले. सध्याच्या प्रथेप्रमाणे लागलीच सोशल मीडियावर एकच कल्लोळ उठला. गडकरींवर जोरदार टीका सुरू झाली. विशेष म्हणजे यात काही शेतकरी संघटनादेखील समाविष्ट होत्या. या सर्व टीका-टवाळीचा रोख 'गडकरी शेतकरीविरोधी आहेत, ते शेतक-यांची चेष्टा करतात,' असा उथळ होता.
टीका-टिंगलीच्या गदारोळात बंगळुरूची एक स्वयंसेवी संस्था वेगळे मत घेऊन पुढे आली. इन्फोसिसचे माजी कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांच्या पत्नी रोहिणी निलकेणी यांनी दिलेल्या निधीवर ही संस्था चालते. ही संस्था बंगळूरच्याच 'युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स'बरोबर 'मानवी मुत्राचा खत म्हणून वापर' या प्रोजेक्टवर काम करते आहे. गडकरी यांचे विधान तथ्याला धरुन असल्याचे मत या संस्थेने व्यक्त केले. युरोपातल्या हॉलंडने तर पुढची मजल गाठलीय. अॅमस्टरडॅम या जगप्रसिद्ध शहरात सरकारी पुढाकाराने मानवी मुत्र गोळा केले जात आहे. यासाठी डच सरकारने सार्वजनिक ठिकाणी 'बायो-युरीनल्स' उभे केलेत. या ठिकाणी दररोज गोळा होणा-या मानवी मुत्रावर प्रक्रिया करून उपलब्ध होणारे क्षार, जीवनसत्त्वे पिकांना दिली जात आहेत.
मुद्दा हा की मानवी मूत्र पिकांना उपयुक्त आहे की नाही, हे सांगण्यासाठी गडकरींची गरज नाही. याची माहिती गडकरींना आताच झाली असली तरी विज्ञानाला हे सत्य पूर्वीच गवसलेले आहे. केंद्रंातील वरिष्ठ मंत्री म्हणून गडकरी या ज्ञानयोगाचा उपयोग जनतेला कसा करुन देणार, या दिशेने खरे तर गडकरींनी प्रश्न विचारायला हवेत. स्वातंत्र्यप्राप्तीला साठ वर्षे झाली तरी अजून महिलांना 'राईट टू पी'साठी आंदोलने उभी करावी लागतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातल्या अनिवासी भारतीयांसमोर 'स्वच्छ भारता'चे आभासी चित्र उभे करतात. हे चित्र भारतात राहणा-यांच्या जीवनात ख-या अर्थाने उमटण्यासाठी गडकरी काही करतील का, याबद्दल त्यांना विचारणा व्हायला हवी.
सार्वजनिक सुविधा, स्वच्छतागृहे या मूलभूत गरजा भारतीय राजकारणाने कधीच केंद्रस्थानी आणलेल्या नाहीत. स्मार्ट सिटीची भाषा होत असताना टू-टायर शहरे मानवी मलमत्राने माखली जात आहेत, जलस्रोत नासवत आहेत, याकडे गेल्या सहा दशकात दुर्लक्षच झाले आहे. खतांच्या बाबतीत परावलंबी असणारा भारत मानवी मलमुत्राच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करणार असेल तर यामुळे शेती सुफल होईलच; मानवी वस्त्याही सुंदर होतील. या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्यासारखा नेता राजकारणाच्या व्यासपीठावर मुत्रप्रयोगाची भाषा मांडत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...