आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नाथाभाऊंची ‘दादागिरी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील ज्या चार, पाच जिल्ह्यांमधील जिल्हा बँकांच्या निवडणुका दिग्गजांचे नेतृत्व किंवा उमेदवारीमुळे चर्चेत आल्या होत्या. त्यात जळगाव आणि धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचाही समावेश होता. जळगावात प्रथमच खडसेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने सर्वाधिक जागा मिळवून जिल्हा बँकेवर वर्चस्व प्राप्त केले आहे. असुरक्षित कर्ज, बोगस आणि अनावश्यक नोकरीभरती, वाढती थकबाकी या कारणांनी राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अडचणीत सापडल्या आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही काही अनियमितता असेल पण आर्थिक स्थिती मात्र चांगली आहे. आजही ही बँक पंधरा तालुक्यातील हजारो शेतकर्यांना दोन हजार कोटी रूपयांपर्यत नियमित पीक कर्ज देते. त्यामुळे या बँकेवर सत्ता मिळवण्याची संधी खडसे कशाला सोडतील? जळगावच्या राजकारणातून सुरेश जैनांची दादागिरी संपली आहे. राष्ट्रवादीचे खासदार ईश्वर जैन यांचे राजकारण दुस-यांवर अवलंबून आहे. शिवसेना, काँग्रेसची स्थिती जेमतेम आहे. जळगावला खडसेंशिवाय दुसरे सक्षम नेतृत्वच उरले नाही. याची जाणीव त्यांनाही आहे. त्यामुळे ते जिल्ह्यातील प्रत्येक सहकारी संस्थांच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गटाची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. तथापि, नुकत्याच झालेल्या मधुकर आणि चोपडा सहकारी साखर कारखान्यात त्यांच्या गटाला हादरा बसला. लागोपाठ दोन सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील पराभव हा खडसेंच्या नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लावणारा आहे. जळगाव जिल्हा बँकेतही हाच कटु अनुभव येऊ नये म्हणून खडसेंनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून घडामोडींवर लक्ष ठेवले होते. विरोधकांची विस्कळीत अवस्था पाहून मुलगी रोहिणी खडसे यांना चेअरमन करण्याची ही चांगली संधी असल्याचेही त्यांनी हेरले. रोहिणी ह्या मुक्ताईनगरच्या खासगी साखर कारखान्यात पदाधिकारी आहेत. त्या जळगाव बँकेच्या राजकारणात सक्रिय झाल्या तर भविष्यात जळगाव शहरातून त्यांना विधानसभेची निवडणूक लढणे सोपे जाईल. कारण सून रक्षा खडसे यांना खासदार करण्यासाठी जसे रावेरमधून हरिभाऊ जावळेंना बाजूला बसविता आले तसे राजूमामा भोळेही भाऊंचा शब्द टाळणार नाही, हे त्यांना चांगले माहीत आहे. त्यामुळे जळगावमधून आमदार राजूमामा भोळेंनाही त्यांनी संचालक म्हणून बिनविरोध निवडून आणले आहे.
जळगाव जिल्हा बँक म्हणजे हजारो शेतकर्यांची रक्तवाहिनी आहे. या माध्यमातून जिल्हाभरातील शेतक-यांशी जवळीक साधण्यासाठी ही एक महत्त्वाची संस्था आहे. जिल्ह्याचे राजकारण करायचे म्हणजे विश्वासू किंवा घरातीलच चेअरमन असला तर अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येते हेही त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे खडसेंनी आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल आणि तेही बिनविरोध करण्याचे गाजर विरोधकांना दाखवले. कोणताही खर्च न करता आपल्याला संचालक होता येईल म्हणून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह भाजपातील इच्छुकांनी खडसेंकडे हजेरी लावणे सुरू केले. अनेक वर्षे एकाच पक्षात आणि सोबत काम करणारेही एकमेकाला टाळून, लपून-छपून खडसेंची भेट घेऊ लागले. तथापि, कुणाला पॅनलमध्ये घ्यायचे, कोण डोईजड ठरू शकतो,कोण यापूर्वी नडला आहे या सर्व गोष्टींचा विचार करून खडसेंनी आपली व्यूहरचना आधीच ठरवली होती. त्यामुळे माघारीच्या दिवसापर्यंत त्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच ठेवले. क वर्ग सोसायटीचे ठराव घेऊन निवडणुकीत उरतलेल्यांचे अर्ज आधीच बाद झाले होते. त्यामुळे खडसेंनी आर्धी लढाई आधीच जिंकली होती. माघारीच्या दिवशी राष्ट्रवादीतील काहींना खडसेंचा हा गेम कळला आणि त्यांनी धावपळ सुरू केली. ईश्वरलाल जैन ज्यांनी गत निवडणुकीत नेतृत्व करून सत्ता काबीज केली होती त्यांना साकडे घातले. त्यानंतर त्यांनी आमदार सतीश पाटलांसह इच्छुकांना सोबत घेऊन दुसरे पॅनल तयार केले. बिनविरोध सत्तेचे नियोजन करणार्या खडसेंना विरोधकांनी चपराक दिली, पण प्रत्यक्ष निवडणुकीत खडसेंच भारी पडले आणि त्यांनी अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा बँकेवर भाजपाला वर्चस्व मिळवून दिले. जिल्हा बँकेची ही निवडणूक म्हणजे खडसेंचा वेगळा पैलू दाखवणारी ठरली. जिल्ह्यातील सक्षम राजकीय विरोधक संपल्यामुळे एकहाती सत्ता आणि नेतृत्व करण्याच्या दृष्टीने त्यांचे हे पाऊल खूपच दमदार म्हणावे लागेल. जळगावच्या राजकारणातील सुरेश जैनांची दादागिरी संपली आणि नाथाभाऊंची सुरू झाली असे म्हणायलाही हरकत नाही.
धुळे जिल्हा बँकेत मात्र काँग्रेसचाच बोलबाला !
विधानसभा निवडणुकीत कोणतीही लाट धुळे जिल्ह्यात पूर्णपणे चालली नाही, अगदी तसेच जिल्हा बँकेतही काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे भाजप- शिवसेना टिकली नाही. राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, अमरीश पटेल आणि नंदुरबारचे चंकांत रघुवंशी यांनी सहकार क्षेत्रातील आपला अनुभव पणाला लावत धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व सिध्द केले आहे. खडसेंनी जळगावात जे केले अगदी तसेच पटेल आणि पाटील या नेत्यांनी धुळ्यात केले. वास्तविक, धुळे जिल्ह्यात भाजपाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे आणि आमदार जयकुमार रावल असे नेतृत्व होते, पण या तिघांचे तीन विचारांचे राजकारण आहे. त्यामुळे काँग्रेसने आपले इप्सित साधून जिल्हा बँकेवर पुन्हा सत्ता मिळवली आहे. या बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे होवो की चंद्रकांत रघुवंशी या दोघांवर प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. शेतकर्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या या बँकेकडे कार्यकर्ते पोसणारी संस्था म्हणून पाहू नये. शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणारी आणि केवळ त्यांचं आणि त्यांचंच हित जोपासणारी संस्था म्हणून नावारूपास आणावी लागणार आहे. धुळे बँकेची स्थिती जळगावसारखी नाही. बुडता, बुडता वाचलेली बँक आहे. शेतकर्यांचा जीव या बँकेत आहे. त्यामुळे बँकेचा पै अन् पै वाचवून तिला सक्षम बनविण्याची संधी यानिमित्ताने काँग्रेसजनांना मिळाली आहे. विरोधकांनी केलेले घोटाळयाचे आरोपही आपणास येत्या काही वर्षात चांगल्या कामातून खोडून काढता येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...