आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Congress Vs NCP For Upcoming Election In India

काँग्रेस-राष्ट्रवादीची निवडणूक सर्कस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या सुटीमध्ये सर्कसचा खेळ सगळीकडे रंगतो. अनेक परदेशी आणि देशी सर्कसवाले आपापले खेळ घेऊन येतात आणि बच्चे कंपनीचे मनोरंजन करतात. अगदी हाच खेळ राजकारणातही सुरू झाला आहे. सगळ्यात जास्त मनोरंजन करणारी सर्कस आहे काँग्रेस-राष्ट्रवादीची.

काही झाले तरी आम्ही काँग्रेसची साथ सोडणार नाही, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही, काँग्रेसची साथ सोडणार नाही, तिसर्‍या आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी उपस्थित, काँग्रेसची साथ सोडणार नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काही वक्तव्ये वर उल्लेखित केलेली आहेत. काँग्रेसबरोबर जाण्याची वक्तव्ये करीत दुसरीकडे अन्य पर्यायही चाचपले जाण्याचा खेळ राष्ट्रवादी खेळत असून हा सर्व खेळ रंगतो आहे पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी. त्यामुळे माध्यमांची जशी करमणूक होत आहे अगदी तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त करमणूक जनतेची होत आहे. एखाद्या सर्कसप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा खेळ सुरू झाला आहे. त्यात आता थोडीशी रंगत निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा खेळ सुरू झाला. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे खासदार असतानाही शरद पवार दिल्लीत काँग्रेसला वाकवण्याची करामत करून दाखवतात. त्यामुळे त्यांनी दिल्लीतच जागावाटपाची चर्चा केली. दिल्लीत चर्चा झाली असली तरी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून विस्तव जात नाही. एकमेकांच्या विरोधात नेहमीच वक्तव्ये दिली जातात.

शरद पवार नेहमी काँग्रेससोबतच जाणार असल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही, असे सांगून आपला पवित्रा जाहीर केला. खरे तर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशीपणावरही टीका केली होती, परंतु नंतर सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांच्याशी जुळवून घेतले. शरद पवार बोलतात एक आणि करतात एक हे ठाऊक असल्याने काँग्रेसही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. याचाच प्रत्यय गेल्या आठवड्यात तिसर्‍या आघाडीने आयोजित केलेल्या बैठकीत आला. राष्ट्रवादीचा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होता. मात्र, यानंतरह शरद पवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार नसल्याचे वक्तव्य दिले. राहुल गांधींबरोबर काम न करण्याचे सूतोवाच करतानाच शरद पवार काँग्रेसमधील असंतुष्टांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सर्कसमधील ट्रॅपिझवर एकमेकांना हात देत वर खेचले जाते. कधी-कधी ट्रॅपिझवर एखादा विदूषकही जातो. सर्कस बघताना आपले लक्ष विदूषकाकडेच जाते. तो ट्रॅपिझ चांगल्या पद्धतीने करेल का, असा प्रश्न मनात येत असतानाच विदूषक जेव्हा विश्वासाने एखाद्या ट्रॅपिझ कलाकाराचा हात पकडण्यास जातो आणि तो कलाकार हात पकडत नाही आणि विदूषक खाली पडतो तेव्हा आपल्या हृदयात धस्स होते. मात्र, खाली जाळी असल्याने तो विदूषक वाचतो. अगदी तसेच या सर्कसमध्येही होत आहे. यापैकी विदूषक कोण आणि अनुभवी ट्रॅपिझ कलाकार कोण हे वाचकांना चांगलेच ठाऊक आहे. याचा अनुभवही देशातील जनतेने घेतलेला आहे. हात सोडून पुन्हा हात हाती घेण्याची कला शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे.

काँग्रेसविरोधातील वातावरण पाहून तिसरी आघाडी आपला पर्याय ठरू शकते आणि आपले पंतप्रधान होण्याचे स्वप्नही कदाचित पूर्ण होऊ शकते याची जाणीव शरद पवार यांना झाली आहे. त्यामुळेच एकीकडे काँग्रेसला तुमच्यासोबतच आहोत, असे दाखवायचे आणि दुसरीकडे अन्य पर्यायही ढुंढाळायचे असा प्रकार शरद पवार करीत आहेत. अर्थात त्यात काही चुकीचे आहे असेही नाही. जर पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होत असेल तर शरद पवार तिसर्‍या आघाडीच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी राहतील यात शंका नाही.

राहुल गांधीही स्वत:च्या ताकदीच्या बळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु यूपीएतील अन्य घटकांबरोबर युती केल्याशिवाय सत्ता काबीज करणे शक्य नाही हे त्यांना चांगले ठाऊक आहे. काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ लागले आहे. राहुल गांधी विविध राज्यांचा दौरा करीत आजी, वडिलांच्या प्राणत्यागाबरोबरच आईच्या अश्रूंचा उल्लेख करीत जनतेच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही असे म्हटले असले तरी राहुल गांधी राष्ट्रवादीची साथ सोडण्यास तयार नाहीत. याचे सगळ्यात मोठे कारण आहे शरद पवारांचे कौशल्य. कोणत्याही कठीण काळात शरद पवार मार्ग काढू शकतात, अनेक राज्यातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि कोणाला कधी कुठे धक्का द्यायचा याचे तंत्र त्यांना चांगले अवगत असल्याने त्यांचा फायदा सत्ता स्थापनेसाठी होईल हे राहुल गांधींना चांगले ठाऊक आहे.

राज्यातही राष्ट्रवादीचे नेते जागावाटपावरून वक्तव्ये देत आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीहून राज्यात ज्या कामासाठी पाठवले ते काम त्यांनी यशस्वी करून दाखवले आहे. राष्ट्रवादीचे खच्चीकरण करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला चांगलेच पाणी पाजले आहे. त्यामुळेच आता राष्ट्रवादी प्रतिहल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते मात्र, जाहीर सभांमधून आणि पत्रकारांशी बोलताना 22-26 (राष्ट्रवादी 22, काँग्रेस 26) चा फॉर्म्युला तयार झाल्याचे सांगत आले आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही मतप्रदर्शन करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत 19 पेक्षा जास्त जागा देणार नाही असे सांगत राष्ट्रवादीवर मुद्दाम काँग्रेस दबावाचे तंत्र अवलंबत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांचे अजूनही ‘एकला चलो रे’चे धोरण आहे.
राष्ट्रवादीबरोबर फरपटत जाण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर सत्ता आणण्याचा विचार काँग्रेसचे नेते करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही जागावाटपाची चर्चा अजून सुरू व्हायची असल्याने राष्ट्रवादीने आकडे मांडू नयेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढू इच्छित आहे, असे समजल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या आहेत. एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीची ही निवडणुकीची सर्कस आणखी रंगेल यात शंका नाही.