आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअरच्या उत्तम टप्प्यावर तरीही अस्वस्थ असलेल्यासाठी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या मर्यादा व बलस्थानं समजून घ्यावी. निवृत्तीनंतर एका मानसशास्त्रज्ञाने शेत विकत घेतले. त्यात तो मूठभर बी फेकायचा. पक्षी येत आणि खाऊन टाकत. असे दोन-चारदा झाले. हे बघणारा शेतकरी तिथे गेला. त्याने बी फेकण्याचे दोन-तीनदा नाटक केले. पक्षी आले आणि परत गेले. चौथ्यांदा त्याने खरेच बी फेकले. या वेळेस पक्षी आले नाहीत, बी रुजले. म्हणजेच पक्ष्यांचे मानसशास्त्र शेतकऱ्याला जास्त चांगले कळले होते. मग या बोधकथेत व्यावहारिकदृष्ट्या हुशार कोण? भरपूर गुण मिळवणाऱ्यालाच हुशार म्हटले जाते. माहितीचे ज्ञानात व ज्ञानाचे व्यवहारज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य हीच खरी बुद्धिमत्ता. दुर्दैवाने फक्त स्मरणशक्तीला बुद्धी मानले जाते. वास्तविक स्मरणशक्तीला कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, प्रतिभेस विवेकाची जोड मिळते तेव्हाच ती व्यक्ती प्रज्ञावंत होऊ शकते.  

करिअर निवडीत डॉक्टर-इंजिनिअरसारख्या “सेफ’ वाटेची निवड करतात. संधी, पैसा बघता ते साहजिकच आहे. परंतु डिसेक्शनचा तिटकारा असलेला माणूस एक उत्तम डॉक्टर होऊ शकत नाही. स्मार्टफोन हाताळू शकतो म्हणजे मुलाचा तांत्रिक गोष्टींकडे कल आहे असे समजून त्यास इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तर तो यशस्वी होईलच असे नाही. मुलांचा आयक्यू (इंटेलिजन्स कोशंट किंवा बुद्ध्यांक) वाढवण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातात. यात चूक काहीच नाही; पण मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला व त्यानुसार करिअर नियोजनाला प्राधान्य न देता फक्त पुस्तकी ज्ञानाला व गुणांना महत्त्व दिले जाते हे अयोग्य आहे.  

प्रज्ञामापनाचे कोशंट प्रचलित आहेत. आयक्यू (IQ), ईक्यू(E Q), एसक्यू (S Q)आणि आता सी क्यू (C Q). बुद्धिमत्तेची सात प्रकारे वर्गवारी केली जाते. गणितीय तर्कक्षमता (उदा: कोडी, puzzle सोडवणे),  भाषावापराचे कौशल्य (उदा: भाषण, लेखन),  संगीताचे ज्ञान (उदा: गायन-वादन),  शरीरचापल्य (उदा: मार्शल आर्टस, खेळ किंवा नृत्यप्रकार),   संवादकौशल्य (व्यापार-व्यवसाय),  स्वसंवाद क्षमता (स्वत:च्या बलस्थानांची जाणीव आणि मर्यादांचा स्वीकार) आणि सृजनशीलता (उदा: चित्रपटनिर्मिती किंवा बांधकामाचे आरेखन)  

याचाच अर्थ एखाद्या व्यक्तीस गणित येत/आवडत नसेल; पण त्याच वेळेस त्या व्यक्तीला उत्तम गाता येत असेल, तरीही त्या व्यक्तीला (त्या क्षेत्रात) हुशार म्हणायला हवे. वरील प्रकारांपैकी आपला कल कुठे आहे ते ओळखून त्या विषयात प्रावीण्य मिळवले तर त्या क्षेत्रात यशस्वी करिअर करता येईल. आयुष्यातही चांगल्या-वाईट घटना घडत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी केवळ आयक्यू पुरेसा नाही, त्यासाठी ईक्यू ( इमोशनल कोशंट किंवा भावनांक) चांगला हवा. भावनांक कमी असलेले लहानसहान अपयशाने खचून जातात वा मोठ्या यशाने हुरळून जाऊन चुकीच्या रस्त्याला लागतात.  

भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्था, मूल्यबैठक, संस्कार भावनांकाच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत. ज्या घरात तसे वातावरण नसेल त्या घरातील अतिशय हुशार मुले करिअरमध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत ते केवळ भावनांक कमी असतो म्हणून. काही वर्षांपूर्वी डाना जोहर आणि आयन मार्शल यांनी एसक्यू म्हणजेच (स्पिरिच्युअल कोशंट) अध्यात्मांकाची जगाला ओळख करून दिली. व्यावसायिकदृष्ट्या अनेक कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना एसक्यू वृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे.   करिअरच्या उत्तम टप्प्यावर पोहोचूनही अस्वस्थ असलेल्या मनांना अाध्यात्मिक गुणांक वाढल्याशिवाय पुढील वाटचालीसाठी दिशा मिळत नाही.  

बुद्ध्यांक आर्थिक गणिते सोपी करतो, भावनांक कोणतीही परिस्थिती हाताळायला मदत करतो, तर अध्यात्मांकानुसार मुळात अशी परिस्थिती निर्माण का झाली हे समजून घेता येते. आता आणखी एक कोशंट समजून घ्यायला हवा - सीक्यू म्हणजेच कल्चरल कोशंट. विविध संस्कृतींना समजून घेऊन सामोरे जाण्याची क्षमता.   

आपला कल्चरल कोशंट चांगला आहे काय?   
देशातील ईशान्येकडील मणिपूर, नागालँडसारख्या राज्यांतील लोकांची किंवा दक्षिणेकडील द्राविडी संस्कृती तरी आपण समजून घेतो का! पर्यटकांना अतिथीचा सन्मान मिळतो का! आंतरराष्ट्रीय बाजारात जम बसावा म्हणून आता कंपन्या कर्मचाऱ्यांच्या चांगल्या सीक्यूसाठी आवर्जून प्रयत्न करू लागल्यात. जागतिकीकरणाच्या या काळात सांस्कृतिक समज वाढवल्याशिवाय जगाचा नागरिक बनणे, यशस्वी होणे, दोन्ही अवघड आहे. 
 
- गिरीश टिळक, डोंबिवली, मुंबई. 
girish@resumeindia.com
बातम्या आणखी आहेत...