आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article Of Hrishikesh Kamble About Samaj Samta Sangh

सवर्ण आणि अन्य धर्मीय कार्यकर्त्यांसाठी डाॅ. आंबेडकरांनी सुरू केला समाज समता संघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलाबा बहिष्कृत हितकारिणी सभा या संघटनेच्या झेंड्याखाली काम करण्याऐवजी या सवर्ण आणि अन्य धर्मीय कार्यकर्त्यांसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघ नावाचं स्वतंत्र संघटन जन्माला घातलं, हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यािवषयी...

मा नवमुक्ती आणि दास्यमुक्तच्या संगरात महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सत्याग्रहाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी स्थापन केलेले पहिले समाज संघटन कुलाबा बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने हा सत्याग्रह झाला. त्यात अस्पृश्य समाजाबरोबरच सवर्णही मोठ्या प्रमाणात होते. डाॅ. बाबासाहेबांच्या समाज क्रांतीच्या प्रारंभ काळापासून सवर्ण समाज व अन्य धर्मीय मंडळी समाज जागरणाच्या या पर्वात अंत:करणपूर्वक सामील झाली होती. या सवर्ण समाजातल्या कार्यकर्त्यांच्या मनात अपार करुणाच वसत होती. माणसाचा माणसाला स्पर्श चालत नव्हता, अशा अत्यंत दाहक आणि भीषण असलेल्या काळात बाबासाहेबांच्या सोबत सवर्ण समाजातील कार्यकर्ते येणं ही स्वप्नवत वाटणारी, पण वास्तव असलेली ऐतिहािसक घटना आहे.
या सवर्ण कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाकडून कधी अपमानित व्हावं लागलं तर कधी बहिष्कृत, तरीही मानवमुक्तीच्या आणि दास्यमुक्तीच्या प्रेरणेमुळे हे क्लेशकारक दाह त्यांनी पचविले. ही माणसे अथांग करुणेने भारलेली होती. या मंडळींचा त्यांच्या त्यांच्या जातींनी अतोनात छळ चालवला, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या मंडळीचा होणारा छळ अस्वस्थ करून गेला. बाबासाहेबांनी अनंतराव चित्रे यांना तसं बोलूनही दाखवलं. बाबासाहेब म्हणाले, खूप त्रास होत असेल तर तुम्ही मंडळींनी या अग्निकुंडात पडावं असं मला वाटत नाही; पण या सर्व मंडळींच्या समोर बाबासाहेबांनी चालवलेल्या कार्याविषयी अजोड अशी निष्ठा होती. म्हणून ते तसूभरही विचलित झालेले नाहीत.बाबासाहेबांच्या सोबत माणसांच्या प्रतिष्ठेचे काम करण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता. डाॅ. बाबासाहेबांनी मग कुलाबा बहिष्कृत हितकारिणी सभा या संघटनेच्या झेंड्याखाली काम करण्याऐवजी या सवर्ण आणि अन्य धर्मीय कार्यकर्त्यांसाठी त्यांनी समाज समता संघ नावाचं स्वतंत्र संघटन जन्माला घातलं. या संघटनेचा जन्म समजून घेणे अगत्याचे आहे.
महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला अस्पृश्य समाजाने स्पर्श केला हे कर्मठ असलेल्या सवर्णांना सहन झाले नाही. या सत्याग्रहात दगडफेकही झालेली होती. यात अनेक जण जखमी झालेले होते. या शारीरिक जखमेपेक्षा एक मोठी जखम देणारी कृती सवर्णांनी केली होती. या मंडळींनी चवदार तळ्यात गाईचे शेण-मूत घालून चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते. या शुद्धीकरण प्रकाराचा बाबासाहेबांना विलक्षण संताप आलेला होता. या शुद्धीकरणाला त्यांनी "नीचतम प्रयत्न' असे संबोधले होते. बाबासाहेब संतापाने म्हणाले होते, "ज्या तलावातील पाणी कुत्रे मांजरांनी प्याले तर ते अपवित्र होत नाही, पण अस्पृश्यांनी स्पर्श केला तर मात्र ते अपवित्र होते. ही अपवित्रता विष्ठा भक्षण करणाऱ्या गाईचे शेणमूत्र घातल्याने शुद्ध होते, यावरून स्पृश्य हिंदूंच्या लेखी अस्पृश्यांची काय मानवी मूल्ये आहेत, हे सिद्ध होते. या नीचतम कृतीचा मी धिक्कार करतो.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सवर्ण समाजाच्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत आणल्याने अपार झीज सोसावी लागत आहे, त्यांना अपरिमित दु:ख सोसावे लागत आहे, याची बोचणी सतत जाणवत होती. वस्तुत: या सत्याग्रहात भाई अनंतराव चित्रे, सुरबानाना टिपणीस, या चांद्रसेनी कायस्थ ब्राह्मण जातीच्या मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला होता. मुंबईच्या सोशल सर्व्हिस लीगचे गो. नी. सहस्रबुद्धे आदी मंडळींनी या सत्याग्रहाच्या नियोजनापासून सक्रिय सहभाग घेतलेला होता. महाडच्या या संघर्षात जखमी महार, मांग, चांभारांच्या जखमासुद्धा या मंडळींनी बांधल्या. त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता. या सवर्ण कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक मानव मुक्तीचे काम करता यावे, अस्पृश्यता निवारणाचे काम करता यावे, यासाठी बाबासाहेबांनी समाज समता संघटन जन्माला घातले. सगळे प्रतिनिधी सवर्ण समाजाचे असावेत असा आग्रह बाबासाहेबांनी धरला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर या वर्तमानपत्राचे संपादक दे. वि. नाईक आणि अनंतराव चित्रे यांच्या आग्रहामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. दे. वि. नाईक आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फार जुन्या काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे अनुबंध हाेते. बाबासाहेब जेव्हा परदेशात उच्च शिक्षणास गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या मूकनायक या वर्तमानपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी दे. वि.नाईक यांच्यावर सोपवली. देवराव नाईक जन्माने ब्राह्मण होते पण तरी त्यांच्या ठायी जाज्वल्य असे माणूसपण होते. बाबासाहेब परदेशात असताना देवराव नाईक यांनी मूकनायक वर्तमानपत्र अत्यंत जबाबदारीने चालवलेले होते.
समाज समता संघाची स्थापना ४ सप्टेंबर १९२७ रोजी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळ सवर्ण समाजाचे होते. अध्यक्ष : डाॅ. बाबासाहेब अांबेडकर, उपाध्यक्ष : डाॅ. आर. एन. भाईंदर, एमबीबीएस, दे. वि. नाईक, संपादक- ब्राह्मण-ब्राह्मणेतर, सेक्रेटरीज १) एस. एस. गुप्ते, बीएसस्सी, २) बी.व्ही. प्रधान, बीए (ऑनर्स), खजिनदार -आर. डी. कवळी, बीए, कार्यकारी मंडळ १) एफ. डी. डिसिल्विव्हा, बीए, २) व्ही. आर. घोनकर, बीए. ३) डी. विठ्ठलराव प्रधान, ४) पी. पी. ताम्हाणे, बी. ए. ५) आर. जी. प्रतापगिरी, बीए (ऑनर्स), जे. पी. मुळे, ७) एन. व्ही. खांडके, ऑडिटर्स : १) डी. बी. सुभेदार, एसीआरए २) आर. एम. कर्णिक, बीए. या पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाने समाज समता संघाचे कार्य अत्यंत निष्ठापूर्वक केलेले होते. या समाज समता संघाची उद्दिष्टे मूलभूत मानवी अधिकारांना केंद्रवर्ती मानणारी होती. सर्व मनुष्य प्राणी समानाधिकारी असून स्वत:तील मनुष्यत्वाच्या विकासाठी कारणीभूत होणाऱ्या साधनावर सवलतींवर व संधींवर त्या प्रत्येकाचा समान हक्क असतो, असा या संघाचा विश्वास आहे. समतेचा हक्क हा पवित्र, अबाधित व अभेद्य आहे. हा हक्क जन्मसिद्ध व वर्ण, जात व स्त्री-पुरुष भेदातीत आहे. सामाजिक समता अस्तित्वात आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणे अशक्य आहे. समाजाच्या सुरळीत व सुसंघटित आयुष्यक्रमाला बाधक होणारे सर्व विचार, आचार(कार्ये) व संस्था ही सारी समाज समानत्वाच्या विरुद्ध आहेत अशी या संघाची निर्देशपूर्वक घोषणा आहे. सर्व त्या उपायांनी वरील तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचा या संघाचा संकल्प आहे, अशी या समाज समता संघाची उद्दिष्टे होती. या संघाचे ध्येय धोरण बा. न. घोरपडे, यांनी समता या वर्तमानपत्रात पहिल्याच अंकात स्पष्ट करताना म्हटले होते, "हिंदूसभेच्या िभत्र्या व लपंडावी धोरणाचा आता खऱ्या जनतेला वीट आला आहे. सहभोजने, मिश्रविवाह (अनुलोम- प्रतिलोम) इत्यादी प्रत्यक्ष उपायांनी हिंदू समाजाची आजची घातुर्वर्णमूलक व्यवस्था उलथून पाडून समतेच्या पायावर त्याची नवी उभारणी व संघटना करण्याचे अवघड पण अनिवार्य काम समाज संघासमोर आहे. सुदैवाने संघाला डॉ. आंबेडकरांसारखे िवद्वान व धीरोदात्त कर्णधार लाभले आहेत. समता क्रांतीवादी तरुण आपल्या झेंड्याभोवती गोळा करण्याचे सामर्थ्य व आकर्षकत्व त्यांचे ठायी खास आहे. समाज समता ध्येयधोरण यावरून स्पष्ट होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सामाजिक सुधारणांच्या बाबतीत अत्यंत कर्मठ होते हे ऐतिहासिक सत्य अाहे, पण समाज समता संघाचे मोठे यश हे आहे की लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक हे पुण्याच्या समाज समता संघाच्या शाखेचे उपाध्यक्ष होते. ते सामाजिक सधारणेच्या बाबतीत बावनकशी सोने होते. त्यांचे व बाबासाहेबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. श्रीधरपंतांना पुण्यातल्या ब्राह्मणांनी खूप त्रास दिला.
समाज बदलायला तयार नाही याचे दु:ख श्रीधरपंतांना होते. श्रीधरपंत टिळकांनी २५ मे १९२८ ला आत्महत्या केली; पण आत्महत्येपूर्वी श्रीधरपंतानी डॉ. बाबासाहेबांना एक पत्र लिहिले होते. ते पत्र मोठे हृदयस्पर्शी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे पत्र मिळाल्यानंतर ते प्रचंड व्यथित झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीधरपंतांवर अत्यंत व्याकुळतेने श्रद्धांजलीपर लेखही िलहिला. डॉ. बाबासाहेबांच्या सवर्ण आणि अन्य धर्मीय सहकार्याच्या अंत:करणातल्या अपार करुणेला अभिवादनच केले पाहिजे.
मानवमुक्तीच्या कार्यकर्त्यांचा छळ
सवर्ण कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाकडून कधी अपमानित व्हावं लागलं तर कधी बहिष्कृत व्हावं लागलं. तरीही मानवमुक्तीच्या आणि दास्यमुक्तीच्या प्रेरणेमुळे हे क्लेशकारक दाह त्यांनी पचविले होते. ही माणसे अथांग करुणेनी भारलेली होती. या मंडळींचा त्यांच्या त्यांच्या जातींनी अतोनात छळ चालविला, तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या मंडळीचा होणारा छळ अस्वस्थ करुन गेला. बाबासाहेबांनी अंनतराव चित्रे यांना तसं बोलूनही दाखवलं होतं.

(लेखक औरंगाबादच्या स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख आहेत.)