आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सयाजीराव गायकवाडांचे वंशज मैदानात उतरल्याने दिल्लीत चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे भाजपने हिरावून घेतलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत राहुल गांधींच्या विश्वासातील आणि बडोदा मतदारसंघातून दोनदा निवडून गेलेल्या सत्यजित गायकवाड यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे सयाजीराव गायकवाड यांचे वंशज म्हणून बडोद्यात राहत असलेल्या सत्यजित गायकवाड यांनी कौलाने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील आपल्या मालकीच्या गढीवर मुक्काम ठोकला आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी धुळे व नाशिक या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मतदारसंघांतील सहा तालुक्यांमध्ये मेळावे, बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. गायकवाड यांच्या या झंझावातामुळे धुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारणी आणि लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार अमरीशभाई पटेल व माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

सत्यजित गायकवाड हे बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांचे पणतू असून त्यांच्याच विचारांनुसार ते काम करत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात असलेले मालेगाव तालुक्यातील कौलाने हे त्यांचे मूळ गाव असून या गावात त्यांची गढी आजही आहे. याच गढीचे पुनरुज्जीवन करून ते तेथे राहत आहेत. गायकवाड हे काही नवखे किंवा हौशी उमेदवार नाहीत. ते कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असून दोन वेळा खासदार राहून चुकलेले आहेत. त्यांनी अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत अनेक युवक नेते आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि मनमोहनसिंग सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. दिल्लीत असलेला त्यांचा वावर आणि संपर्क पाहता ते धुळे, मालेगाववासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासह विकासाचा मार्ग खुला करणारे मोठे उद्योग आणू शकतील, असा दावा उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे समर्थक व ते स्वत: करत आहेत.

राहुल गांधींचा शब्द घेऊनच ते बडोद्याहून थेट धुळे, नाशिकला मुक्कामी राहू लागले आहेत. तसेच गेल्या तीन वर्षांपासून गायकवाड हे धुळे लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवत आहेत. विशेष म्हणजे गायकवाड हे निष्ठावंत असल्यामुळे काँग्रेस पक्षाने तिकीट दिले तरच ते उमेदवारी करणार आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात ‘मराठा कार्ड’ चालते, हा गत अनुभव पाहता त्यातही गायकवाड यांची बाजू उजवी आहे. सयाजीराव गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणात आणि त्यांच्या कार्यात भरीव मदत केल्यामुळे दलित समाजही त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांना आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांसाठी गायकवाड हे उमेदवारी मिळवण्यात अडथळा ठरणार, हे आता उघड झाले आहे.

दरम्यान, गायकवाड हे मालेगाव तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगत असले तरी आतापर्यंत ते कुठे गेले होते? असा प्रश्न पाटील आणि पटेल यांना भेडसावल्याशिवाय राहणार नाही. गतवेळी पटेल आणि पाटील यांच्या वादात भाजपने प्राबल्य नसतानाही धुळे लोकसभेची जागा बळकावली. या वेळीही उमेदवारी मिळवतानाच पराभव पत्करावा लागू नये म्हणून काँग्रेसचे हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. तथापि, तिकीट कुणालाही मिळो; निवडून आणण्याची जबाबदारी दोघांची, असे आता ‘पटेल आणि पाटील’ या दोघांनी दोघांच्या हितासाठी एकमत केले आहे.

समजा, या दोघांपैकी कुणालाही काँग्रेसने उमेदवारी नाहीच दिली तर रोहिदास पाटील हे आपली चाल चालतील आणि गत निवडणुकीचीच पुनरावृत्ती करतील, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. भाजपला धुळे लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर खासदार निवडून आणणे शक्य होत नाही; पण ते काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा लाभ उठवण्यात वाक्बगार झाले आहेत.

सत्यजित गायकवाड हे काँग्रेसचे उमेदवार ठरले तर भाजपच्या उमेदवाराला प्रस्थापितांची न मागता मदत मिळणे सोपे होईल. त्यातच भाजपने अद्वय हिरे यांना उमेदवारी दिलीच तर रोहिदास पाटील यांच्या नात्यागोत्याला बळ मिळाल्यासारखे होईल. तसेच ऐनवेळी रोहिदास पाटील यांचे शालक सुभाष भामरे यांचे नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको. तथापि, राहुल गांधी यांच्या विश्वासातील म्हटले जाणाºया सत्यजित गायकवाड यांनीच धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवल्यामुळे निवडणुकीआधीच हा मतदारसंघ थेट नवी दिल्लीपर्यंत चर्चेत येऊ लागला आहे.