आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कात्रण कालबाह्य, विकिपीडिया वाँटेड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकिपीडियासारख्या सर्च इंजिनला तरुणाई आपली कात्रणवही समजू लागली आहे. मात्र, बुधवारी संपूर्ण दिवस विकिपीडियाने आपली वेबसाइट बंद ठेवली होती. त्यामुळे विकिपीडियाला आपली लायब्ररी समजणार्‍या तरुणाईची तारांबळ उडाली. तेव्हा त्यांना आठवण झाली ती कात्रणांची.
पूर्वी वेगवेगळ्या विषयांची कात्रणे काढली जायची. आई-वडील स्वत: अशी कात्रणे काढत असत. शिवाय आपल्या मुलांना ती कात्रणे काढण्यासाठी सांगायची. एक कात्रणवहीच तयार केली जात असे. त्यामध्ये विविध विषयांवरील अनेक कात्रणे संग्रहित केली जात असत; परंतु बदल हा निसर्गाचा नियम आहे. जग वेगाने बदलत आहे. तरुणाई आता ‘ग्लोबिझन’ झाली आहे. कात्रण काढण्याएवढता वेळ तरुणांकडे नाही. इंटरनेट सर्वत्र उपलब्ध आहे.
महाविद्यालयीन जीवनात सतत कॉम्प्युटरचा सहवास असल्यामुळे तरुण मंडळी सतत गुगल, विकिपीडियासारख्या माहिती देणार्‍या इंजिनवर अवलंबून राहू लागली आहेत. अमेरिकेच्या विशिष्ट धोरणामुळे बुधवारी विकिपीडिया ही वेबसाइट दिवसभर बंद होती. यासंबंधी डीबी स्टारने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी खालीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कात्रणांसाठी वेळ नसतो
शालेय जीवनात कात्रणे काढायचो. मात्र, 9 व्या वर्गापासून प्रचंड अभ्यासाच्या व्यापामुळे ही सवय मोडली. दहावीला असताना तर कॉम्प्युटर कळायला लागले. गुगलसारख्या सर्च इंजिनची सवय लागली. आता सिव्हिलचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी रेफरन्स (संदर्भ) हवा असतो. पुस्तक, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणीवर असा संदर्भ वेळेत आणि हवा तसा मिळत नाही. त्यामुळे मी पूर्णपणे विकिपीडियावर अवलंबून राहतो.
औदुंबर अलाट, बीई, सिव्हिल चौथे वर्ष
संदर्भासाठी आवश्यकच
गुगल, विकिपीडिया आता आमच्या जीवनाचा भाग बनले आहे. जगभरातील माहिती एका क्लिकवर आम्हाला मिळते. बुधवारी विकिपीडियाने एक दिवस त्यांची वेबसाइट बंद ठेवली. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर फेसबुक व मोबाइल चॅटिंगवर हाच आमच्या सर्वांचा चर्चेचा मुद्दा होता. बंदच्या काळातही विकी कसे वापरावे याची माहिती एक दुसर्‍याला देत होतो. विकी बंद झाल्यामुळे संदर्भ मिळत नाही.
आकाश काला, बीई सिव्हिल, चौथे वर्ष
वापर करणार्‍यावर अवलंबून
कात्रणे ही कधीही इंटरनेटला पर्याय ठरू शकत नाहीत. कात्रणे आपल्याला हवी तेथे, हवी तेव्हा मिळू शकत नाहीत. त्यामुळेच गुगल, विकिपीडिया यावर मस्त उपाय आहे. अशा वेबसाइट्समुळे सामाजिक एकता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे मान्य आहे; पण अशा साधनांचा वापर तो हाताळत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असतो.
पूजा साखरे, बीई सिव्हिल, चौथे वर्ष
कात्रणांमुळे धोका नसतो
मी कात्रणे काढतो. मात्र, सध्याचे युग स्पर्धेचे आहे. प्रत्येक नवीन गोष्ट इंटरनेटवर सहज उपलब्ध असते. आम्हाला अधिक माहितीची गरज पडते. त्यामुळे इंटरनेटचा वापर करणे आमच्यासाठी क्रमप्राप्त ठरते. कोणत्याही देशाच्या सरकारने या सर्व वेबसाइट्ससंबंधी सुरक्षा नियम कडक करावेत; मात्र ती बंद करू नयेत.
अजय सोनवणे, सिव्हिल, तृतीय वर्ष
कमी वेळेत अधिक माहिती
दिवसभरातून आम्ही अनेक वेळा विकिपीडिया व इतर अनेक वेबसाइट्सचा वापर करत असतो. विकिपीडियाने एक दिवस ही वेबसाइट बंद ठेवल्यामुळे आमच्या प्रोजेक्टवर त्याचा फार परिणाम झाला. कात्रणे वगैरे काढायला वेळ नसतो. कमी वेळेत अधिक माहिती देणार्‍या साधनांची आम्हाला आज गरज आहे; परंतु अशा साधनांवर पूर्णत: अवलंबून राहणेही योग्य नाही.
चैताली वाळूजकर, बी. ई. सिव्हिल
सुरक्षा यंत्रणा असावी
माहितीपूर्ण वेबसाइट्स आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. सर्व वेबसाइट्ससंबंधी सुरक्षेचे नियम कडक असावेत. आता या साइट्स आमच्या रोजच्या गजजा झाल्या आहेत. कात्रणांचे म्हणाल तर ते ग्रिटींगसारखे असते, ‘फॉरेव्हर’.
रुचा बोरले, बीई मेकॅनिक