एक संत आणि सिद्धा उपचाराचे तज्ज्ञ अपाथू कथा पिल्लई यांच्या घरी जन्मलेल्या शिवाथनू पिल्लई यांना शालेय जीवनापासूनच अभ्यासात रस होता. ते प्रत्येक वर्गात १०० टक्के गुण घेत होते. बुद्धिमत्ता आणि जिज्ञासू वृत्तीमुळे शिक्षण विभागातील बड्या अधिका-यांमध्येही त्यांच्याविषयी चर्चा होत असे. एकदा शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी त्यांना बीएड करणा-या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी नियुक्त केले होते. वाचन आणि लेखनाबाबत त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे त्यांना पाहावयाचे होते. एका मुलाच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नामुळे बीएड करणा-या विद्यार्थ्यांना घाम फुटला होता. शालेय शिक्षण झाल्यानंतरही त्यांच्या नावाची चर्चा महाविद्यालयात होऊ लागली. ते दररोज प्रयोगशाळेत नवा प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होते.
ए शिवाथनू पिल्लई : संरक्षण शास्त्रज्ञ
>जन्म : १५ जुलै १९४७(कन्याकुमारीत)
>शिक्षण : मद्रास विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, हार्वर्डमधून मॅनेजमेंट आणि पुणे विद्यापीठातून पीएचडी
चर्चेत कशामुळे : सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे जनक .त्यांना नुकतेच लोकप्रशासन, मॅनेजमेंट आणि शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल लालबहादूर शास्त्री पुरस्काराने सन्मानित केले.
महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात सर्व विद्यार्थी भाग घेणार होते. प्रदर्शनासाठी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाणारे डॉ. विक्रम साराभाई येणार होते. साराभाई यांच्यावर छाप पडावी असा काहीतरी प्रयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते रात्ररात्रभर प्रयोगशाळेत घालवत होते. एखाद्या कल्पनेवर काम करत असताना ती न आवडल्यास ते अर्ध्यावरच सोडून देत असत. सरतेशेवटी त्यांनी इलेक्ट्रिकल स्विचिंग सिस्टिम बनवण्यास सुरुवात केली. सध्या उपग्रहात वापरल्या जाणा-या या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याची निर्मिती केली. साराभाई यांनी जेव्हा पाहिले तेव्हा चकित होऊन त्यांची गळाभेट घेतली. पदवीनंतर १९६९ मध्ये ते तिरुवनंतपुरममध्ये अंतराळ विज्ञान तंत्रज्ञान केंद्रात रुजू झाले. एसएलव्ही-३ अग्निबाण विकसित करणा-या टीममध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. येथे जवळपास दहा वर्षे काम केल्यानंतर १९८६ मध्ये ते डीआरडीओमध्ये आले आणि ‘पृथ्वी’ व ‘अग्नी’ क्षेपणास्त्र बनवणा-या तंत्रज्ञानावर काम केले. त्यांचे काम पाहून त्यांना १९९० च्या अखेरीस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.