आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबापुरी हलते आहे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबापुरी नशीब काढायला येणा-यांची नगरी. देशाची आर्थिक राजधानी आणि बॉलीवूडचं आगार. दीड कोटी लोक राहत असलेल्या या शहरात लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. यातील पाच मतदारसंघांवर काँग्रेसचा ताबा आहे, तर एक राष्‍ट्रवादीच्या हाती आहे. 15 व्या लोकसभेची निवडणूक आता येऊ घातलीय.
यंदाची निवडणूक आगळीवेगळी असेल. कारण यंदा देशभरात ‘आप’चं वादळ घोंघावतंय. दिल्लीनंतर ‘आप’ चा खरा निशाणा मुंबई आहे. ‘आप’चे मुंबईतले 6 पैकी 3 उमेदवार जाहीर केले गेलेत. त्यामुळे आचारसंहिता लागलेली नसली तरीही मुंबईत मात्र लढाईला केव्हाचेच तोंड फुटले.
बँकतज्ज्ञ मीरा सन्याल, जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आणि सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांना ‘आप’ने मुंबईच्या मैदानात उतरवले आहे. या तिघांची नावे जाहीर होताच, अनेकांनी तोंडात बोटं घातली. कारण या तिघांनी मुंबई पालिकेचीही कधी निवडणूक लढवलेली नाही.
मुंबईत ‘आप’ला सध्या तरी कोणी गांभीर्याने घ्यायला तयार नाही. अर्थात पारंपरिक पक्षाचे नेते-कार्यकर्ते गांभीर्याने घेत नसले तरी मुंबईकरांच्या मनात मात्र वेगळंच चाललंय. सामान्य माणूस खरोखरच ‘आप’कडे आशेने पाहतोय, असं दिसतंय. झोपडपट्ट्यांना मंजुरी, एसआरए प्रोजेक्ट, लोकल वाहतूक, हेरिटेज, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, स्वस्त वीज, डिम्ड कन्व्हेनियन्स, कायदा सुव्यवस्था, मेट्रो-मोनो प्रोजेक्ट इत्यादी मुद्दे मुंबईसाठी महत्त्वाचे असतीलच, पण महागाई आणि घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती हा मुंबईतला आगामी निवडणुकीतील कळीचा मुद्दा असणार आहे.
या दोन मुद्द्यांना ‘आप’ने हात घातला आहे. मेधा पाटकर गेली तीन वर्षे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहेत. ‘घर बचाओ, घर बनाओ’ या त्यांच्या चळवळीनं बिल्डरांविरोधात मुंबईत चांगलंच रान उठवलं आहे. पाटकरांना मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये आजमितीस मोठा जनाधारही आहे.
दक्षिण मुंबई म्हणजे कुबेराची वस्ती. सामान्य माणूस येथे औषधाला नाही. राज्यात सर्वात कमी मतदान येथे होते. येथे आंतरराष्‍ट्रीय ख्यातीच्या बँकतज्ज्ञ मीरा सन्याल ‘आप’ने उभ्या केल्या आहेत. त्यामुळे देवरा कुटुंबीयांच्या या मतदारसंघात यंदा चुरस नक्की असेल.
मयांक गांधी सामाजिक कार्यकर्ते आणि बिल्डर आहेत. अरविंद केजरीवाल यांचे ते विश्वासू आहेत. पक्षाचे राज्यातील ते सर्वात मोठे नेते आहेत. आपच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीचेही ते सदस्य आहेत. ‘एनजीओ’मधून आलेले ऋजू स्वभावाचे मयांक गांधी उत्कृष्ट संघटक आहेत. त्यामुळेच त्यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून ‘आप’ने उभे केले आहे.
‘आप’चे निवडणूक तंत्र वेगळेच
‘आप’चे मुंबईतील अद्याप तीन उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. प्रचाराचा मात्र त्यांनी चांगलाच धडाका लावला आहे. ‘आप’चं निवडणुका लढण्याचं तंत्रच आगळवेगळं आहे. त्यांच्या रॅलीत डामडौल नसतो. टोपी घालून झाडू घेतलेले कार्यकर्ते कुठे धरणे देतील, कुठले रस्ते झाडतील, कुणाच्या कार्यालयाबाहेर बोंब मारतील याचा काही नेम नसतो.
कधी ते राज्यपालांच्या घराबाहेर बसतील तर कधी राष्‍ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर झाडू मारतील. कधी वार्ताहर परिषद घेऊन बड्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढतील तर कधी आझाद मैदानावर जनसुनवाई घेतील, यांचे काही सांगता येत नाही.
‘आप’च्या या वेगळ्या शैलीचे अनेकांना वावडे आहे. माध्यमवाले त्यांना भाबडे म्हणतात. विरोधी पक्षातील कार्यकर्ते त्यांना वेड्यात काढतात, पण ‘आप’च्या या प्रयत्नांकडे सामान्य माणूस मात्र कुतूहलाने पाहतोय.
आठ दिवसांपूर्वी ‘आप’ची अंधेरीत सभा झाली. ही सभा राज्यातल्या प्रचाराच्या शुभारंभाची सभा होती. पक्षाचे सल्लागार योगेंद्र यादव मुख्य वक्ते होते. सभेला तुफान प्रतिसाद मिळाला. पाच हजारांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात दहा हजारांची उपस्थिती लाभली.
सभेत कोणताही डामडौल नव्हता. उपस्थितांमध्ये जेवढे गोरगरीब तेवढेच उच्चशिक्षितसुद्धा आणि तेवढ्याच संख्येने महिलापण होत्या. एरवी भाजप असो नाही तर काँग्रेस, महिलांची उपस्थिती औषधापुरती असते. मुंबईतल्या सभा म्हणजे कार्यकर्ते कमी; थाटमाट मात्र फाइव्ह स्टार, अशा असतात. ‘आप’ची बोलण्याची भाषा पण साधीसुधी. साधे साधे प्रश्न आणि त्यावरील पटतील अशी उत्तरे. कुणाला इशारा नाही की शिवराळ भाषा नाही. त्यामुळे ‘आप’च्या सभा चांगलीच गर्दी खेचत आहेत. कार्यकर्त्यांची संख्या इतकी की ही माणसं आणतात कुठून, असा प्रश्न पडावा.
अंधेरीत पूर्वेला पक्षाचे मुख्य कार्यालय आहे. तिथेही असंच साधंसुधं वातावरण. बिल्डरांचा वावर नाही की पांढ-या कपड्यातले उंची नेते नाहीत. कार्यकर्त्यांची मात्र चिक्कार गर्दी. कोण वर्ध्याचा तर कोण बीडचा. कुणाला पक्षाचा कार्यकर्ता व्हायचं, तर कुणाला पक्षाचं साधं सदस्यत्व हवंय.
या पक्षाची प्रचार यंत्रणा तगडी आहे. तीस, चाळीस कार्यकर्ते अव्याहतपणे सोशल नेटवर्किंगमध्ये गुंग असतात. व्हॉट्सअप, जीमेल, हँगआऊट आणि ट्विटरवरती केवळ आप, आप आणि केजरीवालचा जप. कार्यालयातले शेकडो फोण खणखणत असतात. सदस्यत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचा फोन, गाव, पत्ता ही माहिती मेन सर्व्हरमध्ये जमा केली जातेय, ‘आप’च्या कार्यालयात कधीही जा, हेच चित्र तुमच्या नजरेस पडेल. ‘आप’चं मुंबापुरीत जे काही मन्वंतर चालू आहे, त्याला मात्र अजूनही किरकोळीतच काढलं
जातंय. ‘आप’ने दिल्ली विधानसभेवेळी निधीचं आवाहन केलं होतं. त्यावेळी देशाच्या पाच महानगरांमधून त्यांना सर्वाधिक मदत मिळाली. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबापुरी होती. याचा अर्थ काय तर मुंबईत ‘आप’चा जनाधार आहे, पण तो अद्याप सुप्त आहे.
म्हणूनच ‘आप’ने लोकसभेचे जे उमेदवार दिले आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार महाराष्‍ट्रातील आहेत. याचाच अर्थ ‘आप’चे नेते मुंबई आणि महाराष्‍ट्राकडे गांभीर्याने पाहत आहेत. या पक्षाचं सध्या एकच दुखणं आहे. ते म्हणजे राज्यात म्हणावा तसा चेहरा अद्याप नाही.
त्यावर ‘आप’च्या नेत्यांचं म्हणणं की, ‘आम्ही व्यवस्थेला पर्याय देतोय. तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेली माणसं आमच्याकडे आली, पण त्यांना आम्ही दूर लोटलं. साधनसुचिता आम्ही मानतो, आम्हाला त्यांच्यातले एक व्हायचे नाही, तर राजकारण हे सामान्य माणसाच्या हाती द्यायचं आहे!