आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र, तत्त्वज्ञ अन् उत्तम मार्गदर्शक -ज्येेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष १९८० मध्ये त्रिवेंद्रम येथे भारताने क्षेपणास्त्रविषयक कार्यक्रम सुरू केला होता. त्या मिशनचे संचालक म्हणून डॉ. कलाम त्रिवेंद्रमला आले. मीही त्या वेळी तेथेच इलेक्ट्रॉनिक सेंटरचा संचालक होतो. तेव्हापासून आमची ओळख. संचालक म्हणून राहण्यासाठी त्यांना खरे तर मोठे क्वार्टर मिळाले होते. पण ते राहायचे त्यांच्याबरोबर काम करणा-या इंजिनिअर सहका-यांबरोबर छोट्या लॉजमध्ये. ते एकाच वेळी नेतृत्व करायचे आणि सहका-यांबरोबर मिळून मिसळूनही राहायचे. सहका-यांशी कसे आत्मीयतेने वागावे याचा धडा त्यांनी घालून दिला होता. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एकवाक्यता होती. जे बोलायचे तेच करायचे. पुढे मी पुण्याला सी-डॅकमध्ये परम संगणकाच्या निर्मितीमध्ये व्यग्र असताना डॉ. कलाम पुण्याला आले होते. सी-डॅकला त्यांनी भेट दिली. इथले वर्क कल्चर त्यांना इतके आवडले की ‘येथून मला प्रेरणा मिळाली,’ असे गौरवोद्गार कलामांनी काढले. वास्तविक सहका-यांबरोबर कशी वागणूक असावी, याची शिकवण मी त्यांच्यापासूनच घेतली होती. परंतु तरीही त्यांनी आमचे कौतुक केले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. शास्त्रज्ञ या नात्याने देशाच्या धोरण निश्चितीमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केले. त्या वेळी त्यांचा भर विद्यार्थी आणि तरुण घडवण्यावर असायचा. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने संशोधन, विज्ञानाचे व्हिजन ठरवण्यासाठी पुढाकार घेतला. तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता आणण्याचा त्यांचा आग्रह होता. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांचे जीवन विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतले. विद्यार्थी उद्याचे नागरिक म्हणून देश घडवणार आहेत. हे विद्यार्थीच देशाची स्वप्ने पूर्ण करणार आहेत, म्हणूनच त्यांना घडवण्यासाठी आपला अनुभव खर्ची टाकण्याचा प्रयत्न त्यांनी शेवटपर्यंत केला. ते आदर्श शिक्षक होते. काही आठवड्यांपूर्वीच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. तेव्हाही त्यांचा तोच उत्साह, मनाचा निर्मळपणा पाहायला मिळाला. आमचे ३५ वर्षांचे मैत्र होते. डॉ. कलाम सर्वार्थाने माझे ‘फ्रेंड-फिलॉसॉफर-गाइड’ होते.

पुढे वाचा... कलाम चाचा!