आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Adarsh Housing Society Scam By Vinayak Ekbote, Divya Marathi

आदर्श प्रकरणाचे भूत मानगुटीवरून उतरेल का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झंझावाती दौरे सुरू केले आहेत. तीन वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर ते चांगलेच फॉर्मात आले आहेत. त्यांच्या दौ-यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची माळ कोणाच्या पदरात पडणार याबाबत काँग्रेस कार्यकर्तेच संभ्रमात आहेत.
विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या खासदारांनी 50 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकली त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. भास्करराव पाटील गेल्या वेळी जवळपास 75 हजार मताने विजयी झाले. त्यामुळे या वेळी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती, परंतु चव्हाणांच्या झंझावाती दौ-याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणूक लढवणारच, असे चव्हाणांनी अद्याप जाहीर केले नाही. पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी पार पाडीन, असे त्यांनी सांगितले. याचा अर्थ सर्वांनाच समजण्यासारखा आहे.


आदर्श प्रकरणामुळे अशोक चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील पक्ष, संघटनेवर त्यांचीच कमांड आहे, परंतु मोदींनी देशात निर्माण केलेली काँग्रेस विरोधी हवा आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीने काँग्रेसला दिलेले आव्हान यामुळे काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे. आगामी निवडणूक ही काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे एक-एक खासदार त्यांच्यासाठी लाख मोलाचा आहे. हे लक्षात घेऊन केवळ इलेक्ट्रोरल मेरिट या मुद्द्यावर काँग्रेस राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकलेले सुरेश कलमाडी व आदर्श प्रकरणात अडकलेले अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावर अशोक चव्हाण 100 टक्के खरे उतरणारे आहेत. देशात कोणाचीही हवा असली तरी अशोक चव्हाणांना मतदारसंघात पराभूत करण्याइतपत ताकद विरोधकांत नाही. हमखास निवडून येणारी जागा असेच त्यांच्या उमेदवारीबाबत म्हणावे लागेल. हे खरे असले तरी ते अद्याप आदर्श प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडले नाहीत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रकरणात अडकलेले सर्व माजी मुख्यमंत्री व राजेश टोपे, सुनील तटकरे या विद्यमान मंत्र्यांना सरकारने क्लीनचिट दिली. तथापि चव्हाणांना मात्र वा-यावर सोडले. सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही त्यांना या खटल्यातून बाहेर काढण्यास मज्जाव केला. अशावेळी त्यांना उमेदवारी दिली तर विरोधक आदर्श व राष्ट्रकुल घोटाळ्याचा बाऊ करून काँग्रेसला खिंडीत गाठू शकतात हे निश्चित आहे. निवडणुकीच्या रणांगणावर काँग्रेसला ही बाब अडचणीची ठरू शकते. त्यातून स्वत: अशोक चव्हाण व काँग्रेस कसे मार्ग काढतात यावर सर्व अवलंबून असणार आहे.


मराठवाड्याच्या हिताचा विचार केला तर अशोक चव्हाणांनी राजकारणात सक्रिय होणे ही काळाची गरज आहे. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर मराठवाड्यात काँग्रेसकडे अशोक चव्हाणांव्यतिरिक्त नेतृत्व करणारा नेता नाही. सरकार व सत्ताधारी पक्षात मातब्बर नेतृत्व नसल्यानेच मराठवाड्याच्या विकासाला आळा बसला आहेच, पण हक्काचे द्यायलाही कोणी तयार नाही. जायकवाडीच्या पाण्यासाठीही वेळोवेळी न्यायालयात खेटे घालावे लागत आहेत. केवळ राजकीय नेतृत्वाच्या पोकळीमुळे हे दिवस मराठवाड्यावर आले आहेत. त्यामुळे आदर्शचे भूत मानगुटीवरून लवकरात लवकर उतरवून राजकारणात सक्रिय होणे हे अशोक चव्हाणांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच मराठवाड्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. अशावेळी आदर्शचा स्पीडब्रेकर आडवा आलाच तर अशोक चव्हाण ऐनवेळी सौ. अमिता चव्हाण यांना रणांगणात उतरवू शकतात. राज्यात शंभर टक्के काँग्रेसमय असलेला नांदेड हा एकमात्र जिल्हा आहे. भविष्यात ती ओळख कायम राहावी यासाठी सत्तेची सूत्रे आपल्याच घरात ठेवणे ही चव्हाणांसाठी काळाची गरज आहे.