हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर मोहडबंद गाव आहे. शहीद विजेंद्र सिंह यांच्या घराचा रस्ता विचारला तर रस्त्यापासून तिसऱ्या वळणावर त्यांचा पुतळा असून त्याच गल्लीत घर आहे, असे सांगण्यात आले. त्या वळणावर गेल्यावर ठेलेवाल्यांच्या गर्दीतून पुतळा शोधावा लागला. घराबाहेरच विजेंद्र यांची पत्नी जयावती यांची भेट झाली. त्यांनी विचारले,‘तुम्ही मला भेटायला आलात? अचानक कशी आठवण झाली? आमची तर कोणी आठवण करत नाही. संसद हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांची तर नावेही कोणाला आठवत नाहीत. ज्यांचे प्राण वाचवले त्या राजकीय नेत्यांनाही नाही.’ त्यांचा राग एवढा होता की डोळ्यांत अश्रूच आले.
विजेंद्र सिंह दिल्ली पोलिसांत होते. दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला तेव्हा ते ९ शहिदांसोबत तेथे ड्यूटीवर होते. जयावतींना आठवते, १३ डिसेंबर २००१, दुपारचे १२ वाजलेले. मुलीने टीव्हीवर हल्ल्याची घटना पाहिली. ती मला सांगायला आली. मी तिला सांगितले की, अगं, जिथे तुझे वडील ड्यूटीवर आहेत तिथे कोणीच घुसू शकत नाही. त्यांनी दहशतवाद्यांची गोळी छातीवर झेलली होती. माझ्यावर पाच मुलांची जबाबदारी आली आहे. सर्वात मोठी मुलगी १८ वर्षांची होती, तर सर्वात धाकटा मुलगा ९ वर्षांचा. तिघांचेही शिक्षण सुरू होते. आमच्याकडे मुलीचे वडील कधीही तिच्या सासरी राहत नाहीत, पण माझे वडील १० वर्षे आमच्या घरी आहेत. मी आणि ते सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारत होतो. पाचही मुलांना घरी बंद ठेवून जावे लागायचे. आम्ही थकलो. अफझलच्या फाशीवरूनही राजकारण सुरू झाले. आम्ही तर
आपली पदके परत केली होती. ते सांगत, पदके परत करू नका. पदकांचा अर्थ विजय, सन्मान. गुन्हेगाराला फाशी देत नव्हते. मग कशाचा सन्मान? जयावती म्हणतात, कोणी अफझलच्या फाशीचे समर्थन करते तर कोणी विरोधात बोलते. पण जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांनी तर असा विचार केला नव्हता ना, की काँग्रेसच्या खासदारांना वाचवावे की भाजपच्या की माकपच्या? पण जेव्हा साथ देण्याची वेळ आली तेव्हा राजकारण सुरू केले. जयावती सांगतात की वर्षभरात फक्त संसद कार्यालयातून एक पत्र येते. त्यात म्हटलेले असते की १३ डिसेंबरला या आणि फुले वाहून श्रद्धांजली अर्पण करा. गेल्या आठ वर्षांपासून येत असलेली पत्रे त्या काढून दाखवतात. इतर दिवशी कोणी त्यांची विचारपूसही करत नाही. ही कहाणी संसदेवरील हल्ल्यातील शहिदांच्या एका कुटुंबाची नाही. इतर कुटुंबीयांचीही हीच तक्रार आहे. सीआरपीएफच्या कमलेश कुमारी त्या दिवशी संसदेच्या प्रवेशद्वारावर होत्या. दहशतवाद्यांच्या गोळ्यांची पर्वा न करता त्यांनी गोळ्यांच्या वर्षावात संसदेचे प्रवेशद्वार बंद केले. अतुलनीय शौर्यासाठी त्यांना अशोकचक्र देण्यात आले.
हा सन्मान मिळणाऱ्या त्या देशातील एकमेव महिला सैनिक आहेत. त्यांच्या दोन मुली आहेत. ज्योती आणि श्वेता. पती अवधेश कुमार सांगतात की, मुलींचे शिक्षण चांगले व्हावे अशी कमलेशची इच्छा होती. म्हणून आम्ही दिल्लीत राहत होतो. वडिलांचा मृत्यू झाला तर आई सर्वकाही सांभाळते, पण घरातील महिला राहिली नाही तर मुलींना सांभाळणे हे मोठे आव्हान असते. माझ्या दोन्ही मुली आईसारख्याच धाडसी आहेत. त्यांना देशसेवा करायची आहे. अवधेश म्हणतात, हे लोक जितक्या वेळा अफझल आणि स्वातंत्र्याचे नाव घेतात तेवढ्याच वेळा शहिदांचे घेतले असते तर गर्व वाटला असता. कोणीतरी आठवण तर करतेय, असे वाटले असते.
या राजकीय नेत्यांचे चालले असते तर त्यांनी जे शहीद झाले त्यांनाच दहशतवादी ठरवले असते. ९ जवान शहीद झाले होते. पाच दहशतवादी मारले गेले होते. कल्पना करा की ते संसदेत गेले असते तर काय झाले असते? अफझलला असे गौरवले की जणूकाही तो कारगिल युद्ध जिंकूनच आला आहे.
ते घरातच तलवार चालवत आहेत. जा पाकिस्तानच्या सीमेवर. सोडा आपले घर. गोळी आम्हीही झेलू आणि तुम्हीही झेलून पाहा. हे लोक राजकारणासाठी कोणतीही मर्यादा गाठू शकतात. मग शहिदांची बेइज्जती झाली तरी हरकत नाही. ते म्हणतात-घरोघरी अफझल पैदा करू. मग आम्ही अफझलला मारणाऱ्यांना जन्म देऊ.
सुनीता विचारतात, जेएनयूत आपल्या मुलांना देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देण्यास शिकवणारे कोण आहेत? मी तर देशाचे नाव उज्ज्वल करा, असे मुलांना शिकवते. इकडे जवान शहीद होतात आणि तिकडे जेएनयूत पार्ट्या होतात. कधी-कधी वाटते, माझ्याकडे सत्ता असती तर यांच्याकडे पाहिलेच असते.
सुनीता यांचे पती विक्रम बिश्त एएनआय या वृत्तसंस्थेत कॅमेरामन होते. हल्ल्यात त्यांना पोटात गोळी लागली. हल्ला झाला तेव्हा माझी मुलगी तीन महिन्यांची होती. ती चांगली शिकते. शाळेत चांगले गुण मिळवते. तिला मी डॉक्टर करणार आहे, पण तिचे गुण कोणी विचारत नाही. अफझल या दहशतवाद्याच्या मुलाने ९० टक्के गुण मिळवले तर त्याची खूप प्रशंसा झाली. आमच्या मुलीकडे दुर्लक्ष का केले जाते?