आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मांतर सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेल्या धम्मकाठीची रंजक कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील दीक्षाभूमीवर पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या अनेक स्मृती नागपूरकरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे या सोहळ्यात बाबासाहेबांनी वापरलेली धम्मकाठी आजही कर्नलबागेतील मेंढे कुटुंबीयांनी जपून ठेवली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती वा अन्य प्रसंगी ती कर्नलबागेतील आंबेडकर वाचनालयात लोकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. लोक मोठ्या उत्साहाने पुष्पार्पण करून धम्मकाठीपुढे नतमस्तक होतात.
बाबासाहेबांनी वापरलेल्या काठीचा इतिहास कर्नलबागेतील रहिवासी असलेल्या मॉरिस कॉलेजच्या पाली-प्राकृतच्या प्राध्यापिका प्रा. सविता मेंढे आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खैरकर अतिशय रंजकपणे सांगतात. त्यांचे वडील प्रल्हाद मेंढे (गुरुजी) समता सैनिक दलात होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात बाबासाहेबांच्या संरक्षणासाठी याच दलातील निवडक सैनिकांमधून खास अंगरक्षक पथक तयार केलेले होते. त्याचे नेतृत्व मेंढे गुरुजींकडे होते. या पथकात कर्नलबागेतील श्यामराव साळवे, विठ्ठलराव साळवे, एकनाथ गोडघाटेंसह अनेकांचा सहभाग होता. प्रकृती बरी नसल्याने बाबासाहेबांनी मेंढे गुरुजींकडे आधारासाठी काठीची मागणी केली होती. तेव्हा मेंढे गुरुजींनी डझनभर काठ्या आणून त्या बाबासाहेबांच्या पुढ्यात ठेवल्या होत्या. त्यातून आर्य अष्टांगिक मार्गाचे प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी आठ गाठी असलेली काठी आधारासाठी निवडल्याचे प्रा. सविता मेंढे सांगतात. धम्मकाठी बाबासाहेबांनी नागपूरसह चंद्रपूर येथील धम्मचक्र सोहळ्यातही वापरली होती. १६ ऑक्टोबरला चंद्रपूरचा सोहळा आटोपून बाबासाहेब नागपुरात परतले. मुंबईला जाण्यासाठी ते विमानतळावर पोहोचले. मात्र, त्या वेळीही विमानातून काठी नेण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ती धम्मकाठी विमानतळावरच ठेवून घेतली. बाबासाहेबांनी मेंढे गुरुजींना परत केली, त्या वेळी मेंढे गुरुजी म्हणाले, ‘बाबासाहेब, मी काठी घेऊन काय करू..?’ त्यावर बाबासाहेबांनी हजरजबाबी होऊन उत्तर दिले, ‘अरे, ही साधी काठी नाही, आर्य अष्टांगिक मार्ग दाखवणारी काठी आहे.’ बाबासाहेबांच्या सूचनेनंतर मेंढे गुरुजींनी ती स्वत:च्या ताब्यात घेतली. तेव्हापासून मेंढे कुटुंबाकडेच धम्मकाठी आहे. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पवित्र झालेली काठी आमच्याकडे आहे, याचा खूप अभिमान वाटतो. आम्ही ती जिवापाड जपतो. तिचे पावित्र्य नष्ट होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतो, असे प्रा. सविता मेंढे सांगतात. अनेकांनी काठीची मागणी केली आहे. आम्ही ती कुणालाच देणार नाही. लोक चपला घालून काठीला हात लावण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ते मुळीच खपवून घेत नाही. माझ्या वडिलांनीदेखील कधी काठीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही, असे नमूद करून प्रा. मेंढे सांगतात की, त्यामागे त्यांची काही भावना होती.