आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Bill Gates By Vikas Zade, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली वार्तापत्र: गर्भश्रीमंत मनाचा माणूस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स हे दिल्लीतील नितीन गडकरी यांच्या वाड्यावर आले होते. बिल गेट्स जगातील गर्भश्रीमंत माणूस, परंतु ते अगदीच साधे वाटले. चेह-यावर पैशाची जराही ऊर्मी नाही. साधेपणा कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावे असे हे व्यक्तिमत्त्व. गेट्स यांना पाहिल्यावर त्यांचे बोलणे, समोरच्यांचे आत्मीयतेने ऐकून घेण्याची मानसिकता आणि वयाच्या ५८ व्या वर्षीही समाजाकडून काय शिकता येईल आणि काय देता येईल याबाबतची त्यांची तळमळ, सामान्य लोकांत त्यांचे सहजपणे मिसळणे याकडे लक्ष वेधले जाते.
गर्भश्रीमंत मनाच्या व्यक्तीमध्येच हे गुण असू शकतात. याविपरीत स्थिती आमच्या देशातील आहे. भारतीय संस्कृतीचा आम्ही सातत्याने ढिंडोरा पिटत आलो आहोत. ‘हे विश्वचि माझे घर किंवा वसुधैव कुटुंबकम्’ हा उद्घोष केवळ आमच्या बोलण्यातून दिसतो. रामायणातील कथा सांगून महान संस्कृती आणि संस्कारांचे ठेकेदार असल्याचे आम्ही जगाला दर्शवितो. अमेरिकेला इतिहास आणि संस्कृती नाही या गोष्टीही आम्हीच पेरतो.
महाभारतातील कर्ण कोणालाही विन्मुख पाठवायचा नाही. परंतु दानशूर कर्णाकडे मदतीसाठी जावे लागत होते. मात्र, बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा भारतात आले ते ‘स्लम डॉग मिलेनियर’ पाहायला किंवा भारतातील दारिद्र्य, बेरोजगारी पाहून ‘अतुल्य भारत’चे अमेरिकेत जाऊन रवंथ करायला नाही. ज्या देशाला संस्कृती नाही असे म्हणतो तेथील गेट्स या देशात स्वत: येतात ते कर्णापेक्षाही महान कार्य करायला! बिल गेट्स फाउंडेशन जगाच्या वेदना स्वत:च्या समजून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. गेट्स दांपत्याची भारत भेट ही
यासाठीच होती.

आपल्या देशात असे चित्र पाहायला मिळत नाही. या देशातील बोटावर मोजण्याइतके आणि ज्यांची जगातील श्रीमंतांमध्ये गणना होते त्यांना दृष्टीपुढे आणा! त्यांच्यातील ‘इगो’ आणि देशवासीयांबाबत त्यांच्या मनात असलेली अस्पृश्यतेची भावना पुढे येत असते. ज्या देशाने त्यांना भरभरून दिले आहे तेथील सामान्य लोकांच्या वस्तीत जाऊन ते कसे जगतात, याची त्यांनी कधी साधी चौकशी केल्याचे दिसून आले का? काही उद्योगपतींच्या इशा-यावर हा देश चालतो. सरकारला ते सूचना देत असतात. सरकारही त्यांच्यापुढे नतमस्तक होत असते. अनेक घोटाळ्यांमध्ये या गर्भश्रीमंतांवर ताशेरे ओढले जातात. परंतु त्याचा त्यांच्यावर जराही परिणाम होत नाही.
नैसर्गिक संपत्तीचे मालक हेच असतात. या देशातील सामान्य आणि गरिबांना राहण्यासाठी दोनशे फूट जागा मिळणे अवघड असते तिथे या देशातील अरबो-खरबोंची जमीन अगदी रुपयाच्या भावात आणि कधी फुकटातही त्यांना उपलब्ध होते. त्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागत नाहीत. सरकारमध्ये बसलेले लोकच सर्व प्रक्रिया करून देतात. सत्ता आणि संपत्ती या गोष्टी माज आणणा-या आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात त्या प्रकर्षाने जाणवतात. उद्योगातून सामाजिक कार्याला हातभार लागावा म्हणून सरकारने २ टक्के सीएसआर निधी निश्चित केला आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, प्रदूषण निर्मूलन आदींच्या तो उपयोगी यावा ही धारणा आहे. परंतु अनेक उद्योगपतींनी स्वत:चे फाउंडेशन उघडून हा निधी बाहेर जाऊ द्यायचा नाही हा उद्योग सुरू केला आहे.

या देशातील मस्तवाल मानसिकतेच्या अगदी विरोधी असलेले बिल गेट्स यांना महात्मा म्हणावे लागेल. जवळचे देण्याची दानत असावी लागते ते त्यांच्यात आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची जी कल्पना मांडली ती गेट्स यांना आवडली. या यज्ञात मलाही सहभागी करून घ्या हे सांगायला ते येथे आले. स्वातंत्र्यदिनी मोदींचे भाषण संपल्या संपल्याच महात्मा गांधींचे वारसदार म्हणवणा-या कॉँग्रेसवाल्यांनी मोदींवर टीका केली. ६० वर्षांत नासवून ठेवलेला भारत स्वच्छ होऊच शकत नाही याची कॉँग्रेसच्या बुवाबाजांना जाणीव असावी. एवढा मोठा फरक देणा-यात आणि सतत लुबाडणूक करणा-यांमध्ये दिसून येतो. नितीन गडकरीसोंबत गेट्स दांपत्याने जवळपास एक तास घालवला. गडकरी हे बोलण्यात फटकळ, परंतु बिनधास्तही आहेत. ज्यांनी त्यांना जवळून पाहिले त्यांना त्यांच्यातील तळागाळातील लोकांबाबत प्रचंड संवेदना असलेला माणूस दिसून येतो. शेकडो गरीब लोकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान देणारी ही व्यक्ती. ते राजकारणी कधीच वाटले नाहीत. कोणाचीही पर्वा न करणारे परंतु मनाला योग्य वाटेल ते काम हातावेगळे करणारे गडकरी यांना दिल्लीतील लोक टिकू देतील का? हा प्रश्न अनेक मराठी लोकांच्या मनात सातत्याने येत असतो. गेट्स यांना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. हस्तकलेतील अभिनव कल्पकता ओतून तयार केलेल्या वस्तूंचे विश्लेषण ऐकताना गेट्ससुद्धा संभ्रमात पडले.

हा माणूस मंत्री आहे की कष्टक-यांच्या
वस्तूंची कौशल्यपूर्ण जाहिरात करणारा हा प्रश्न त्यांना पडला. गेट्स दांपत्याने गडकरींना हे बोलून दाखवले. गेट्स यांच्याशी बोलताना गडकरी यांनी संपूर्ण देशातील समस्या मांडल्या. त्या सोडवण्यासाठीची कटबिद्धता सांगितली. मग ते गंगेचे शुद्धीकरण असो की महिलांच्या बचत गटांना आर्थिक सक्षम करण्याचा विषय असो. गेट्स यांनी आल्याआल्याच काश्मिरात मदत केली. देशाच्या स्वच्छता अभियानात मदत करतो म्हणून गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी आश्वासन दिले. भारतात स्वच्छता अभियान सक्षमपणे राबवले जावे असे गेट्स यांना वाटते, परंतु भारतीय याकडे दुर्लक्ष का करतात, असा प्रश्नही त्यांना पडला आहे.
भारतामध्ये ‘जाऊ तिथे खाऊ ’याबाबतची ख्याती जगात पसरली आहे. गेट्स यांनी गडकरींना मदतीचे आश्वासन दिले, परंतु सहकार्य करण्याची विनंतीही केली. मी जी मदत करतो ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची यंत्रणा उभी करा! असे सांगितले. गेट्स यांचा या देशातील पूर्वानुभव वाईट असावा का? जो स्वत: येऊन मदतीचा हात पुढे करतो, त्याचे हात घेण्याचा विचार कोणीच करणार नाही का?

एचएमटीची टिकटिक बंद
लग्नात हुंडापद्धती होती, परंतु वस्तुस्वरूपात मागणी असायची. रोखीने हुंडा देणारे अपवादानेच सापडायचे. ग्रामीण भागात त्याचा परिणाम दिसून आला. हुंडा पद्धत रूढ होत गेली. शेतकरी-कष्टक-यांनाही लग्न जुळवताना हुंडा म्हणून काही भेटवस्तू पाहिजे असायच्या. सायकल, रेडिओ आणि घड्याळ यातील कोणतीही वस्तू मिळाली तर नवरदेव आणि त्याच्याकडची मंडळी खुश व्हायची. कुटुंब अशिक्षित असले तरी पोराला एचएमटीचे घड्याळ आणि बायसिकल पाहिजे, असे मनमोकळेपणे सांगायचे. तेव्हा एचएमटीचे घड्याळ ब्रँड झाले होते. या कंपनीचे घड्याळ हाताला बांधून मिरवताना नव-या मुलाची छाती फुललेली असायची. नंतरच्या काळात देशातील बहुतांश लोकांच्या हाताला एचएमटीचे घड्याळ दिसू लागले. १९५३ मध्ये कंपनी स्थापन करण्यात आली. जपानच्या सिटीझन वॉच कंपनीचा हा संयुक्त प्रकल्प होता. १९६१ मध्ये पहिले घड्याळ कंपनीने भेटवस्तू म्हणून दिले ते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना! प्रत्येक दिवस सारखाच असतो असे नाही. एचएमटीने विविध मॉडेल्स बाजारपेठेत आणले. परंतु टायटन स्पर्धेत उतरले आणि एचएमटीला घरघर लागली. गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीला २४२.४७ कोटी रुपयांचा तोटा झाला. या कंपनीला सरकारकडून ५९५ कोटींचे कर्ज घ्यावे लागले. हजारावर कर्मचा-यांचे वेतन देण्याची मारामार चालली आहे. त्यामुळे ही कंपनीच बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला. स्पर्धेत टिकण्यासाठी केवळ ब्रँडच महत्त्वाचा नसतो तर नवे डावपेचही अत्यावश्यक असतात. अलीकडे मुलाला लग्नात घड्याळ मागायचे असल्यास तो एचएमटीचे नावही घेत नाही, एवढी ही घसरण आहे.