देवेंद्र फडणवीसयांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच पक्षांतर्गत कुरबुरी हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याला डावलून ते या पदावर बसल्याने अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आहे. राष्ट्रवादीशी छुपी युती करून ते सरकारचा गाडा ओढणार आहेत. सभागृहात विधेयक आले की प्रत्येक वेळेस राष्ट्रवादीला सभागृहातून बाहेर पडावे लागेल आणि सरकारला वाचवावे लागेल. विदर्भात शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता विदर्भाचेच नेते मुख्यमंत्री झाल्याने या आत्महत्या थांबवण्याला ते प्राधान्य देतील, ही अपेक्षा. पंतप्रधान
नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळेच फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. आमच्या काळात उद्योग गुजरातेत जात असल्याची टीका केली जायची. आता गुजरातमध्ये जाणा-या अशा प्रकल्पांना फडणवीस रोखणार काय?
भाजपचा विजय म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारांचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय असे चित्र निर्माण केले जातेय. हे साफ चुकीचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस भाजपने
आपले कडवे हिंदुत्व बाजूला ठेवून विकासाच्या मुद्यावर मते मागितली. मोदींची विकासपुरुष म्हणून प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे त्यांना यश मिळाले. आम्ही केलेल्या चांगल्या कामांचे मार्केटिंग करण्यात आम्ही कमी पडलो. भाजपकडून काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोपही करण्यात आले. टू जी स्पेक्ट्रम विक्रीत १.७६ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल तेव्हा कॅगने दिला आणि भाजपने तो डोक्यावर घेतला. तेव्हा आमचे मंत्री कपिल सिब्बल यांनी कॅगने सनसनाटी निर्माण करू नये, असे आवाहन केले असता त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता अर्थमंत्री अरुण जेटली स्वत:च कॅगने सनसनाटी निर्माण करू नये, असे आवाहन करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या स्पेक्ट्रमची प्रत्यक्ष लिलावाद्वारे विक्री करण्यात आली तेव्हा हजार कोटीच सरकारला मिळाले. कुठे गेले ते १७ लाख कोटी? काळ्या पैशावरून असेच रान उठवले गेले. सरकारने दिलेल्या यादीत २५० लोक मुंबईतील असल्याची माहिती आहे. एलबीटी रद्द करण्याची ग्वाही भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिली होती. मात्र या कर प्रणालीला पर्याय काय असेल? याचे उत्तर द्यावे लागेल.
सध्या तरुणांचे प्रमाण राज्यात ३८ टक्के आहे. यापैकी ६० ते ६५ टक्के तरुणांनी अनेक सर्वेक्षणांमध्ये जात-पात, धर्म यापेक्षा भ्रष्टाचार संपवणा-या किंवा करणा-या सरकारला पसंती दिली आहे. या तरुणांना हिंदुत्व किंवा अन्य कोणत्याही विचारधारांबद्दल कोणतीही आपुलकी नाही. त्यामुळे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आजवर केलेल्या आरोपांचा पाठपुरावा राज्य सरकार करणार काय? लोकसभेत ज्या उत्साहाने आणि ज्या प्रमाणात भाजपला मतदान झाले त्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत झाले नाही.
लोकसभा विधानसभा िनवडणुकीनंतर काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याची गरज आहे. नव्या आर्थिक धोरणांमुळे सध्या सगळीकडे पैशाचे राजकारण सुरू आहे. अशावेळेस गरिबांच्या हिताचे धोरण काँग्रेसने अंगीकारायला हवे. रोटी कपडा मकान सामान्य गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. या तीनही मूलभूत गरजा लोकांना परवडणा-या दरात उपलब्ध करून देणारे धोरण असायला हवे. खरेतर थोडी डावीच म्हणता येईल, अशी भूमिका आता काँग्रेसने घ्यायला हवी आहे. दलित, मुस्लिम, गरीब हे काँग्रेसचे पारंपरिक पाठीराखे आहेत. या वर्गांवर लक्ष केंद्रित करायला हवे.