१९७६ मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर इंडिया कंपनीत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झालेले हरीश मनवानी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावर विश्वास ठेवतात. ग्राहकांसोबतची नाळ टिकून राहावी यासाठी ते अचानकपणे दुकानात जाऊन कंपनीची उत्पादने ग्राहकांना किती आवडतात याची चाचपणी करतात. वातानुकूलित कार्यालयात बसून कागदावर विक्रीची आकडेमोड केल्याने वास्तविकता माहीत होत नाहीत, असे त्यांचे मत आहे.
हरीश मनवानी : सीओओ, हिंदुस्तान युनिलिव्हर
>जन्म : १९५४
> कुटुंब : पत्नी राधा, दोन मुली
> शिक्षण : हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्रॅमची पदवी
चर्चेचे कारण : ३८ वर्षांपर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हर या एकाच कंपनीत काम केल्यानंतर डिसेंबरमध्ये निवृत्ती.
२०१२ मध्ये घडलेली ही मनोरंजक गोष्ट आहे. चार देशांचा दौरा संपवून मनवानी जागतिक आर्थिक परिषदेत भाग घेण्यासाठी जर्मनीच्या दावोसमध्ये आले होते. हॉटेलमध्ये जाऊन विश्रांती घेण्याऐवजी ते थेट एका दुकानात पोहोचले आणि कोणालाही
आपली ओळख न दाखवता एका कोप-यात जाऊन उभे राहिले. तेथून आपल्या कंपनीची उत्पादने ग्राहक घेत आहेत की नाही, याची चाचपणी करू लागले. तब्बल अर्धा दिवस असाच घालवला. त्यानंतर एका ग्राहकाने त्यांना विचारल्यानंतर मनवानी यांनी त्यांचा परिचय दिला. कंपनीचा सीओओ प्रत्यक्ष दुकानात येऊन आपल्या उत्पादनांची माहिती घेतोय हे पाहून तो ग्राहक आश्चर्यचकित झाला. मनवानी यांच्या मते, प्रत्येक मॅनेजमेंट ट्रेनीने किमान सहा महिन्यांपर्यंत ग्रामीण भागात काम करायला हवे. ते म्हणतात, युनिलिव्हरमध्ये काम करणा-याला धुळीने माखलेल्या रस्त्यांवर काम करतानाही तितकाच आनंद व्हायला हवा, जितका लंडनमधील कार्यालयात बसून होतो. मनवानी यांनी या माध्यमातून बिझनेस स्कूलमध्ये जे शिकले त्याचा उपयोग कसा करायचा, टीमवर्क कसे करायचे आणि लोकांचा सन्मान कसा ठेवायचा या तीन गोष्टी शिकल्या.