आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘क्युबन कम्युनिझम’ निर्मात्याचा अस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिडेल कॅस्ट्रो पोथीबंद कम्युनिस्ट नव्हता. क्युबातली संस्कृती, इतिहास, समाजजीवन, कुटुंब पद्धती, अर्थकारण लक्षात घेऊन स्वतःचे सिद्धांत निर्माण केले. तयार सिद्धांतांच्या आहारी तो गेला नाही. ‘क्युबन कम्युनिस्ट कन्सेप्ट’ जन्माला घालणाऱ्या फिडेल कॅस्ट्रोचे माहात्म्य कायम आहे.
दु सऱ्या महायुद्धानंतर जन्माला आलेल्या जगभरातल्या माझ्या पिढीला क्रांतीचं प्रचंड आकर्षण होतं. आमच्या युद्धोत्तर पिढीनं जग बदलताना पाहिलं. महायुद्धाच्या जखमा तेव्हा जगभर दिसत होत्या. जग त्यातून सावरत होतं. पण त्यामुळंच युद्ध करणारी मागची पिढी मूर्ख आहे यावर आमच्या पिढीचा ठाम विश्वास होता. जगात मंदी आली की भांडवलशाही ‘वॉर इकॉनॉमी’ जन्माला घालते. हिटलर याच भांडवलशाहीचं अपत्य होतं. म्हणून जगातला अन्याय, विषमता संपवण्यासाठी हिंसक क्रांती करायला हवी, असं वाटण्याचा काळ म्हणजे पन्नाशीनंतरची दोन-तीन दशकं. त्याच वेळी लॅटिन अमेरिकेत फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा उदयाला आले. आमच्यासाठी ही मंडळी ‘हीरो’च होती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच क्षेत्रात भ्रमनिरास होऊ लागला होता. गावगाड्यातील अन्याय, विषमता संपवण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात तरुणाई एकवटू लागली होती. त्या काळात रशिया व चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचं रूपांतर हुकूमशाहीत झाल्याचं आम्ही पाहत होतो. त्यामुळं कम्युनिस्ट क्रांती चूक असल्याचं मत बनू लागलं.

जपान, फ्रान्स, रशिया, चीन अशा अनेक देशांमधली तरुणाई प्रस्थापितांच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागली होती. प्रस्थापित मान्यता झुगारून दिल्या जात होत्या. अमेरिकेतली हिप्पी चळवळ यातूनच जन्माला आली. जगभरच्या या युवक क्रांत्यांचा वेध घेणारा सविस्तर लेख मी ‘माणूस’मध्ये लिहिला होता. त्याच वेळी अरुण साधूंचीही कॅस्ट्रोवर लेखमाला आली होती. महाराष्ट्रातल्या तरुण वर्गात याचं प्रचंड स्वागत झालं होतं. ‘युक्रांद’साठी तर देशपातळीवर राममनोहर लोहिया आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फिडेल कॅस्ट्रो असंच समीकरण बनून गेलं. लोकांना बदल हवा असेल तर अल्पसंख्य पण कडव्या पाठीराख्यांच्या बळावरसुद्धा क्रांती करता येते, हे कॅस्ट्रोने करून दाखवलं. म्हणूनच आमच्या भाषणांमध्ये कॅस्ट्रोचं नाव आम्ही नेहमी घ्यायचो.

अमेरिकेपासून अवघ्या ९० मैलांवरचा क्युबा फिडेल कॅस्ट्रोनं कम्युनिस्ट केला. रशिया आणि अमेरिकेतल्या शीतयुद्धाचा तो काळ होता. त्या वेळी संपूर्ण लॅटिन अमेरिकेवर आपलं वर्चस्व राहावं ही अमेरिकेची इच्छा होती. त्यामुळंच कम्युनिस्ट क्युबा ही अमेरिकेच्या उरातलं दुखणं बनलं होतं. पण बलाढ्य अमेरिकेच्या कोणत्याच दबावापुढे कॅस्ट्रो झुकला नाही. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांकडून अनेकदा कॅस्ट्रोला संपवण्याचे कट रचले गेले. पण प्रत्येक वेळी तो सहिसलामत निसटला. कॅस्ट्रोने हत्याकांडे घडवून आणली वगैरे अपप्रचार अमेरिकी लेखकांनी केला. एवढंच काय अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीसुद्धा कॅस्ट्रोशी जुळवून घेण्यास तयार झाला होता. त्या दोघांची भेटही होणार होती. मात्र त्याआधीच त्याचा खून झाला. ‘प्रो-क्युबा’ केनेडीचा खून अमेरिकेच्याच गुप्तचर यंत्रणेनं घडवून आणला. यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.

अमेरिकेला न जुमानणारा कॅस्ट्रो चीन कम्युनिस्ट आहे म्हणून त्यांच्यापुढं झुकायचा असंही नव्हतं. साखरेच्या बदल्यात क्युबा चीनकडून तांदूळ घ्यायचा. सुरुवातीला हा व्यवहार जेवढी साखर तेवढा तांदूळ असा होता. चीनने नंतर तांदळासाठी अधिक किंमत मागितली तेव्हा कॅस्ट्रोनं देशवासीयांना विश्वासात घेतलं. आपण फक्त ऊस आणि बटाटा पिकवतो. सहा महिने तुम्ही पोटाला चिमटा काढला तर तांदूळसुद्धा आपला आपण पिकवू शकतो. तोपर्यंत फक्त बटाटा खाऊन तुम्ही राहा, ही कॅस्ट्रोची विनंती क्युबाने मानली. चीनवरचे अवलंबित्व कॅस्ट्रोनं झुगारून दिलं.

क्युबाचा कुटुंबप्रमुख हा त्याच्यावरचा विश्वास कॅस्ट्रोच्या अखेरच्या क्षणापर्यंत ढळला नाही हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अशी कामगिरी लेनिन-स्टॅलिनलाही रशियात करता आली नाही. चीन-रशियाचं अनुकरण त्यानं केलं नाही. त्या-त्या समाजाचा, युगाचा धर्म ओळखून युगांतर करावं लागतं. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते. हे घडवून आणणं आणि ते अखंडपणे टिकवणं अवघड असतं. कॅस्ट्रोबद्दल आदर वाटतो तो त्यासाठीच.
डॉ. कुमार सप्तर्षी
ज्येष्ठ समाजवादी नेते
पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या फिडेल कॅस्‍ट्रोच्‍या आयुष्‍यातील महत्‍वपूर्ण किस्‍से

बातम्या आणखी आहेत...