आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Dhule Politics By Triyambak Kapade, Divya Marathi

धुळ्यात उमेदवारी देताना जात व प्रांताचा आग्रह !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला धुळे लोकसभा मतदारसंघ गतनिवडणुकीपासून पुनर्रचनेनंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झाला आहे. हा मतदारसंघ जोपर्यंत आदिवासींसाठी राखीव होता, तोपर्यंत भाजपाच्या रामदास गावितांचा अपवाद सोडला तर काँग्रेस देईल तो उमेदवार सहज विजयी होत आला आहे. त्यामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटले जात होते. पण हा मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारापुढे निवडणूक जिंकणे मोठे आव्हान झाले आहे. आदिवासींंसाठी होता तोपर्यंत या मतदारसंघात जातीय समीकरण कधी पहायला मिळाले नाही. मात्र, गत निवडणुकीपासून या समीकरणाच्या आधारावरच उमेदवार देण्याचा विचार भाजपासह काँग्रेस, आपमध्ये सुरू झाला आहे. गत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल हे अवघ्या 29 हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. तरीही उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना मराठा समाजातील मग ते मतदारसंघाबाहेरचे असले तरीही त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. जातीय समीकरणाबरोबरच उमेदवार आपल्या जिल्ह्यातला असावा, असा वादही वेगळे वळण घेत आहे. (हे विश्लेषण लिहीपर्यंत काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता)


गतनिवडणुकीपासून धुळे लोकसभा मतदारसंघ हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, देवळा,सटाणा आणि धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे तालुका, शिंदखेडा या बिगर आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेला मतदारसंघ झाला आहे. या मतदारसंघात मालेगाव शहर आणि धुळे शहरातून मुस्लिम उमेदवाराला गतनिवडणुकीत जवळपास 90 हजार मतदान झाले होते. त्यामुळे मुस्लिम समाजातील ही मते कुणाला पाडू किंवा निवडून आणू शकतात. गत वेळेस काँग्रेसचे उमेदवार अमरीश पटेल यांना पराभूत करण्यासाठी दोघा मुस्लिम उमेदवारांना जाणीवपूर्वक बळ दिले गेले होते. दुसरीकडे मराठा समाजात भाजपाच्या प्रताप सोनवणे यांना निवडून आणण्याचा संदेश पोहोचविला गेला होता. मग यासाठी काँग्रेसमधील एका गटाने देखील काम केले होते. मूळच्या धुळे जिल्ह्यातील असलेल्या काँग्रेस उमेदवाराला जातीय समीकरणाबरोबरच अंतर्गत राजकारणाचा संघर्ष करावा लागला होता. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील मतदारांना आपल्या जिल्ह्यातील उमेदवार निवडून दिला तर तो जिल्ह्यातील तिघा तालुक्यांच्या जनतेला सहज भेटू शकतो. त्यामुळे भाजपाच्या सोनवणेंना निवडून आणण्यासाठी प्रांत आणि हद्दवादाचा मुद्दा छुप्या प्रचाराचा मुद्दा केला गेला.


पुन्हा तेच समीकरण, तोच वाद
देशभरात आणि राज्यात सर्वच पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्यादृष्टीने इच्छुक कामालाही लागले आहेत. मात्र, धुळे जिल्ह्यात जात, प्रांत आणि क्षमता हाच मुद्दा घेऊन पक्षीय पातळीवर उमेदवारी निश्चितीची चर्चा सुरू आहे. भाजपाने एका राष्‍ट्रीयस्तरावर काम करणा-या एजन्सीकडून मतदारसंघाचा सर्व्हे करून घेतला आहे. त्या सर्व्हेनुसार पुढे आलेल्या नावापैंकी एकही नाव राज्यस्तरीय पक्ष कमिटीने केंद्रीय कमिटीकडे न पाठविता विद्यमान खासदार प्रताप सोनवणे यांचेच नाव पाठविले होते. तथापि, हे नाव पाठविण्यामागे नाशिक जिल्ह्यातील उमेदवार देण्याचा आग्रह आणि जातीय समीकरण हा मुद्दा प्रभावी ठरला होता. दरम्यान, उमेदवारच द्यायचा असेल तर धुळे जिल्ह्यातील का नको? म्हणून भाजपाची धुळे जिल्ह्यातील मंडळी सक्रिय झाली होती. त्यांनी शिवसेनेचे डॉ. सुभाष भामरे आणि लोकसंग्रामचे (मूळचे जनसंघ) आमदार अनिल गोटे यांचे नाव लावून धरले होते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना जात, प्रांत आणि क्षमता हे मुद्दे विचारात घेत डॉ. भामरेंना उमेदवारी द्यावी लागली. पहिल्याच यादीत त्यांचे नाव भाजपाने जाहीर केले आहे. काँग्रेसमध्ये मात्र या मतदारसंघासाठी चुरस सुरू आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांचे वंशज सत्यजित गायकवाड यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना नाशिक जिल्ह्यातून सपोर्ट मिळत आहे आणि जातही प्रभाव पाडत आहे. गत वेळेस केवळ 29 हजार मतांच्या फरकाने पराभूत झालेले अमरीश पटेल यांनीही पुन्हा कॉँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. ते कामालाही लागले आहेत. पण त्यांच्याकडे जातीचे भांडवल नाही. गतवेळेस त्यांचा पराभव धुळे जिल्ह्यातील जनतेला आत्मपरीक्षण करायला लावणारा होता. यावेळेस त्यांच्या नावाला जिल्ह्यातील काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचा विरोध मावळला आहे. त्यांच्या गटातून कुणी उमेदवारीही मागीतलेली नाही, पण मालेगाव जवळ आपले मुळगाव असल्याचे सांगून सत्यजीत गायकवाड यांनी उमेदवारी मागितल्यामुळे काँग्रेस उमेदवारीबाबत घोळ निर्माण झाला आहे.


आता जात की विकास
धुळे लोकसभेसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.काँग्रेसमध्ये मात्र अजूनही घोळ सुरू आहे. पटेल किंवा गायकवाड दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गायकवाड यांना उमेदवारी दिली तर जात हद्दपार होऊन प्रांताचा वाद कायम राहील. पटेलांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली तर जात विरोधात विकासाची लढाई होईल, हे मात्र तेवढेच खरे आहे.