आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या ललाटी कायम दुर्दैवाच्या रेषा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोसणे ही मराठवाड्याची मानसिकता आहे. संतभूमी असल्याने सोशीकपणाचेही कौतुक झाले. ‘जैशी स्थिती आहे, तैशावरी राहे, कौतुक पाहे संचिताचे’ हीच शिकवण हाडामासी खिळलेली. निझामी राजवटीची प्रदीर्घ जुलमी परंपरा, रझाकारी उच्छाद, भारतीय संघराज्यात विलीन होणे, संस्थानी कारभार जाऊन लोकशाहीप्रणीत राज्यव्यवस्था स्वीकारणे, पुढे संयुक्त महाराष्ट्रात विनाअट विलीन होणे अशा घटनाचक्रातून मराठवाडा तावून सुलाखून तर निघालाच, शिवाय भलताच पिळवटून निघालाय. मराठवाड्याच्या ललाटी कायम दुर्दैवाच्या रेषा. राजवट कोणतीही असो, मराठवाड्याच्या नशिबी कटकट लिहिलेली. सरंजामी व जमीनदारी अंगवळणी पडलेली. लाचारी रोमारोमी मुरलेली, परिणामी परावलंबन आलेले. ‘ठेविले महाराष्ट्रे तैसेचि राहावे’.

महाराष्ट्राचे जणू ‘परिशिष्ट’ म्हणजे मराठवाडा. (पुढे मागे ‘अविशिष्ट’ न होवो.) तर असा हा मराठवाडा. कोणी मागासलेला म्हणतं. कोणी उपेक्षित म्हणतं. कोणी संतभूमी म्हणतं. कोणी काही, कोणी नाही, कोणी काहीवाही. मी मात्र ‘अनुशेष मराठवाडा’ असे म्हणतो. अनुशेष हे विशेषण इतके अन्वर्थक आहे की, त्यामुळे उर्वरित सर्व अनर्थ टळण्याची शक्यता आहे. बाकी अर्थकारण तर सर्वत्र सार्थकी लागतेच. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ‘मराठवाडा’ स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, अनंतराव भालेराव वगैरे मंडळींचा होता. भाषावार प्रांतरचना झाली नि मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला. मराठवाड्याची पुढची वाटचाल ही महाराष्ट्राच्या कृपेवर अवलंबून होती. मराठवाड्याचा अस्तित्वलोप इथूनच सुरू झाला. मराठवाड्याचे हे रूप ना ‘हैदराबादी’ होते, ना ‘मराठवाडी’. असा एक चेहरा समोर आला की, जो केवळ आश्रिताचाच वाटावा. जे काही मराठवाड्याला मिळाले ते आश्रित म्हणून. राजकीय परिस्थितीच अशी होती की, ‘यशवंतराव बोले, महाराष्ट्र हाले आणि उर्वरित डोले.’ त्या उर्वरितातील मराठवाडा तर कायम मान खाली घालून बसलेला. 1972 मध्ये मराठवाडा विकास आंदोलन झाले. योगायोगाने ते साल दुष्काळाचेच होते. आता दुष्काळ आहे, पण तसे आंदोलन नाही. आंदोलन करणारी पिढीही आता राहिली नाही. जे आहे ते स्टंट वाटतात. (मराठवाडा जनता विकास परिषद वगळून)

मराठवाड्याचे पक्षीय राजकारणही ‘विकास केंद्री’ नाही. गटातटाचे, पक्षीय अभिनिवेशाचे, आपापल्या जिल्ह्यापुरते आणि स्वार्थाभिमुखता असलेले हे राजकारण मराठवाड्याचे परावलंबन अधिकच बळकट करीत आहे. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा अपवाद सोडल्यास विकासाची दृष्टी असलेला अन्य नेता सापडत नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या ओंजळीने पाणी पिणा-या आमच्या आमदार, खासदार व अन्य पुढा-यांना स्वत:चा स्वार्थ नि स्वत:चा मतदारसंघ या पलीकडचे काही दिसत नाही. साधा पाणीटंचाईचा प्रश्नही हे पुढारी सोडवू शकले नाहीत, तर इतर विकास क्षेत्रात काय दिवे लावणार? साखर कारखाने, सहकारी संस्था, बँका इथे पदाधिकारी म्हणून वावरणा-यांनी त्या त्या क्षेत्राची अशी काही वाट लावली की आता सावरणे कठीण.

संपूर्ण मराठवाडा नजरेसमोर ठेवून जलसिंचनाचा खरा विकास घडवणारे एकमेव नेते म्हणजे शंकरराव चव्हाण. पण त्यांना मराठवाड्यातून विरोध झाला. मराठवाड्याला शरद पवारांचे कौतुक फार. त्यांनी एकाची दोन विद्यापीठे केली. साहित्य, कला क्षेत्रात अनेकांची विविध ठिकाणी वर्णी लावून मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला. एकूण त्यांनी मराठवाड्याला सांस्कृतिक ओळख दिली. यशवंतराव चव्हाणांचा वारसा इथे चालवला. पण राजकीय क्षेत्रात मात्र त्यांनी सर्व पुढा-यांना आश्रितच मानले. स्वतंत्र, स्वयंभू असे नेतृत्व वाढू दिले नाही. वाढायला लागले की खुडून काढले. ‘अडवणे’ आणि ‘जिरवणे’ या दोन्हीतहीही शारदीय कला अनेकांना मोहात पाडणारी. एकूण मराठवाड्याचे राजकीय क्षेत्र हे असे परधार्जिणे. जिथे शंभर टक्के राजकारण नि शून्य टक्के समाजकारण तिथे विकास होणार कसा? राजकारणग्रस्त मारठवाड्यातील पुढा-यांना म्हणूनच पश्चिम महाराष्ट्राचे आश्रित म्हणून वावरावे लागते. माझे एक परभणीकर स्नेही परभणीचा विकासात्मक राजकारणाविषयी बोलताना म्हणाले, कसली हो परभणी? परभणीचे नाव ‘परभरणी’ केले पाहिजे. ही वस्तुस्थिती अधोरेखित करताना त्यांनी जे विश्लेषण केले ते अंतर्मुख करणारे आहे. ‘परभणीला सर्वमान्य असा एक नेता दाखवा, मी एक लाख रुपये देतो’असा समारोप त्यांनी केला. परभणीच काय, पण संपूर्ण मराठवाड्याचा

एकमेव सर्वमान्य नेता दाखवा नि एक लाखच काय, तर एक कोटी रुपये मिळवा, असे मीही जाहीर करतो. मराठवाड्यावर अन्याय होतो-झाला-पुढेही होणार हे खरे आहे, पण आम्ही अन्याय सहन करतो-नव्हे, आम्हाला अन्याय झाला हे कळत नाही हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात मराठवाडा अवशेष म्हणून न उरो, हीच प्रार्थना. कारण या अवशेषांचे उत्खनन करायला पुन्हा कोणाचे तरी आश्रितच व्हावे लागेल.
( लेखक ज्येष्ठ कवी व साहित्यिक आहेत)