सन 1884 मध्ये हजारो नागरिक न्यूयॉर्कमधील क्रिस्टल पॅलेसमध्ये जमले होते. हे सर्व एका व्यक्तीला पाहण्यासाठी आले होते, जी आयर्न अँड ग्लास एक्झिबिशन हॉलच्या चौथ्या मजल्यावरील एका प्लॅटफॉर्मवर उभी होती. हा प्लॅटफॉर्म एका दोराच्या साह्याने लटकत होता. या वेळी एलिस ओटिस यांनी संकेत देताच त्यांच्या सहायकाने स्विच ऑन केला आणि तलवारीने दोर कापला. प्लॅटफॉर्म वेगाने हलला; परंतु पडला नाही. कारण तो लपवलेल्या दोन सेफ्टी ब्रेकच्या साह्याने उभा होता. ओटिस यांनी हे प्रात्यक्षिक सतत महिनाभर दिवसातून अनेक वेळा दाखवले. हे दाखवण्याचा उद्देश एकच होता की, एलिव्हेटर दोरापासून तुटला, तरी प्लॅटफॉर्म पडणार नाही आणि लोकांना कोणताही धोका असणार नाही.
एलिव्हेटर्ससाठी या सेफ्टी ब्रेकचे क्रेडिट अर्थात ओटिस यांना दिले जाते. लोकांमध्ये हा स्टंट चांगलाच लोकप्रिय झाला. हा स्टंट दाखवण्याच्या एका वर्षापूर्वी ओटिस यांनी न्यूयॉर्कमध्ये आपली एलिव्हेटर कंपनी स्थापन केली होती. 1856पर्यंत त्यांनी अनेक एलिव्हेटर्सची विक्री केली. 1857मध्ये पहिल्या पॅसेंजर एलिव्हेटरसाठी न्यूयॉर्कमध्ये ‘ईवी हॉवोट’ कंपनी स्थापन केली. 1861मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा चार्ल्स आणि नॉर्टन यांनी कंपनीचा कारभार पाहणे सुरू केले. त्यानंतर कंपनीचे नाव बदलून ‘ओटिस ब्रदर्स कंपनी’ असे ठेवण्यात आले. चार्ल्स या कंपनीचा अध्यक्ष बनला. 1868मध्ये या कंपनीने वाफेवर चालणारे आणि 1870मध्ये हायड्रोलिक एलिव्हेटर बनवले. 1880मध्ये कंपनीला व्हाइट हाऊसमध्ये एलिव्हेटर लावण्याची ऑर्डर मिळाली. 1889मध्ये विजेवर चालणारे एलिव्हेटर बनवले. त्यानंतर जगासमोर प्रथमच एस्कॅलेटर सादर करण्यात आले.
1898मध्ये 14 एलिव्हेटर कंपन्यांचे विलीनीकरण ‘ओटिस ब्रदर्स कंपनी’त करण्यात आले. त्यासाठी 11 दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आले. 1902मध्ये विदेशातील अनेक नवीन कंपन्याही विकत घेतल्या. 1912मध्ये जेव्हा कंपनीची गुंतवणूक 8,83,317 डॉलरवर पोहोचली तेव्हा ‘ओटिस’जवळ अमेरिकेतच सात प्लॅँट होते. 1924पर्यंत कंपनीने कॅनडा, इटली, बेल्जियम आणि जर्मनीत आपला व्यवसाय वाढवला. 1931मध्ये सर्वात उंच ‘एम्पायर स्टेट’ बिल्डिंग बनून तयार झाली. त्यात ‘ओटिस’ने 1200 फूट प्रतिमिनिटे वेगाने चालणारा एलिव्हेटर बसवला. तसेच दुस-या महायुद्धापूर्वी अपार्टमेंट, घरे व कार्यालयांमध्ये पुश बटण एलिव्हेटर्स खूप सामान्य झाले. 1968मध्ये कंपनीने न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 225 एलिव्हेटर्स व 71 एस्कॅलेटर्स लावले. या वेळी अमेरिकेतील एलिव्हेटर्सच्या एकूण व्यवसायातील 50 टक्के वाटा ‘ओटिस’कडे होता. 1970मध्ये कंपनीचा व्यवसाय वाढून 800 दशलक्ष डॉलरवर पोहोचला. 17 देशांमध्ये कंपनीचे प्लॅँट होते. मात्र, 1975मध्ये युनायटेड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने 276 दशलक्ष डॉलरमध्ये ‘ओटिस’ला खरेदी केले. 1981मध्ये या कंपनीने एलिव्होनिक 401 मॉडेल बनवून बाजारात आणले. त्यात स्पीकिंग सिस्टिम, डिस्प्ले व सिक्युरिटी सिस्टिम होती. 1990मध्ये कंपनीचा जगातील एलिव्हेटर बाजारातील वाटा 24 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचला. 2000मध्ये कंपनीच्या दुस-या पिढीतील एलिव्हेटर्स बाजारात आणले. सुरक्षेच्या दृष्टीने हे एलिव्हेटर्स खूपच चांगले होते. कारण त्यात स्टील केबलचा वापर केला होता. बुर्ज खलिफासह जगातील अनेक उंच इमारतींमध्ये ‘ओटिस’चे एलिव्हेटर्स लावण्यात आले आहे. 61 हजार कर्मचारी असणा-या ‘ओटिस’ला 2013मध्ये हैदराबाद मेट्रोसाठी 670 एलिव्हेटर्स आणि एस्कॅलेटर्स लावण्याचा सर्वात मोठा ठेका मिळाला.